देशमुखांवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी ; राज्य सरकार निर्णयाप्रत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुखांवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी ; राज्य सरकार निर्णयाप्रत

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या टार्गेटच्या आरोपाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले आहे.

संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव
इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी
लेक-जावई असताना कोपरगावला दुजाभाव का? ; राजेश परजणे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुलेंना सवाल

मुंबई/प्रतिनिधीः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या टार्गेटच्या आरोपाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले आहे. त्याबाबतचा आदेश लवकरच निघणार आहे. दरम्यान, होळीनंतर राज्य सरकार खांदेपालट करणार असून देशमुख यांच्याकडील गृहखाते काढून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या नेत्याकडे सोपविले जाणार असल्याचे समजते. 

सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर आता देशमुख अडचणीत सापडले आहेत. सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारने एका निवृत्त न्यायाधीशांच्या चौकशी समितीमार्फत चौकशी करण्याचे ठरविले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग यांनी पत्रात केलेल्या गंभीर आरोपांची राज्य सरकारने दखल घेतली आहे. राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे.

आघाडी सरकारमधील विश्‍वसनीय सूत्रांनी असेही सूचित केले आहे, की सध्यातरी देशमुख यांना आपल्या पदावरून हटविले जाणार नाही. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. त्या वेळी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

येत्या गुरुवारी सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला येईल. त्याच दिवशी समन्वय समितीची बैठक होऊन महत्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सिंग यांनी पत्रात उल्लेख केलेल्या सचिन वाझे आणि देशमुख यांच्या भेटीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ’या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे म्हणत देशमुखांचा राजीनामा घेणार नाही’, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे भाजपने देशमुख-वाझे यांची भेट झालीच होती, असा दावा केला आहे. देशमुख यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत फेब्रुवारी महिन्यात काय काय घडले याचा एक घटनाक्रमच सांगितला आहे. त्यांनी असे म्हटले आहे, की चार ते 15 फेब्रुवारी दरम्यान ते नागपूरच्या रुग्णालयामध्ये भरती होते. त्यांनंतर 15 फेब्रुवारी रोजी मुंबईला जाण्यासाठी विमानप्रवास केला. त्यानंतर ते त्यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी विलगीकरणात होते.

एप्रिलमध्ये खांदेपालट

देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यांच्या खात्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. 

COMMENTS