त्यांना आणणार पोलिस ठाण्यात आणि… ; पोलिस राबवणार अभिनव प्रयोग, लॉकडाऊनची केली तपासणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्यांना आणणार पोलिस ठाण्यात आणि… ; पोलिस राबवणार अभिनव प्रयोग, लॉकडाऊनची केली तपासणी

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहर व जिल्ह्यात जनता कर्फ्यू सुरू झाला आहे व त्याचबरोबर लॉकडाऊनचे निर्बंधही अधिक कडक केले गेले आहेत. अशा स्थितीत रस्त्याने कोण

ब्राम्हणगावात पोलिसांचे संचलन
आरबीआयच्या पथकाकडून ’नगर अर्बन’मध्ये तपासणी
सोळाशे कोटी रुपयांचे बेकायदा दगड उत्खनन? : राज्यपालांकडे गायके यांची तक्रार

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहर व जिल्ह्यात जनता कर्फ्यू सुरू झाला आहे व त्याचबरोबर लॉकडाऊनचे निर्बंधही अधिक कडक केले गेले आहेत. अशा स्थितीत रस्त्याने कोणी विनाकारण पायी, दुचाकीवर वा चारचाकीतून फिरताना सापडल्यास त्याला पोलिस ठाण्यामध्ये आणले जाणार आहे व त्याची चौकशी करताना त्याचे फिरण्याचे कारण योग्य नसल्याचे आढळल्यास त्याचे समुपदेशन करणार आहेत. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व पोलिस अधीक्षक पाटील यांनी रविवारी (18 एप्रिल) दिवसभर शहरात फिरून लॉकडाऊन नियमांच्या अंमलबजावणीची पाहणी केली. चौका-चौकात बंदोबस्ताला तैनात पोलिसांच्या कामाचीही पाहणी केली. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे व लॉकडाऊनचे निर्बंधही कडक केले गेले आहेत. फक्त औषध दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असून, अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजी विक्री, खाद्यपदार्थ विक्रीलाही चार तासांचा अवधी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी पहिल्या दिवशी जनता कर्फ्यू व लॉकडाऊन निर्बंधांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पोलिस अधीक्षक पाटील यांनी मोठ्या फौजफाट्यासह केली. त्यांनी एक प्रकारे संचालन करून बंदचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी भोसले यांनी नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले तर पोलिस अधीक्षक यांनी, विनाकारण फिरणारांचे आता समुपदेशन पोलिस करणार असल्याचे स्पष्ट केले. आपण घराबाहेर पडल्यामुळे कशा पद्धतीने हानी होऊ शकते, याची माहिती त्यांना देणार असल्याचेही सांगितले.

शहरभर पाहणी

शनिवार व रविवार असल्यामुळे जनता कर्फ्यूच्या काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याची खातरजमा करण्यासाठी पोलिस अधीक्षक पाटील यांनी नगर शहरातील पाईपलाईन रोड व सावेडी भागांमध्ये दुपारी पोलीस फौजफाट्यासह फेरी मारून बंदचा आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पाईपलाईनरोड, सावेडी, तारकपूर एसटी चौक, भिंगार कॅम्प, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, माळीवाडा व पुणे बसस्थानक, माळीवाडा परिसर, कापड बाजार, नवी पेठ, चितळे रोड, दिल्ली गेट या मार्गाने पोलिस पथकाने वाहनांतून संचलन करून बंदचा आढावा घेण्यात आला होता. सुमारे 20 हून अधिक वाहने या अधिकार्‍यांच्या ताफ्यामध्ये होती.

कोट

सकाळी सात ते अकरा एवढया कालावधीमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा दिली आहे. यातही कोविड नियमांचा वापर केला पाहिजे. फक्त मेडिकलसंदर्भात पूर्णवेळ सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण कोणीही बाहेर पडू नये. नवीन नियमानुसार एक तारखेपर्यंत सकाळी अकरानंतर लॉकडाऊन  राहणार आहे.

-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

कोट-2

अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडले पाहिजे. विनाकारण बाहेर पडत असेल तर त्यांना अटकाव केला जाईल. वेळप्रसंगी त्यांना पोलीस ठाण्यांमध्ये नेऊन त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाईल. विनाकारण बाहेर पडणारांना आत्मपरीक्षण मिळावे म्हणून पोलिस ठाण्यात आणून त्यांचे समुपदेशनसुद्धा करणार आहोत.

-मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

चौकट

त्यांना दिली समज

माळीवाडा बस स्थानकाच्या बाहेर काही कार्यालये उघडी होती. यावेळी पोलीस अधीक्षक पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ ती कार्यालये बंद करा. अन्यथा, तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले तसेच माळीवाडा येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये जिल्हाधिकारी भोसले व पोलीस अधीक्षक पाटील यांनी समक्ष जाऊन त्या दुकानांमध्ये जाऊन नेमक्या कोणत्या वस्तू दिसतात याची माहिती घेतल्यावर त्या ठिकाणी स्टेशनरी व अन्य साहित्याचीसुद्धा विक्री केली जात असल्याचे आढळून आल्यानंतर संबंंधित दुकानदाराला तेथून स्टेशनरी साहित्य हटविण्यास सांगितले व फक्त मेडिकलची औषध विका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. पुढच्या तपासणीत येथे स्टेशनरी साहित्य आढळल्यास आपल्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सुद्धा संबंधित मेडिकल चालकाला दिला गेला.

COMMENTS