धोक्याचा इशारा

Homeमहाराष्ट्रसंपादकीय

धोक्याचा इशारा

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली.

पोलिसांनी वसूल केला 23 लाख रुपयांचा दंड
तालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; आ. जगतापांनी घातले पवारांना साकडे
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन मंत्र्यांचा सहभाग

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. तेथील नेत्यांना विशेष राज्याच्या दर्जाची मागणी आता मान्य होणार नाही, याची जाणीव झाली आहे. दुसरीकडे काश्मीरमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करून निवडणूक घेण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे. अफगाणिस्तानातून अमेरिका आपले सैन्य मागे घेत असताना दुसरीकडे भारत तालिबानशी चर्चा करतो आहे.

अफगाणिस्तानमधील संभाव्य सत्तांतरात तालिबानची असलेली भूमिका आणि अमेरिकेची इच्छा लक्षात घेऊन भारताने चर्चा सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर काश्मीरमध्येही शांतता राहायला हवी आहे. त्यासाठी तर ज्यांची संभावना दहशतवादी किंवा दहशतवाद्यांचे समर्थक अशी केली, त्यांच्यांशी सरकारने चर्चा सुरू केली. काश्मीरमध्ये वाटाघाटी सुरू होताच पाकिस्तानचे पित्त खवळले. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टेकन फोर्सने पाकिस्तानचा समावेश करड्या यादीत केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला जगातून मदत आणि गुंतवणूक मिळण्यातही मोठी अडचण आहे. महागाई आणि कोरोनामुळे पाकिस्तानमध्ये अगोदरच प्रचंड रोष आहे. तिथेही दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर अंतर्गत प्रश्‍नावरून लक्ष विचलीत करण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा भारतद्वेषाची उबळ येते. त्याबाबतची मळमळ तिथले पंतप्रधान इम्रान खान यांच्या तोंडून नुकतीच बाहेर आली होती. गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानने काश्मीरमध्ये वारंवार कुरापती केल्या असल्या, तरी त्याला फार यश आले नाही. पुलवामा हल्ला, पठाणकोट हल्ला अशा कुरापती पाकिस्तानने काढल्या होत्या. पाकिस्तानला अमेरिका पूर्वीइतके महत्व दिले जात नाही. आर्थिक मदतही मिळत नाही. चीनच्या मदतीवर सारे निभावून नेता येत नाही. त्यामुळे देश अडचणीत असताना वस्तुस्थितीला सामोरे जाण्याऐवजी काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्यात पाकिस्तान धन्यता मानीत आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने शस्त्रसंधीच्या कराराचे चार हजारांहून अधिक वेळा उल्लंघन केले आहे. एकीकडे मनात धाक आणि दुसरीकडे आगळीक अशी पाकिस्तानची स्थिती आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये

