अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या टाळेबंदीत व्यापारी व दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नवरात्र उत्सवात केडगाव येथील रेणुका माता मंदि
अहमदनगर (प्रतिनिधी)-
कोरोनाच्या टाळेबंदीत व्यापारी व दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नवरात्र उत्सवात केडगाव येथील रेणुका माता मंदिर परिसरात लावण्यात येणार्या विविध स्टॉलला परवानगी देण्याची मागणी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल महाराज कोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी नगरसेवक अमोल येवले, अक्षय पाटेकर, मन्सूर शेख, रियाज शेख, बाळासाहेब पाटेकर, फारूक मनियार, कमलेश जव्हेरी, सुनील जव्हेरी, राजू खोडदे, जमीर शेख आदिंसह फाऊंडेशनचे सदस्य व दुकानदार वर्ग उपस्थित होते.
केडगावच्या रेणुका माता मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो. मागील वर्षापासून कोरोनामुळे हा उत्सव होऊ शकलेला नाही. या उत्सवामध्ये मंदिर परिसरात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले दुकानदार व्यावसायिक आपले स्टॉल लावत असतात. ग्राहक वर्ग देखील या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात.
कोरोनाच्या टाळेबंदीत व्यापारी व दुकानदार यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने दुकानदारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केडगाव देवीच्या मंदिर परिसरात लावण्यात येणार्या दुकानांच्या स्टॉलला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर सर्व कोरोना नियमांचे पालन करुन दुकानदार आपला व्यवसाय करणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
COMMENTS