थकबाकी वसुलीसाठी बंद करणार  सांडपाणी मार्ग ; मुंबई महापालिकेचा अनोखा उपाय; मालमत्ताधारक रडारवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थकबाकी वसुलीसाठी बंद करणार सांडपाणी मार्ग ; मुंबई महापालिकेचा अनोखा उपाय; मालमत्ताधारक रडारवर

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे मुंबई महानगरपालिकेला कधी नव्हे ती पैशांची चणचण जाणवू लागली आहे.

महिला अत्याचारातील वाढ चिंताजनक
मुंबईतील शाळकरी मुलं मधुमेह आणि रक्तदाबाच्या विळख्यात
वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक आवश्यक: डॉ. भोसले

मुंबई / प्रतिनिधी: कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे मुंबई महानगरपालिकेला कधी नव्हे ती पैशांची चणचण जाणवू लागली आहे. त्यामुळे आता पालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी थकबाकीदारांकडून वसुली करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये मालमत्ता कर थकविणारे नागरिक आणि आस्थापने महापालिकेच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेने कर चुकवेगिरी होणाऱ्या मालमत्तांचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यानंतरही काहीजण वठवणीवर येण्यास तयार नसल्याने आता पालिकेने आणखी कठोर पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता या मालमत्तांची सांडपाणी वाहून नेणारे मार्ग बंद करण्यात येणार आहेत. 

मुंबईतील अनेक मालमत्तांचा कर थकलेला आहे. या माध्यमातून महापालिकेला जवळपास 20 हजार कोटी रुपयांचा निधी येणे बाकी आहे. त्यामुळे आता पालिकेने चार बडया थकबाकीदारांवर सर्वप्रथम कारवाईचा बडगा उभारला. यामध्ये वांद्रे येथील के विभागातील एका हॉटेलचा समावेश आहे. या हॉटेलने जवळपास 8.7 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. आगामी काळात मुंबईतील इतर थकबाकीदारांवरही अशाचप्रकारची कारवाई होण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर न भरणाऱ्यांची चल संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दुचाकी, चारचाकी, विविध प्रकारची वाहने, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यासारख्या वस्तू जप्त करण्यात येत आहेत. या वस्तू जप्त केल्यानंतर पाच दिवसांच्या आत थकीत कराची वसुली न झाल्यास या वस्तूंचा जाहीर लिलाव करून त्याद्वारे थकीत कराची वसुली करण्याची तदतूद करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची देयके प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. जे मालमत्ता धारक 90 दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांच्यावर टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. त्याचबरोबर मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर आवर्ती पद्धतीने दरमहा दोन टक्के या दराने दंड आकारणी करण्यासदेखील सुरुवात केली जाते.  टप्पेनिहाय कारवाई अंतर्गत सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात, तरीही देयक अदा न केल्यास ‘डिमांड लेटर’ पाठविले जाते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात 21 दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ता धारकास दिली जाते. त्यानंतरच्या टप्प्यात मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग ‘सील’ (मोहोरबंद) करण्याची कारवाई; त्यानंतर मालमत्ता व्यवसायिक स्वरुपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाई आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मालमत्ता अटकावणीची कारवाई करण्यात येते.

मालमत्ता विकून थकबाकी वसुली

या व्यतिरिक्त ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888’ मधील कलम 204 व 205 अन्वये दुचाकी, चारचाकी, वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यासारख्या चल संपत्ती असणाऱ्या बाबी जप्त करण्याची कारवाईदेखील गेल्या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. यानुसार या वस्तू जप्त केल्यानंतरही थकीत कराची वसुली पाच दिवसांत न झाल्यास या वस्तूंचा जाहीर लिलाव करून त्याद्वारे थकीत करांची वसुली केली जाते.

COMMENTS