तपास यंत्रणा कुणाच्या इशार्‍यावर काम करतात ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

तपास यंत्रणा कुणाच्या इशार्‍यावर काम करतात ?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात बरीच उलथापालथ बघायला मिळत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अन

ज्ञानाची दारे उघडतांना…
भारत-कॅनडा संबंधात वितुष्ट
आरक्षणाचा पेच आणि सरकारची कोंडी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात बरीच उलथापालथ बघायला मिळत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर तक्रार करणारे सिंग आणि ज्यांच्याविरोधात आरोप आहेत ते अनिल देशमुख दोघेही सध्या बेपत्ता आहेत. या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागल्यानंतर राज्य सरकारने देखील सिंग यांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी चांदीवाल समिती नेमली. मात्र सिंग या समितीपुढे एकदाही हजर झाले नाही. विशेष म्हणजे, त्यांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ही हजर झाले नाही. तसेच मुखत्यारपत्र दाखल करून, आपल्याला काही म्हणायचे नाही, असे देखील स्पष्ट केले. सिंग आणि देशमुख या प्रकरण शांत होत नाही, तो आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आले. विशेष म्हणजे यात बॉलीवडूमधील कलाकार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ड्रग्जप्रकरणी अटक केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी विशेषतः समीर वानखेडे या अधिकार्‍यांवर थेट आरोप केले. बोगर छापे टाकून पैसे उकळायचे षडयंत्र असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच त्यांनी वानखेडेच्या विदेश दौर्‍यावर प्रश्‍न उपस्थित केले. ही आरोपांची राळ शांत होत नाही, तोच नवीन व्हिडिओ समोर आले. यात थेट समीर वानखेडेवर गंभीर आरोप करण्यात आले. एनसीबीने टाकलेल्या छाप्यात आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर शाहरूख खानकडून तब्बल 25 कोटी रुपयांची खंडणी उकळायची होती, असा थेट आरोप एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने केला. विशेष म्हणजे यातील पंच असलेला किरण गोसावी देखील फरार असून, त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे एका माध्यमांसोबत संवाद साधतांना म्हटले आहे. त्यामुळे प्रश्‍न पडतो की, एनसीबीने ज्यांना पंच म्हणून, साक्षीदार म्हणून सोबत घेतले, त्यांनी आता एनसीबीविरोधात साक्ष द्यायला सुरूवात केली आहे. यापूर्वी या पंचाचा भाजपच्या नेत्यांसोबत संबंध असल्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे एनसीबी ही कारवाई भाजपच्या इशार्‍यावरून सुरू असल्याचा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला होता. भाजप महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील सरकार पाडण्यासाठी कृती करतांना दिसून येत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आखण्यात येत असल्याचा आरोप केला होता.
विशेषतः गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणांची पातळी अत्यंत खालच्या थराला जावून पोहचली आहे. चूक असेल, तिथे चूकच म्हणणार, आणि जिथे बरोबर असेल, तिथे सरकारचे जाहीर कौतुक करणार हे खिलाडूवृत्तीचे राजकारण आता हरवत चालले आहे. गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची संधी विरोधकांनी एकदाही सोडली नाही. विशेषतःएनसीबीवर आरोपांची सरबत्ती होत असतांना, त्यांनी या आरोपांना थेट उत्तर देणे टाळले आहे. तर वेळ येताच साईलच्या आरोपांना उत्तर देऊ असा पावित्रा वानखेडे यांनी घेतला आहे. मात्र या निमित्ताने बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेट समोर आणत, आपली एक वेगळी प्रतिमा वानखेडे यांनी तयार केली होती. ती सुपर कॉपची प्रतिमा या आरोपांनी धूळीस मिळतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत ड्रग्ज, चॅरससह अंमली पदार्थ मोठया प्रमाणावर जप्त केले आहेत. तरी देखील त्याची जाहीर वाच्यता कुठे झाली नाही. किंवा त्यांचे जाहीर कौतुक ही झाले नाही. आणि त्यांच्या कारवाईवर कुणी प्रश्‍नचिन्ह देखील उपस्थित केले नाही. मात्र एनसीबीच्या कारवाईवर सातत्याने प्रश्‍नचिन्ह का उपस्थित होत आहे. याचा शोध घेण्याचा गरज आहे. तसेच एनसीबीने देखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा या तपासयंत्रणेवरील सर्वसामान्यांचा विश्‍वास उडेल. तपास यंत्रणा केवळ राजकीय हेतूने प्रेरित छापे टाकले जातात किंवा त्या राजकीय इशार्‍यावर काम करतात, असा समज होईल, त्यामुळे तपास यंत्रणांनी यातून बाहेर निघण्याची गरज आहे.

COMMENTS