तीन-चारजणांनी नगर अर्बन बँकेवर निवडणूक लादली ; माजी संचालक गांधींचा आरोप, रिंगणात आतापर्यंत 58 जण उमेदवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन-चारजणांनी नगर अर्बन बँकेवर निवडणूक लादली ; माजी संचालक गांधींचा आरोप, रिंगणात आतापर्यंत 58 जण उमेदवार

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या 2014 ते 2019दरम्यानच्या तत्कालीन सत्ताधारी पॅनेलमधील 75 टक्के संचालकांना आपली चूक कळली व त्यांनी प्रामाणिकपणे

नगर अर्बन बँकेची ठप्प वसुली खंडपीठात ;सहकार आयुक्तांसह पोलिस अधीक्षकांना नोटीस
माझा दोष नाही…माझी फसवणूक झाली…मला माफ करा…
शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या 2014 ते 2019दरम्यानच्या तत्कालीन सत्ताधारी पॅनेलमधील 75 टक्के संचालकांना आपली चूक कळली व त्यांनी प्रामाणिकपणे चूक स्वीकारत ते निवडणुकीपासून लांब राहिले आहेत, पण उरलेले 25 टक्के म्हणजे फक्त 3 ते 4 संचालकांच्या सत्तेच्या हव्यासापोटी बँकेवर निवडणूक लादली गेली आहे, असा आरोप नगर अर्बन बटाव कृती समितीचे प्रमुख व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केला. बँकेच्या अडचणीच्या काळात बँकेवर निवडणूक खर्चाचा प्रचंड बोजा पडणार आहे, असाही दावा त्यांनी केला. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी (29 ऑक्टोबर) आणखी 10 अर्ज दाखल झाल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या आता 58 झाली आहे.
नगर अर्बन बँकेच्या 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी (1 नोेव्हेंबर) उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबरला छाननी होणार असून, 12 नोव्हेंबर ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे व 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत गुरुवारपर्यंत 48जणांचे अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी बँकेचे माजी संचालक व नगरचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यासह सदा देवगावकर, ज्ञानेश्‍वर काळे, अक्षय बिहाणी, दत्तात्रय जोशी, पोपट साठे, कल्पना सुरपुरिया, रसिक कटारिया, गणेश राठी व प्रतीक मुथा या दहाजणांनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे निवडणूक रिंगणात आतापर्यंत 58 उमेदवार झाले असून, 1 नोव्हेंबरला शेवटच्या दिवशी आणखी किती अर्ज दाखल होतात, याची उत्सुकता आहे.

गांधींनी केली टीका
बँक बचाव कृती समितीच्या पॅनेलमध्ये सीए, अ‍ॅडव्होकेटस, प्राचार्य उमेदवार व यशस्वी उद्योजक प्रत्येकी 2, माजी नगराध्यक्ष व सहकारी बँकींगमध्ये दांडगा अभ्यास असलेले प्रत्येकी 3जण व 1 माजी उपनगराध्यक्ष असे उमेदवार देण्यात आले असून, प्रतिस्पर्धी पॅनेलने वडील, पत्नी, मुलगा, सून, पुतण्या, भाऊ असे उमेदवार दिले असल्याचा दावा करून माजी संचालक गांधी म्हणाले, बँक बचाव समिती व बँकेच्या जुन्या व ज्येेष्ठ माजी संचालकांनी दिलेले बिनविरोध निवडणुकीचे सर्व प्रस्ताव धुडाकावून लावत घाईघाईने स्वतःच्या घरातील सदस्यांसह उमेदवारी अर्ज प्रतिस्पर्ध्यांनी दाखल केले आहेत. केवळ तीन ते चार संचालकांच्या सत्तेच्या अट्टाहासामुळे बँकेवर लादलेल्या निवडणुकीला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. अवाढव्य निवडणूक खर्च टाळावा, निवडणुकीचे प्रचारादरम्यान प्रचाराची चिखलफेक होवून बँकेची प्रतिमा आणखी मलीन होण्यापासून वाचण्यासाठी बँक बचाव समिती दोन पावले मागे सरकायला तयार होती. परंतु सत्तेची चटक लागलेल्या 3 ते 4 संचालकांनी बँक बचाव समितीवर खोटी चिखलफेक करायला सुरुवात केली की बँक बचाव समितीला उमेदवार मिळत नाही व बँक बचाव समिती निवडणुकीला घाबरत आहे म्हणून. पण बँक वाचविण्याची बँक बचाव समितीची प्रामाणिक धडपड गेल्या 10 वर्षापासून बँकेचे सभासद पाहत आहेत, त्यामुळे बँक बचाव समितीला सभासदांचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही स्पष्ट आहे व रिझर्व्ह बँकेच्या अपात्रतेच्या शिफारशीची कारवाई कुठल्याही क्षणी होवू शकते हे पूर्ण माहीत असताना देखील हे तीन ते चार संचालक स्वतःसह आपल्या कुटुंबातील सदस्यांसह उमेदवारी करून बँकेवर निवडणूक लादत आहेत, असा आरोप गांधींनी केला.

ते खोटे ठरल्यास माघार घेऊ…
बँक बचाव समितीने रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांसोबत समक्ष मिटींग करून बँकेच्या वसुलीचा अ‍ॅक्शन प्लॅन सादर केला व बँक बचाव समितीची प्रामाणिक धडपड पाहून रिझर्व्ह बँकेने बँक बचाव समितीवर पूर्ण विश्‍वास दाखवत तुम्ही बँकेचे वसुलीचे काम नक्कीच करू शकताल व बँक नक्की वाचेल व त्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन देवून बँक बचाव समितीचा उत्साह वाढवला आहे, असे सांगून गांधी म्हणाले, पण बँक बचाव समितीची रिझर्व्ह बँकेत कुठलीच मिटींग झाली नाही, बँकेच्या साध्या सभासदांना रिझर्व्ह बँकेत प्रवेशच मिळत नाही, त्यामुळे बँक बचाव समितीने रिझर्व्ह बँकेत गेल्याचा पुरावा द्यावा, असे आव्हान बरखास्त सत्ताधारी संचालकांनी सोशल मीडियावर केले असल्याने माझे या बरखास्त सत्ताधारी संचालकांना आव्हान आहे की, त्यांनी समोरासमोर यावे. रिझर्व्ह बँकेत आमचा प्रवेश झाल्याचा व संबंधित अधिकार्‍यांशी मिटींग झाल्याचा पुरावा आम्ही देतो. आम्ही खोटे ठरल्यास आम्ही निवडणुकीतून माघार घेतो आणि तुम्ही खोटे ठरल्यास तुम्ही माघार घेणार का?, असे आव्हान देऊन गांधी म्हणाले, पण समोरासमोर येण्याचे आव्हान हे सत्तेचे भोगी कधीच स्वीकारणार नाही. कारण, स्पष्ट आहे की, ते नेहमीच खोटे बोलतात, असा दावाही गांधींनी केला.

गतवैभव मिळवून देणार
नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी नगर अर्बन बँक बचाव समितीच्यावतीने माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, भाजपचे ज्येष्ठ नेते सदाशिव देवगावकर, सीए. राजेंद्र काळे व अकोल्याच्या कल्पना सुरपुरिया यांनी उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केले. यावेळी समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सचिन पारखी, मनोज गुंदेचा, मेहूल भंडारी, संजय वलाकट्टी उपस्थित होते. अर्बन बँकेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे, असे आगरकर यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS