ई-टपाल प्रणालीमुळे विलंबाचे कारण होणार स्पष्ट, सेवाही मिळणार जलदअहमदनगर/प्रतिनिधी : गुन्हा दाखल करून घेतला जात नाही किंवा दाखल गुन्ह्याचा व्यवस्थित त
ई-टपाल प्रणालीमुळे विलंबाचे कारण होणार स्पष्ट, सेवाही मिळणार जलद
अहमदनगर/प्रतिनिधी : गुन्हा दाखल करून घेतला जात नाही किंवा दाखल गुन्ह्याचा व्यवस्थित तपास होत नाही, पोलिसांकडून अरेरावीची उत्तरे मिळतात…अशा तक्रारींच्या निपटार्यासह विविध परवाने, परवानग्या, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी अशा अनेकविध सेवा आता जिल्हा पोलिस दल वेळेत देणार आहे. कारण, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ई-टपाल प्रणाली कार्यरत केली असून, यावर पोलिस ठाण्यापासून उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये येणार्या प्रत्येक तक्रार अर्जाची व विविध सेवांसाठीच्या अर्जांची नोंद होणार आहे व त्यावर विहित वेळेतच निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता एखाद्याच्या अर्जावर विलंबाने निर्णय झाला तर संबंधितांना त्यावर स्पष्टीकरणही द्यावे लागणार आहे.
नगर जिल्हा पोलिस दलामध्ये दिनांक 10 फेब्रुवारी 2021 पासून ई-टपाल ही संगणकीय कार्यप्रणाली सुरु करण्यात आली असून, या कार्यप्रणालीमुळे जिल्हा पोलिस दलामध्ये केले जाणारे टपालांचे प्रत्यक्ष देवाण-घेवाण आता बंद होऊन ते आता ऑनलाईन पध्दतीव्दारे जलद गतीने सुरू झाले आहे. या ई-टपाल कार्यप्रणालीचा वापर करून नवीन आलेली, प्रलंबित, प्रक्रियेत असलेल्या व कार्यवाही पूर्ण झालेल्या टपालावर नियंत्रण ठेवता येते. तसेच ई-टपाल प्रणालीमुळे नागरिकांनी केलेल्या अर्जावर विहित मुदतीत तात्काळ सेवा देता येत असल्याने पोलिस प्रशासनातील कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम झाले आहे. नगर जिल्ह्यामध्ये पोलिस दलात प्रशासकीय पातळीवर 90 टक्के टपाल ई-टपालाद्वारे आता होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सायबर सेलचे प्रमुख प्रतीक कोळी यावेळी उपस्थित होते. ही प्रणाली लागू करणारे जिल्ह्यातील पोलिस दल हे राज्यातील एकमेव असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
वरिष्ठांनाही स्टेटस कळणार
अधीक्षक पाटील म्हणाले की, ई-टपाल प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व गुन्हे शाखा व पोलिस स्टेशनचे संबंधित पोलिस अधिकारी व अंमलदार यांना युजर आयडी दिला आहे. त्यांना टपाल प्राप्त झाल्यास आधी त्याची नोंद ई-टपालमध्ये होते. त्यानंतर त्यांच्याकडून त्या टपालावर कार्यवाही केली जाते. ज्या टपालावर अद्याप कार्यवाही केली नाही असे टपाल प्रलंबित दिसतात व डॅशबोर्डवर ते कोणत्या पोलिस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शाखा यांच्याकडे प्रलंबित आहे व किती दिवसांपासून प्रलंबित आहे याबाबतचे वरिष्ठ अधिकार्यांना अवलोकन करता येत असल्याने तसेच आलेल्या अर्जावर कोणत्या कारणाने अंतिम निर्णय प्रलंबित असल्याचे स्पष्ट करावे लागत असल्याने ते कारण संयुक्तिक वाटले नाही तर त्यावरच संबंधितांना मेमो देण्याचीही सुविधा केली गेली असल्याने पोलिस प्रशासनात अधिक कार्यक्षमता निर्माण झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आतापर्यंतच्या कामात कोणालाही टपाल प्रलंबित असल्याबद्दल मेमो दिलेला नाही. उलट, चांगले काम केलेल्यांना रिवॉर्डस देण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.
अवघे सात अर्ज प्रलंबित
नगर जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी ते आजपर्यंत लोक सेवेतील 17864 अर्ज प्राप्त झाले असून यातील फक्त केवळ सातच अर्ज प्रलंबित राहिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील एकतीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 22 हजार 719 अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये 99 हजार 98 अर्ज निकाली काढण्यात आले असून 23 हजार 621 अर्ज प्रलंबित असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) कार्यालयामध्ये 39 हजार 16 टपाल आले होते. त्यातून 28 हजार 942 टपाल निकाली काढण्यात आले असून, 6174 टपाल हे शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यामध्ये सरासरी रोज 1200 टपाल पोलिसांकडे प्राप्त होत आहे. तर दुसरीकडे कार्यालयीन कामकाजात विनाकारण टपाल वाढत चालल्याचे सुद्धा प्रकार दिसून येत आहे. त्याची टक्केवारी 20 टक्के एवढी असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.
त्यांचे पुन्हा अर्ज घेणार
ई-टपाल प्रणाली सुरू केल्यानंतर 2019 ते 2020 या वर्षभरातील अकराशे अर्ज हे गायब झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता. गहाळ झाले, पावसात भिजले, सापडत नाहीत, अशी कारणेही यातून पुढे आली. यापैकी काही अर्ज गायबही झाले असू शकतात. पण आता सर्व माहिती एकत्रित केल्यानंतर ज्याच्या विभागाकडे ते अर्ज प्रलंबित होते, त्यांच्यावरच आता जबाबदारी देण्यात आली असून, ते अर्ज ज्यांचे होते, त्यांच्याकडून ते पुन्हा लिहून घेऊन व त्यांची नोंद करून ते निकाली लावण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
ई-टपालचे होणार फायदे
इ-टपाल कार्यप्रणालीमुळे होणारे फायदे खूप असून, टपाल नेण्या-आणण्यासाठीचा वेळ व मनुष्यबख वाचणार आहे व वाचलेले हे मनुष्यबळ गुन्हे तपासाच्या कामात वापरता येणार असल्याचे सांगून पाटील म्हणाले, सर्व टपाल सॉफ्ट कॉपीमध्ये असल्याने ते गहाळ होत नाही. सर्व टपाल ऑनलाईन आवक-जावक करता येत असल्याने कामकाज सुटसुटीत झाल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते. ई-टपाल मधील ट्रॅकिंग सिस्टीम मुळे टपाल सध्या कोणत्या टप्प्यावर प्रलंबित आहे हे समजून येते. टपालाची सद्यस्थीति दिसून येत असल्याने दप्तर दिरंगाई टाळता येते, असेही ते म्हणाले.
COMMENTS