वेब टीम : काबूल पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपाच्या विरोधात काबूलमध्ये निदर्शने करणाऱ्या महिलांवर लाठीहल्ला केला. तालिबानच्य
वेब टीम : काबूल
पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपाच्या विरोधात काबूलमध्ये निदर्शने करणाऱ्या महिलांवर लाठीहल्ला केला.
तालिबानच्या या हिंसक कारवाईचे प्रक्षेपण करणाऱ्या पत्रकारांना अमानुष मारहाण केली. याचे एका पत्रकाराने केलेले ट्विट व्हायरल झाले आहे.
‘लॉस एंजलीस टाइम्स’चे पत्रकार आणि फोटोजर्नालिस्ट मरकस याम यांनी तालिबानकडून प्रचंड मारहाण झालेल्या दोन पत्रकारांचा फोटो ट्विटरवर शेअर केला.
याम यांच्या माहितीनुसार हे इटिलाट्रोज या अफगाणी माध्यमाचे पत्रकार असून, नेमत नकदी आणि ताकी दरयाबी अशी त्यांची नावं आहेत. यासाठी त्यांनी #JournalismIsNotACrime (पत्रकारिता हा गुन्हा नाही) हॅशटॅग वापरला आहे.
याम यांनी काढलेल्या फोटोत दोन्ही पत्रकार पाठमोरे उभे असून, त्यांना मारहाणीमुळे झालेल्या जखमा आणि वळ दिसत आहेत. मारहाणीमुळे त्यांचे शरीर लालेलाल झाले आहे.
हे वेदनादायी आहे, असे याम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.‘अटक केलेल्या पत्रकारांना सोडा’ या मागणीच्या अनेक पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.
काही पत्रकारांना सोडून देण्यात आले असून, त्यातल्या एका पत्रकाराने नाव गुप्त राखण्याच्या अटीवर त्याचा अनुभव असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला सांगितला.
तालिबान्यांनी ‘मला जमिनीवर नाक घासायला लावले. निदर्शने कव्हर केल्याबद्दल माफी मागण्यास भाग पाडले’ असे त्या पत्रकाराने सांगितले.
‘टोलो न्यूज चॅनेल’चे कॅमेरामन वाहिद अहमदी यांचाही अटक करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये समावेश आहे, असे या चॅनेलने म्हटले आहे.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, भारतीय फोटोजर्नालिस्ट दानिश सिद्दिकी यांची तालिबान्यांनी काही महिन्यांपूर्वीच हत्या केली होती.
तसेच, एका पत्रकाराला पकडण्यासाठी तालिबान्यांनी घरोघरी त्याचा शोध घेतला. त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला ठार केले, इतर काही नातेवाइकांना गंभीर जखमी केले, अशी माहिती डॉयचे वेलेकने दिली.
मरकस याम यांनी टिपलेला पत्रकारांचा फोटो न्यूयॉर्क टाइम्सचे अफगाणिस्तान प्रतिनिधी शरीफ हसन यांनीही ट्विट केला आहे.
COMMENTS