दर रविवारी सकाळी होते स्वच्छता अभियान ; मनपाच्यावतीने धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा गौरव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर रविवारी सकाळी होते स्वच्छता अभियान ; मनपाच्यावतीने धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेवून देशाला स्वच्छतेचा संदेश दिला असल्याने या संकल्पनेतून शहरातील धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्यावतीने दर रविवारी सकाळी सलग 36 आठवडे शहरात स्वच्छता अभियान राबवले.

मराठा वधू-वर मेळाव्याचे आयोजन
श्रद्धा व विकासाची सांगड घालून शिर्डीचे महत्व वृद्धिंगत करणार
अन्यथा गढूळ पाणी मुख्याधिकारी यांना पिण्यास भाग पाडू – दत्ता काले

अहमदनगर/प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेवून देशाला स्वच्छतेचा संदेश दिला असल्याने या संकल्पनेतून शहरातील धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्यावतीने दर रविवारी सकाळी सलग 36 आठवडे शहरात स्वच्छता अभियान राबवले. या अभियानात महापुरूषांचे पुतळे, उद्याने, रस्ते, शाळांचा परिसर, स्मशान भूमी, इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले गेले. सकारात्मक दृष्टीकोनातून व सामाजिक बांधीलकीतून हा उपक्रम राबविला गेला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल महापालिकेच्यावतीने प्रतिष्ठानचा नुकताच गौरव करण्यात आला.

अहमदनगर महापालिकेने धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्यावतीने सलग 9 महिने स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल प्रतिष्ठानचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, सभागृह नेता रवींद्र बारस्कर, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, नगरसेवक राहुल कांबळे, माजी नगरसेवक निखील वारे व सचिन जाधव तसेच संजय ढोणे, भाजपचे नेते अ‍ॅड. विवेक नाईक, सतीश शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे, पुष्कर कुलकर्णी, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर वाकळे म्हणाले, आपण सर्वजण कोरोनाच्या कठीण काळातून जात असताना नालेगावातील धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या युवकांनी पुढे येवून समाजासमोर स्वच्छतेचा नवा आदर्श ठेवला आहे. इतर मंडळांनीही या कामाचा आदर्श घ्यावा, असे सांगून ते म्हणाले, आपला परिसर स्वच्छ सुंदर असल्यास या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. प्रतिष्ठानचे हे स्वच्छता कार्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यासारखी असल्याचे गौरवोदगारही वाकळे यांनी व्यक्त केले. उपायुक्त डांगे म्हणाले की, शहर स्वच्छतेसाठी मनपा प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांनी स्वयंप्रेरणेचे सहभाग घेतल्यास शहर स्वच्छ होवून आरोग्य विषयक समस्या निर्माणच होणार नाहीत. धर्मवीर प्रतिष्ठानने केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाला मनपाचे नेहमीच सहकार्य राहील. शहरामधील ओला व सुका कचरा वेगळा होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे, असे ते म्हणाले. सभापती घुले म्हणाले की, प्रतिष्ठानने राबविलेले स्वच्छता अभियान समाजासाठी प्रेरणादायी आहे. भारत स्वच्छता अभियानामध्ये भाग घेवून समाजासमोर एक आदर्श ठेवला. विधायक कामासाठी समाज नेहमीच बरोबर येत असतो. अशा चांगल्या कामाला प्रोत्साहन मिळावे व पाठीवर शब्बासकीची थाप मिळावी यासाठीच या कौतुक सोहळयाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक वारे यांनी केले. आभार विजय चितळे यांनी मानले.

ओला-सुका कचरा जागृती करणार

यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष चितळे म्हणाले की, सर्व युवकांना बरोबर घेवून सलग 36 रविवारी शहरामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. आता ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी जनजागृती करू. प्लॅस्टिक मुक्तीसाठी प्रतिष्ठान काम करीत आहे. विविध सामाजिक संस्था, गणेश मंडळ, बचत गट यांना एकत्र घेवून शहरामध्ये स्वच्छतेचे महाअभियान राबविण्यासाठी आम्ही पुढाकार घेवू, असे ते म्हणाले.

COMMENTS