निरंजनी आखाड्याचं अंजन

Homeसंपादकीयदखल

निरंजनी आखाड्याचं अंजन

गर्दी जिथं, कोरोना तिथं असं म्हटलं जातं.

राजकीय पक्षांनी जबाबदार बनावं !
क्रिमी लेयर, जाती आणि न्यायपालिका !
सामान्य माणूस जिंकला..बेरकी राजकारण हरले!

गर्दी जिथं, कोरोना तिथं असं म्हटलं जातं. गर्दी करू नका, असं नेत्यांचं, तज्ज्ञांचं म्हणणं लोक ऐकत नाहीत. घर्ममार्तंडाचा मात्र समाजावर मोठा प्रभाव असतो. त्यांनी सांगितलं, तर लोक ऐकतात. उत्तराखंडच्या राज्यकर्त्यांना कुंभमेळा न घेण्याचा निर्णय घेता आला नाही. या कुंभमेळ्यानं जेव्हा आता साधू, संतांचाच बळी घ्यायला सुरुवात केली, तेव्हा निरंजनी आखाड्यानं कुंभमेळा समाप्तीची घोषणा करून तो प्रतिकात्मक करण्याचा घेतलेला निर्णय आता अन्य आखाड्यांनीही आचरणात आणायला हवा.

विज्ञान आणि अध्यात्म हातात हातात घालून चालतात, तेव्हा कोणत्याही संकटावर मात करता येत असते; परंतु त्यासाठी धर्माचा दुराग्रह सोडावा लागतो. धर्म ही जीवनपद्धती असली, तरी विज्ञान हे जीवन सुखकर करण्याचा मार्ग आहे. विज्ञान जिथं संपतं, तिथं धर्म सुरू होतो, असं सांगितलं जातं; परंतु ते पूर्णसत्य नाही. विज्ञान कधीच संपत नसतं. मानवी आयुष्यातील अनेक संकटं, व्याधींवर मात करण्यात विज्ञानच उपयोगी पडलं आहे. नवनवे रोग, साथीचे विकार जन्माला येतात. त्यावर विज्ञानच मात करीत असतं. त्यासाठी संशोधन व्हावं लागतं. कोरोनावर सध्या कोणतीही औषधं नाहीत. त्यावर ती निघतीलही; परंतु सध्या तरी इतर आजारांवरची औषधं वापरून मानवी प्रतिकारशक्ती वाढविली जात आहे. कोरोनावरच्या लसी आल्या आहेत. असं असलं, तरी कोरोना इतक्यात जाणार नाही. कोरोनासह जगणं स्वीकारावं लागणार आहे. त्यासाठी कोरोनाची जी पंचसूत्री आहे, ती अंमलात आणावीच लागेल. गर्दीमुळंच कोरोना वाढतो, हे राज्यकर्ते, वैज्ञानिकांनी वांरवार सांगितलं आहे; परंतु काहींना ते पटत नव्हतं. कुंभमेळा ज्या राज्यात भरला आहे, त्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना तर कुंभमेळ्यातील पवित्र स्नानच कोरोनावर मात करील आणि साधूसंताच्या जवळपासही कोरोना फिरकणार नाही, असं वाटत होतं; परंतु साथीचे विकार साधू, संत, सामान्य, गरीब, श्रीमंत असा भेद कधीच करीत नाही. कोरोनानंही ते दाखवून दिलं. कुंभमेळ्यात अवघ्या दोन हजार जणांनाच कोरोना झाला, असं सांगून त्याचं प्रमाण कमी असल्याचं सांगितलं जात असलं, तरी लाखोंच्या एकत्र येण्यानं हे दोन हजार जण आता स्प्रेडर ठरतील, याची भीती आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह उत्तर प्रदेशातही कोरोनाचा संसर्ग सतत वाढत आहे. हरिद्वार कुंभमेळ्यात भाविक आणि संतांची गर्दी झाली असून, मोठ्या संख्येनं लोक दररोज कोरोना बाधित होत आहेत. कोरोनामुळं साधूंचाही मृत्यू व्हायला लागला आहे. आता कुंभमेळ्यातील दोन शाही स्नानं शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत निरंजनी आखाड्यानं कुंभमेळा संपुष्टात आल्याची घोषणा केली आहे. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभमेळा संपविण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. 17 एप्रिल रोजी कुंभमेळा संपेल. बाहेरून आलेल्या सर्व संत, माहात्मांना परत जाण्याची विनंती केली गेली. पुरी यांनी इतर आखाड्यांनाही कुंभमेळा संपवण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, की कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या हितासाठी हा मेळा संपुष्टात आणणंच योग्य आहे. 27 एप्रिल रोजी महाकुंभ मेळ्याचं शाही स्नान होणार आहे. या महाकुंभमेळ्याचं ते शेवटचं शाही स्नान असेल. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर 27 एप्रिल रोजी शाही स्नानही केवळ प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे. त्यामुळं महाकुंभ स्नानाची शाश्‍वत परंपरा कायम राहील. असे प्रागतिक निर्णय घेतले, तर कोरोनासारख्या वेगानं पसरणार्‍या साथीच्या विकाराला नक्कीच आळा घालता येईल. 

