दारू वाहतूक करणार्या वाहनांवर पाळत ठेवून व त्यांचा पाठलाग करून त्यांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडली.
अहमदनगर/प्रतिनिधी- दारू वाहतूक करणार्या वाहनांवर पाळत ठेवून व त्यांचा पाठलाग करून त्यांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडली. या कारवाईत चौघांना अटक केली असून त्यांच्याकडील चोरीचा मोबाईल जप्त केला.
ही कारवाई नगर मनमाड रोडवरील चिंचोली फाटा (ता. नगर) येथे केली. याबाबतची माहिती अशी की अन्सार हसन पठाण (वय 26, माणिकदौंडी, पाथर्डी) हे आयशर टेम्पोमध्ये (क्रमांक एमएच 14 डीएम 800) चिखलठाणा (एमआयडीसी औरंगाबाद) येथून विदेशी दारूचे बॉक्स भरून क्लिनर अमोल काळे याच्यासह औरंगाबादहून नगर रोडने कोल्हापूरकडे जात असताना रात्री इमामपूर घाटामध्ये चौघांनी टेम्पोला कार आडवी घातली व टेम्पो थांबवून काळे याला खाली ओढून मारहाण केली आणि छर्याच्या बंदुकीचा धाक दाखवून टेम्पो तसेच त्यातील दारूचे बॉक्स, काळेचा मोबाईल असा दहा लाख तीस हजार रुपयाचा माल चोरून नेला. ही घटना घडताच अन्सार पठाणने 100 नंबरवर डायल करून पोलिस नियंत्रण कक्षात माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ चोरीस गेलेल्या टेम्पोमध्ये असलेल्या जीपीएस प्रणालीवरून टेम्पोचे लोकेशन घेतले व मनमाड रोडवरील चिंचोली फाटा येथे टेम्पो असल्याची माहिती मिळवली. ही माहिती पोलिसांना देऊन रवाना केले. पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी टेम्पो सोडून पसार झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून स्वप्निल उर्फ भूषण सुनील गोसावी (वय 21, राहणार ऐश्वर्या देवी मंदिराजवळ, देवीरोड, सिन्नर, नाशिक) याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा संतोष खरात, गणेश कापसे, भारत सुतार यांच्या मदतीने केला असल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून संतोष उर्फ बापू पंडित खरात (वय 19, राहणार सटाणा, नाशिक), कुलदीप उर्फ गणेश मनोहर कापसे (वय 38, राहणार अश्वमेध कॉलनी, आरटीओ ऑफिसजवळ, नाशिक), भारत सीताराम सुतार (वय 36, राहणार टाऊनशिप, आंबेडकरनगर, ओझर, निफाड, नाशिक) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अमोल काळे याचा चोरलेला दहा हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला. अटक आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, हवालदार मनोहर गोसावी, पोलिस नाईक सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोंढे, शिवाजी ढाकणे, चालक पोलिस हवालदार संभाजी कोतकर यांनी केली आहे.
COMMENTS