Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारायण राणेंविरोधात नाशिक, महाड, पुण्यात गुन्हे दाखल ; अटकेची टांगती तलवार

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्या विरोध

उद्धव ठाकरे हे देशाचे नेते… नेतृत्व करण्याचीही क्षमता… राऊतांची स्तुतीसुमने…
राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ
शिवसेनेशी युतीची शक्यता आता मावळली- मुनगंटीवार

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्या विरोधात आता नाशिक, महाड आणि पुणे येथील शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. त्यानंतर तीन ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याबरोबरच राणेंना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी नाशिकहून पोलीस कोकणात रवाना देखील झाले आहेत. दरम्यान राणेंविरोधात राज्यभरातील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. तसेच राणेंच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहेत.

शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाडमध्येही राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना पदाधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी फिर्याद दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणी तपास करत आहेत. याशिवाय भाजपा कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह १०० ते १२५ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते राणे

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावरही त्यांनी टीका केली. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं राणे म्हणाले होते.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असेही राणे यांनी म्हटले होते.

COMMENTS