निवडणुका झाल्या, तिथे लोकनियुक्त सरकार आले, की भारताविरोधात गरळ ओकण्याचा एक मुद्दा हातचा जातो. त्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मूतील हवाई दलाच्या तळावर हल्ला केल्याची शक्यता आहे. हवाई दलाच्या वरिष्ठांनीही तसे स्पष्ट सांगितले. जम्मूतील एअरफोर्स स्टेशनमध्ये दोन छोटेसे स्फोट झाले. 26-27 जूनच्या मध्यरात्री पाच मिनिटाच्या अंतराने हे स्फोट झाले. या स्फोटाची तीव्रता कमी होती; पण ज्या पद्धतीने ते झाले, ते मात्र गंभीर आहे. दोन्ही स्फोट पाच मिनिटाच्या फरकाने झाले. पहिला स्फोट हा एअरफोर्सच्या एका इमारतीच्या छतावर एक वाजून 37 मिनिटांनी झाला, तर दुसरा स्फोट एक वाजून 42 मिनिटांनी. पहिला स्फोट छतावर झाला असला, तरी दुसरा मात्र मोकळ्या जागेत झाला. दोन जवान किरकोळ जखमी झाले. स्फोटानंतर काही वेळातच सुरक्षा जवानांनी संपूर्ण भागाची नाकेबंदी केली. त्यातून अजून काही हाती लागलेले नाही. जम्मू एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात स्फोटके वापरण्यासाठी ड्रोनचा वापर झाला असावा, अशी शंका बळावत चालली आहे. जम्मू एअरफोर्स स्टेशनपासून पाकिस्तानची सीमा 14 किलोमीटर दूर आहे आणि ड्रोनचा वापरत करत असा हल्ला 12 किलोमीटरपर्यंत करता येऊ शकतो. पहिला स्फोट इमारतीच्या छतावर आणि दुसरा स्फोट हा मोकळ्या जागेत झाला असला, तरीसुद्धा टार्गेट एअरफोर्सची विमाने असावीत असा संशय आहे. प्रत्यक्षात कुठल्याच विमानाचे नुकसान झालेले नाही. अशा हल्ल्यात ज्या ड्रोनचा वापर केला जातो, ती सहसा रडारवर येत नाहीत, त्यामुळेही हा हल्ला होताना तो लक्षात आला नाही. या हल्ल्यानंतर पठाणकोट, अंबाला, अवंतीपुरा इथल्या एअरबेसवर अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी जम्मू एअर फोर्स स्टेशनवर रविवारी झालेले दोन हल्ले ’दहशतवादी’ असल्याचे म्हटले आहे. पोलिस, हवाई दल आणि दुसर्‍या तपास संस्था या हल्ल्याचा तपास करत आहेत. जम्मू एअर फोर्सच्या तांत्रिक भागात स्फोट झाला. हा स्फोट कमी तीव्रतेचा आहे. एअर फोर्स स्टेशनच्या तात्रिक विभागाचा वापर भारतीय वायुसेना करते. तिथेच हे स्फोट झाले. जम्मू विमानतळाची धावपट्टी आणि वाहतूक नियंत्रण भारतीय वायुसेनेच्या नियंत्रणात आहे. इथून सर्वसामान्य प्रवाशांच्या विमानांचेही उड्डाण होते. दरम्यान, स्फोट झालेल्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून, त्यांनी चौकशी सुरू केली आहे. या पथकाने काही गोष्टी तिथून जमाही केल्या आहेत. मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न फसला. जम्मू पोलिसांनी 5-6 किलो वजनाचा एक आयईडी ताब्यात घेतला आहे. हा आयईडी लष्करच्या एका एजंटला मिळाला होता. शहरातील गर्दीच्या एखाद्या ठिकाणी हा आयईडी लावण्याचा त्याचा प्रयत्न होता. हा आयईडी पोलिसांच्या ताब्यात आल्याने मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न फसला आहे. पकडण्यात आलेल्या संशयित व्यक्तीची चौकशी सुरू आहे. अधिक माहिती हातात आल्यानंतर इतरही काही संशयितांना अटक केली जाऊ शकते. इतर तपास संस्थांसोबत जम्मू पोलिस एअर फोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा तपास करत आहे. जम्मू एअर फोर्स स्टेशनवर झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेली स्फोटके ड्रोनचा वापर करून टाकण्यात आल्याचा संशय असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय हवाई दलाची या भागातील ही अत्यंत महत्त्वाची अशी मालमत्ता आहे. कारण विविध भागांशी हे जोडलेले असून याठिकाणाहूनच विविध गोष्टींचा पुरवठाही केला जातो. माल वाहतुकीसाठी वापरले जाणारे बहुतांश हेलिकॉप्टर आणि आपत्तीच्या काळात मदतीसाठीच्या अनेक मोहिमाही याच बेसवरून राबवल्या जातात. त्यामुळे हे विमानतळ आणि एअरफोर्स स्टेशन अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे त्यावरच हल्ला करण्याचा मोठा कट असावा. 

 

COMMENTS