नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखाधिकार्‍यांची आत्महत्या ; बनावट सोनेतारणाचा संदर्भ ?, पोलिसांकडून मौन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखाधिकार्‍यांची आत्महत्या ; बनावट सोनेतारणाचा संदर्भ ?, पोलिसांकडून मौन

अहमदनगर/शेवगाव-प्रतिनिधी- नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या शेवगाव शाखेत झालेल्या बनावट सोनेतारण कर्जाचा पर्दाफाश करणारे शेवगाव शाखेचे व्यवस्था

 बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्था सभासदांना देणार १२ टक्के लाभांश- श्री वसंत कवाद
व्यक्ती मरते पण विचार कायम जिवंत असतात ः प्रा. किसन चव्हाण
मराठी भाषा सर्व विद्याशाखेत बारावीपर्यंत सक्तीची ः प्रा. डिसले

अहमदनगर/शेवगाव-प्रतिनिधी- नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या शेवगाव शाखेत झालेल्या बनावट सोनेतारण कर्जाचा पर्दाफाश करणारे शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. 27 रोजी दुपारी उघडकीस आली. दरम्यान, शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, तिच्यातील मजकुराबाबत पोलिसांकडून मौन बाळगले जात आहे. तपास सुरू आहे, एवढेच पोलिसांकडून सांगितले जात असल्याने संशय वाढला आहे. बँकेच्या शेवगाव शाखेत घडलेल्या बनावट सोनेतारण प्रकरणाचा संदर्भ या आत्महत्या प्रकरणाशी असल्याची चर्चा आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) हे दि. 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त झाले होते. मात्र, बँक प्रशासनाने त्यांचा सेवाकाळ तीन महिन्यांसाठी वाढवून दिला होता. मंगळवारी (दि. 27) सकाळीच शिंदे हे घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून ते घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान शेतामध्ये त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या दुदैवी घटनेची माहिती शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात समजताच खळबळ उडाली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता, त्यानंतर त्यांचा मृतदेह नगर येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.
आत्महत्येपूर्वी शिंदे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काय मजकूर आहे, ते समजू शकले नाही. यामुळे चिठ्ठीत कोणाची नावे आहेत काय, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, याबाबत पोलिसांकडून मौन पाळले जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस बी.बी. शेळके करीत आहे.

बनावट सोन्याचे प्रकरण
आत्महत्या केलेले शाखा व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांनीच 2018मध्ये शेवगाव शाखेमध्ये सोने तारण कर्जातील बहुतांश तारण सोने बनावट असल्याचा पर्दाफाश केला होता. त्यावेळेला शिंदे यांनी नगरमधील बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्र देऊन ही बाब निदर्शनास आणली होती. त्या वेळेला हा विषय चांगलाच गाजला होता. मात्र, त्यानंतर तीन वर्ष उलटून गेले तरीही कोणीही याची दखल घेतली नाही. नंतर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन बँकेवर प्रशासक नियुक्ती झाल्यानंतर शेवगाव बनावट सोने तारण प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीसह बहुतांश सभासदांनी केली होती. त्यामुळे प्रशासकांनी नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये तारण ठेवलेल्या 364 पिशव्यांची तपासणी केल्यावर त्यातील 7-8 पिशव्या वगळता अन्य पिशव्यांतून बनावट म्हणजे बेन्टेक्सचे दागिने असलेल्या पिशव्या आढळून आल्या होत्या. मात्र, त्या संदर्भातला गुन्हा अद्यापपर्यंत दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे सोमवारी (26 जुलै) बँकेचे काही अधिकारी हा गुन्हा दाखल करण्यासाठी शेवगाव पोलिस ठाण्यामध्ये गेले होते. मात्र, या बनावट पिशव्या नगरमधील तपासणीत उघडकीला आलेल्या आहेत, त्यामुळे हा गुन्हा नगर येथे दाखल करावा, असा विषय शेवगाव पोलिसांकडून झाला असल्याची माहिती पुढे आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर बनावट सोनेतारण कर्ज प्रकरण उघडकीस आणणार्‍या अधिकार्‍यानेच आता आत्महत्या केल्याने बनावट सोनेतारणाचा हा पहिला बळी मानला जात आहे. नगर अर्बन को-ऑपरेटिव बँकेचा कारभार सर्वत्र गाजत असताना मंगळवारी घडलेल्या या घटनेने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे बनावट सोने तारणाचा विषय आता पुन्हा गाजणार आहे.

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
नगर अर्बन बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर शेवगाव शाखेतील सोनेतारण पिशव्यांचा लिलाव करण्याचा निर्णय झाला. एक-दीड वर्षांपूर्वी शेवगावमध्ये असा लिलाव जाहीर केल्यावर व त्यावेळी उघडलेल्या पहिल्या तीन पिशव्यांतूनच बनावट सोने निघाल्यावर तो लिलाव व तपासणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्यामध्ये या शाखेतील राहिलेल्या 364 सोनेतारण पिशव्यांचा नगरला लिलाव आयोजित केला व त्यावेळी झालेल्या तपासणीत यातील बहुतांश पिशव्यांतील तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचाही प्रशासनाने निर्णय घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर आता शिंदे यांनी आत्महत्या केल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. त्यातच शिंदे यांनी मृत्यूपूर्वी जी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे, त्यामध्ये कोणाची नावे आहेत काय, ती नेमकी कोणा कोणाची आहेत, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. याशिवाय या चिठ्ठीत नेमका त्यांनी काय मजकूर लिहिलेला आहे, हेही कळू शकले नाही. या संदर्भामध्ये शेवगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, तपास सुरू आहे, असे फक्त सांगितले गेले. त्यामुळे बनावट सोने तारण गुन्ह्याचा विषय जो समोर आलेला आहे, त्या संदर्भामध्ये आता पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागलेले आहे.

COMMENTS