दोन्ही डॉक्टर कृष्णेला लागलेले राहू-केतू : अविनाश मोहिते

Homeमहाराष्ट्रसातारा

दोन्ही डॉक्टर कृष्णेला लागलेले राहू-केतू : अविनाश मोहिते

कृष्णा कारखान्याची साधन संपत्ती वापरून डॉ. सुरेश भोसले यांनी जयवंत शुगर हा खाजगी कारखाना उभारला.

पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना : राजेश टोपे
सांगली – पुरग्रस्तांना मदत न मिळाल्याने चक्काजाम आंदोलन
20 गुंठे जमिनीसाठी डोंबिवलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या | LOKNews24

इस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याची साधन संपत्ती वापरून डॉ. सुरेश भोसले यांनी जयवंत शुगर हा खाजगी कारखाना उभारला. त्याचमार्गाने जावून डॉ. इंद्रजीत मोहिते यांनाही कृष्णा कारखाना मोडीत काढून त्यास आपला खासगी कारखाना बनवायचा आहे. त्यासाठी लागणारा खासगी कारखाना उभारणीचा परवाना त्यांनी अगोदरच मिळविला असल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी गोवारे, करवडी, वारुंजी, नांदलापुर, भुरबुशी, येळगांव, येणपे, येवती, जिंती, घोगांव, टाळगाव (ता. कराड) येथील संस्थापक पॅनेलच्या प्रचारादरम्यान सभासद बैठकीत बोलताना केला.
मोहिते म्हणाले, दोन्ही डॉक्टर कारखान्याच्या मागे लागलेले राहू-केतू आहेत. भोसले यांनी कृष्णा उद्योग समूहातील सहकारी संस्था मोडीत काढून जयवंत शुगर ही आपली खासगी जहागिरी निर्माण केली. नामसदृष ट्रस्टची स्थापना करून ट्रस्ट तुमचाच असल्याचे सभासदांना भासविले. सभासदांच्या पैशातून निर्माण झालेला कृष्णा चॅरीटेबल ट्रस्ट पचविला. कारखान्याच्या सभासदांना अक्रियाशील बनवून, राजीनामे घेऊन कृष्णा कारखान्यास त्यांना जयवंत शुगरचे युनिट नंबर दोन बनवायचे आहे.
डॉ. इंदाजित मोहिते यांचा प्रवासही त्याचमार्गाने सुरु आहे. डॉ. मोहिते यांनी कारखान्याच्या दीडशे एकर जमिनी आणि कृषी कॉलेज स्व. भाऊंच्या नावाने नोंदणी केलेल्या खासगी ट्रस्टच्या नांवे केले होते. ते हडप करण्याचा डाव आपल्यामुळे फसला. डॉ. मोहिते यांना कृष्णा कारखान्याची जर काळजी आहे, सहकारी साखर कारखानदारी टीकावी असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी खासगी साखर कारखाना काढण्याचा परवाना कशासाठी घेतला आहे? याचा खुलासा त्यांनी कृष्णाच्या सभासदासमोर करायला हवा अशी मागणी करून, दोन्ही डॉक्टरांनी कितीही प्रयत्न केले तरी आपल्या जीवात जीव असेपर्यत कारखान्याचे खासगीकरण होवू देणार नसल्याचा निर्धार अविनाश मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जयवंत पाटील, सुरेश पाटील, उमेश माने, अ‍ॅड. चंद्रकांत कदम, प्रकाश देशमुख, शिवाजी सावंत, शिवाजी पाटील, भारत पाटील, किशोर पाटील, प्रविण पाटील, डॉ. रणजीत पाटील, संभाजी पिसाळ, सागर जाधव, निवास पवार, सुशांत यादव उपस्थित होते.

डॉक्टरांना पराभवाची चाहूल….
दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या निवडणुकीत होणार्‍या पराभवाची चाहुल अगोदरच लागली असल्याने त्यांनी आमच्या व्यासपीठावर बोलणार्‍या कार्यकत्यांना आर्थिक अमिषे दाखविण्यास सुरवात केली आहे. मात्र, कारखान्याची निवडणूक ही सभासदांनी आपल्या हाती घेतली असल्याने संस्थापक पॅनेलचा विजय निश्‍चित असल्याचे अविनाश मोहिते म्हणाले.

COMMENTS