गर्दी टाळा असं प्रशासन सांगत असलं, तरी फ्रान्स, इटली, पाकिस्तान आदी ठिकाणी ख्रिश्‍चन, मुस्लिम, हिंदू धर्मियांनी  गर्दीचे मेळावे घेतले. तिथून कोरोना पसरला. आताही भारतात मशिदीत जाऊन नमाज पठण करण्याच्या दोन याचिका दाखल झाल्या. दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रमजान महिन्यात मशिदीत जाऊन नमाज पठण करायला परवानगी नाकारली.  या पार्श्‍वभूमीवर निरंजनी आखाड्यासारखा एखादा आखाडा स्वतःहोऊन गर्दी टाळण्याचा निर्णय घेत असेल, तर त्याचं महत्व वेगळं आहे. हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सर्व नियम आणि कायदे पायदळी तुडवले जात आहेत. या कुंभमेळ्यासाठी  लाखो लोक जमले. शासन-प्रशासन पूर्णपणे हतबल असल्याचं दिसून आलं. कुंभमेळा आता कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनला आहे. पाच दिवसांत 1700 नवीन संसर्गग्रस्त आढळले आहेत.  हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. जगातील सर्वांत मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचार्‍यांनी मेळाव्यात पाच दिवसांत दोन लाख 36 हजार 751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांचे अहवाल होकारात्मक आले. हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभू कुमार झा म्हणाले, की या संख्येनं हरिद्वार ते देवप्रयागपर्यंत संपूर्ण मेळाव्यात पाच दिवसांत विविध आखाड्यांच्या साधूंनी आणि संतांनी केलेल्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजन या दोन्ही तपासणीचा डेटा समाविष्ट आहे. आरटी-पीसीआरच्या पुढील तपासणीचे निकाल अजून आलेले नाहीत आणि ही परिस्थिती पाहता कुंभमेळा क्षेत्रात संक्रमित व्यक्तींची संख्या दोन हजारांच्या पुढं जाण्याची शक्यता आहे. बाहेरून लाखो भाविक येत असताना त्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत, की नाहीत, ते बाधित आहेत, की नाहीत, हे तपासणारी कोणतीही यंत्रणा हरिद्वारमध्ये नव्हती. त्यामुळं कुंभमेळा हा कोरोना प्रसाराचा केंद्रबिंदू ठरला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार आणि हरिद्वार कुंभमध्ये दररोज आढळणारे कोरोना रुग्ण पाहता कुंभ समाप्तीची चर्चा सुरू होती. महंत पुरी यांच्या दाव्याप्रमाणं इतर आखाड्यांनी कुंभमेळा समाप्तीला पाठिंबा दिला असेल, तर ते चांगलंच आहे. निरंजनी आखाड्याच्या छावणीमध्ये उपस्थित सर्व संतांना लवकरात लवकर आपल्या मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये परत जाण्यास सांगितलं आहे, जेणेकरुन कोरोना प्रसाराचा धोका कमी होईल. याच आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याशिवाय इतर आखाड्यांचे संतही बाधित आढळले आहेत. महाकुंभ मेळ्यासोबत जोडल्या गेलेल्या सीएमओ अर्जुन सिंह सेंगर यांच्या म्हणण्यानुसार, आखाड्यात जास्त जणांच्या कोरोना चाचणी केल्या गेल्या नाहीत. त्यामुळं कोरोना बाधितांच्या एकूण संख्येचा अंदाज लावणं शक्य नाही. याआधी निर्वाणी आखाड्याचे संत कपिल देव यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. मागील आठवड्यात हरिद्वार कुंभमध्ये स्नानासाठी लाखोच्या संख्येनं भाविक जमले. यादरम्यान कोरोना रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली. महामंडलेश्‍वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना डेहराडून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं त्या ठिकाणीच उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळं कुंभमेळाच संपविण्याचा निर्णय विवेकबुद्धीनं होत असेल, तर त्याचं स्वागत करायला हवं. कोरोनाबाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. बुधवारी हजारो साधूंनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दिलेला इशारा धुडकावून हरिद्वारमधील हर की पैरी येथे गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरं शाहीस्नान केलं. सामाजिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करून दुसर्‍या शाहीस्नानालाही साधूंसह अन्य भाविकांनी गर्दी केली होती. शाही स्नानासाठी साधू संतांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी कुंभात कोरोनाचा स्फोट झालेला आहे. निर्वाणी आखाड्याच्या प्रमुखांसह जवळपास 68 टॉपच्या साधू संतांना कोरोनानं गाठलं. कपिलदेव दास यांच्या निधनानंतर कुंभ मेळ्यातून बाहेर पडण्याची घोषणा निर्वाणी आखाड्यानं केलेली आहे. कुंभ समाप्तीचीच घोषणा त्यांनी केली आहे. निर्वाणी आखाडा हा 13 पॉवरफुल आखाड्यांपैकी दोन नंबरचा शक्तीशाली आखाडा मानला जातो. हा नागा साधूंचा जुन्या आखाड्यानंतरचा महत्वपूर्ण आखाडा आहे. त्यामुळं निर्वाणी आखाड्याचा निर्णय कुंभावर परिणाम करणारा आहे.

COMMENTS