Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परदेशी कुटुंबासाठी कोरोना ठरला काळ !

जळगावच्या सावदा येथील परदेशी कुटुंबासाठी कोरोना हा जणूकाही काळच ठरला आहे.

संकेत- सुपर्णाच्या लग्नात लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी
राहाता शहरामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात
कर्मकांडांना फाटा देत महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचाराने रक्षाविसर्जन

जळगाव /प्रतिनिधीः जळगावच्या सावदा येथील परदेशी कुटुंबासाठी कोरोना हा जणूकाही काळच ठरला आहे. या कुटुंबाने गेल्या 12 दिवसांत चक्क पाच कुटुंबीय गमावले आहेत. विशेष म्हणजे परदेशी हे एकच नाही, तर असे अनेक कुटुंबे कोरोनामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये थैमान घालणारा कोरोना आता खेड्यापाड्यांमध्येही शिरला आहे. जळगाव जिल्ह्यात तर अनेक गावांमध्ये कोरोनाचा हाहा:कार माजला आहे. कोरोनाचा हा उद्रेक पाहता सरकार आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण तिथला मृत्युदरही भयानक वाढतो आहे. 

दररोज अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. सावदा येथील परदेशी कुटुंबातील नुकत्याच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या दुःखातून हे कुटुंब सावरत नाही, तोच रात्री या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठ ते दहा दिवसांत कोरोनामुळे परदेशी कुटुंबातील चार जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर बुधवारी पुन्हा याच कुटुंबातील रामसिंग परदेशी ऊर्फ राजू परदेशी (वय 58) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सावदामध्ये स्वर्गीय गणपतसिंह परदेशी यांचे सहा मुलांचे आणि एकूण 35 जणांचे मोठे कुटुंब आहे. त्यापैकी काही वर्षांपूर्वी दोन ज्येष्ठ बंधूंचा, एका मुलीचा तर आता कोरोनामुळे तीन भावांचा मृत्यू झाला. सहा भावंडांपैकी आता केवळ एकच भाऊ संतोषसिंग परदेशी हयात आहे. लागोपाठ आठ ते दहा दिवसांत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने या परदेशी कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही करणे कठीण आहे. चोपडा तालुक्यात फार भयानक अवस्था आहे. अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अनेक जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये तरुणांचादेखील समावेश आहे. चोपडा पाठोपाठ धारणगाव, एरंडोल, अमळनेर, जळगाव शहर या भागांमध्ये प्रचंड बिकट अवस्था आहे. या परिस्थितीत तेथील नागरिकांना सरकार आणि प्रशासनाच्या मदतीची निंतात आवश्यकता आहे.  मुंबई, पुणे, ठाण्यात ज्याप्रकारे कोव्हिड सेंटर आहेत, त्याच धर्तीवर तिथेही कोव्हिड सेंटर असावीत, अशी मागणी आहे. याशिवाय तिथे बरे होण्याची हमी आणि लोकांमध्ये सरकारने तसा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होईल, असे  स्थानिकांचे म्हणणे आहे.

COMMENTS