Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवार-शाह यांच्या कथित भेटीनंतरही महाविकास आघाडी मजबूत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीची वावटळ अजून थांबायला तयार नाही.

मुजोर अधिकारी अखिलेश शुक्लाचे निलंबन
चोंडी ते निमगाव डाकू रस्त्यासाठी 2 कोटी 7 लाख मंजूर  
अखेर डॉ. बाबा आढाव यांनी सोडले उपोषण

मुंबई / प्रतिनिधीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीची वावटळ अजून थांबायला तयार नाही. ही भेट झाली, की नाही, याबाबत पवार आणि शाह काहीही स्पष्ट बोलत नाहीत आणि पवार यांच्या रुग्णालयात जाण्याने तर भाजपची त्यांच्याविषयीची वाढती सहानुभूती पाहता त्यातून वेगवेगळे अन्वयार्थ काढले जात आहेत. 

एका गुजराती दैनिकाने पवार-शाह यांच्या भेटीचे ठिकाणही नमूद केले आहे. भाजपच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय जवळच्या असलेल्या उद्योगपतीशी पवार, प्रफुल्ल पटेल काही हवापाण्याच्या गप्पा मारायला नक्कीच गेले नसतील. काही वृत्तांत पवार त्या बैठकीला हजर होते, असे म्हटले आहे, तर काहींनी पवार तिथे नव्हते, पटेल-शाह यांची भेट होती, असे म्हटले आहे. सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगण्यासाठी नसतात असे सूचक वक्तव्य करून शाह यांनी सस्पेन्स आणखी वाढविला आहे. नबाब मलिक यांनी भेट झालीच नसल्याचे म्हटले असले, तरी जितेंद्र आव्हाड यांची परस्परविरोधी वक्तव्ये पाहता त्यातून आणखी संदिग्धता निर्माण होते.  खासदार संजय राऊत यांनी अगोदर भेट झाल्याची शक्यता वर्तवून नंतर मात्र भेट झालीच नाही, असे विधान करून संभ्रम वाढविला आहे.

सर्व पक्षाचे राजकीय नेते एकमेकांना भेटत असतात. पवार आणि शाह यांच्या कथित बैठकीला महत्त्व प्राप्त होते. कारण 2014नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. 2014मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देऊ केला होता. 2019 मध्ये महाविकास आघाडीची निर्मिती होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर चर्चा करत होती. दुसरीकडे भाजपबरोबरही त्यांची चर्चा सुरू होती. अजित पवारांचा गट देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करत होता. ही चर्चा शरद पवार यांच्या आशिर्वादाने होत होती, की नाही यासंदर्भात वेगवेगळ्या थिअरीज मांडण्यात आल्या; पण एक नक्की की राष्ट्रवादीचा एक गट त्यावेळी भाजपबरोबर चर्चा करत होता. ही पार्श्वभूमी पाहता, पवार यांची गोपनीय बैठक शाह यांच्याबरोबर होत असेल तर त्याला राजकीय महत्त्व आहे. या बैठकीच्या बातमीमुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काँग्रेसचे अनेक नेते शरद पवार यांच्याकडे संशयाने बघत होते. आता अधिक संशयाने बघतील. नेमकी ही बातमी छापून आली त्याचवेळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात संजय राऊत यांच्या सदरातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील अंतर वाढते आहे. संजय राठोड आणि सचिन वाझे प्रकरणात शिवसेना बॅकफुटवर गेली होती. शिवसेनेच्या गुडबुकमध्ये असलेल्या परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्या शंभर कोटी रुपयांच्या टार्गेटचे पत्र लिक करून आपल्यावरील वादाचे मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसवर ढकलून दिले. यावरून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे ही भेट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार या भेटीबद्दल काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट झालेली आहे. भाजपने राष्ट्रवादीला टीकेचे लक्ष्य केल्यानंतर शाह आणि पवार भेट झाली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांना पवार आधारवड वाटू लागला. गृहमंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि त्यात सेल्व्हासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येत गुजरातच्या माजी गृहराज्यमंत्र्यांसह भाजपच्या अनेक नेत्यांच नावे असल्यानेही त्यात एनआयए चाैकशीत राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्षेप येऊ नयेत आणि डेलकर प्रकरण राष्ट्रवादीने फार ताणून धरू नये, असा समझोता करार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पवार-शाह यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीला लगेच धोका होईल का आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल का, या प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थी आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारबाबत अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत. असे असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे सरकारमधून सध्या तरी बाहेर पडू शकत नाही. पवार यांचे सर्वच राजकीय पक्षांशी आणि पक्षांच्या नेत्यांची चांगले संबंध आहे. पवार जे बोलतात त्याच्या नेमके उलटे करतात, असे महाराष्ट्रात बोलले जाते. तसेच त्यांच्या विश्वासार्हतेवरही अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते; पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेत महाविकास आघाडी सरकारची उभारणी केली आहे. पवार राज्यात आता भाजप विरोधात अनेक पावले पुढे आले आहेत. अशावेळी महाविकास आघाडीबाहेर पडून पुन्हा एकदा आपल्या विश्वासार्हतेवर पवार प्रश्न निर्माण करणं पवारांना परवडणारे नाही.

चाैकट

पवारांच्या प्रतिमेचा प्रश्न

…………………..

पवार यांची प्रतिमा कायम अविश्वासार्ह अशी होती; पण गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ती विश्वासार्ह अशी बनली आहे. महाविकास आघाडीच्या उभारणीनंतर तर पवार यांची प्रतिमा महाराष्ट्रात खूप वेगळी बनली आहे. त्यामुळे पवार पुन्हा एकदा आपल्या प्रतिमेला तडा जाऊ देतील, असे वाटत नाही. सध्या महाविकास आघाडीतून किंवा सत्तेतून बाहेर पडणे कुणालाही परवडणारे नाही. महाराष्ट्रातील नागरिकांच्या नजरा सरकारकडे आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडेही आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे असेही नाही.

…………………

चाैकट २

भाजपसोबत जाण्याची मानसिकता नाही

…………….

यापूर्वी भाजप शिवसेनेच्या काळात किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही सर्वकाही आलबेल होते असे नाही; पण सध्याच्या काळात महाविकास आघाडी सरकारमधून कोणत्याही पक्षाला बाहेर पडणे परवडणारे नाही. एकीकडे पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात अन्य पक्ष एकत्र येण्याची शक्यता असताना पवार आता भाजपसोबत जाण्याच्या मानसिकतेत नाहीत.

COMMENTS