खंडाळा येथील अतिक्रमणप्रकरणी आमच्यावर अन्याय झाला असल्याचे म्हणत अधिकार्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा
खंडाळ्यातील महिलांचा निवेदनाद्वारे इशारा
लोणंद / वार्ताहर : खंडाळा येथील अतिक्रमणप्रकरणी आमच्यावर अन्याय झाला असल्याचे म्हणत अधिकार्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. पाच दिवसात न्याय मिळाला नाही तर मुला बाळांसहित आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा महिलांनी दिलेला आहे. याबाबतचे निवेदन महिलांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिले आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे की, खंडाळा गावांमध्ये 20 ते 25 वर्षांपासून आम्ही आमच्या जागेत उदरनिर्वाहासाठी दुकाने टाकली होती. तरी खंडाळा नगरपंचायतीने अतिक्रमण हटवण्याचे आम्हांला काहीच कल्पना व नोटीस दिली नव्हती. सर्व महिला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश डोके यांना विचारण्यास गेलो असता सर्व महिलांना गलिच्छ भाषेत उत्तरे दिली. मी अधिकारी म्हणून तुमच्यावर कोणतीही कारवाई करू शकतो. त्यामुळे सर्व मागासवर्गीय समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्हा सर्वांना उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला न्याय मिळत नाही. सर्व जमिनी पंचायत समिती, सरकारी दवाखाना, मराठी शाळा, सभापती निवास, कोर्ट हे आमच्या जागेत असून काहीही मोबदला न देता सर्व उभारलेले आहे, असे महिलांनी निवेदनात नमूद केले आहे.
तरी हा सर्व प्रकार झालेला असून महिलांवर अत्याचार झाला आहे. सगळे अधिकार्यांनी मुद्दाम कारस्थान केले आहे. जातीयवाचक शब्द वापरून महिलांचे मनाचे खच्चीकरण केले आहे. तरी या सर्व समाज कंटक अधिकार्याविरुध्द कारवाई करून त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यांनी त्यांचे पदाचा गैरवापर करून गरिबांवर अन्याय केला आहे. कसाबसा समाज कोवीडच्या लॉकडाऊनपासून वर येत होता. कामधंदा करून निर्वाह करत होता. अशा अवस्थेत प्रशासनाने अतिक्रमणाचा चुकीचा निर्णय घेऊन समाजावर घाला घातला असल्याचे महिलांनी म्हटले आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करून आम्हा सर्व महिलांना आमची दुकाने मिळवून द्यावीत व नुकसान भरपाई देखील द्यावी. अन्यथा पाच दिवसांत न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व महिला मुला-बाळांसहित आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
COMMENTS