अहमदनगर/प्रतिनिधी : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्यच करावा लागेल व आता यावर विधानमंडळ काय भूमिका घेते, हे
अहमदनगर/प्रतिनिधी : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्यच करावा लागेल व आता यावर विधानमंडळ काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. 12 आमदारांचे निलंबन हा कोणा व्यक्तीचा वा शासनाचा निर्णय नव्हता, तर विधिमंडळाच्या निर्णय होता, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
खासगी कार्यक्रमानिमित्त वळसे नगरला आले होते. येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांचा सत्कार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, अविनाश आदिक, घनश्याम शेलार, प्रा. माणिक विधाते, बाळासाहेब जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वळसे म्हणाले, विधिमंडळाने घेतलेला निर्णय तो योग्य-अयोग्यचा विषय विधिमंडळाच्या असतो. न्यायालयाने त्यामध्ये कितपत हस्तक्षेप करायचा याकरता काही निश्चित अशा गाईड लाईन्स दिलेल्या आहेत. त्यामुळे 12 आमदारांच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय न्यायालय दिलेला आहे, त्याची प्रत हातात आल्यानंतरच त्याच्यावर सविस्तर बोलणे उचित होईल, असे स्पष्ट करून ते म्हणाले, विधिमंडळामध्ये जो काही निर्णय होतो, तो तेथील परिस्थिती पाहूनच घेतला जातो व तो विधीमंडळाचा निर्णय असतो. विधिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये कोणीही न्यायालयात जाऊ नये असे काही संकेत असतात तसेच न्यायालयाने सुद्धा विधिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची कितपत दखल घ्यावी यासाठी सुद्धा काही गाईडलाईन ठरवून दिलेल्या आहेत, असे वळसे यांनी सांगून एकमेकांच्या हक्कांचे संरक्षण यात पाहिले गेलेले आहे. त्यामुळे जो काही 12 आमदारांच्या संदर्भामध्ये निर्णय न्यायालयाने दिलेला आहे, तो निर्णय पूर्णपणे वाचल्यानंतरच त्यावर बोलणे उचित होईल. मागील भाजप व शिवसेना सरकारमध्ये अशाच पद्धतीने राष्ट्रवादी व काँग्रेस आमदारांवर कारवाई झालेली होती. त्यावेळेला ते आमदार राज्यभर फिरले होते. आता जो न्यायालयाचा निर्णय आलेला आहे, तो मान्य करावा लागेल परंतु पुढे काय करायचे हे विधान मंडळ यासंदर्भात भूमिका घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्या 12 आमदारांच्यासंदर्भात घेतलेला निर्णय हा काही कोणी व्यक्तीने वा सरकारने घेतलेला नाही, तो विधीमंडख सभागृहाने घेतलेला आहे त्यामुळे तो योग्य नाही वा सूडबुद्धीने घेतला, असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उत्पन्न वाढीसाठी तो निर्णय
कॅबिनेट बैठकीमध्ये वाईनसंदर्भात जो निर्णय घेतला आहे, त्या संदर्भात बोलताना वळसे म्हणाले की, वाइनच्या संदर्भांमध्ये जो निर्णय घेतला, तो काहीच सरसकट प्रत्येक दुकानांमध्ये तो ठेवावा असा नाही. त्यासाठी काही नियमावली तयार करून देण्यात आलेली आहे. मोठ्या मार्ट वा दुकानांमध्ये एका कपाटामध्ये ठेवावी अशी परवानगी देण्यात येईल तसेच याकरता जी काही नियमावली आहे, ती सुद्धा तयार केली गेली आहे. तसेच ती ठेवावी अशी कोणावर सक्ती केली नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकर्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे ही पण वस्तुस्थिती आहे, आज द्राक्षाचे उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहेत. त्याच्यापासून वाइन तयार केली जाते, त्यामुळे त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचा भाव मिळेल तसेच सरकारला सुद्धा यातून उत्पन्न मिळेल हा या मागचा उद्देश असल्याचेही वळसे यांनी यावेळी सांगितले
असे प्रकार चालू देणार नाही
नागपूर शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी जो काही एकत्रितपणे डान्स करण्याचा प्रकार घडलेला आहे यावर विचारले असता, आगामी काळामध्ये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगून त्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्रीबाबत श्रेष्ठी ठरवतील
नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये विचारले असता गृहमंत्री म्हणाले की, नगरला मला पालकमंत्रीपदी नेमण्याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली की नाही हे मला सांगता येणार नाही, मी इच्छुक आहे की नाही हेपण मी सांगणार नाही. कारण, पालक मंत्री संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात, ते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS