जीव गेल्यावर खाटा उपलब्ध होणार का? ;  रुग्णांच्या नातेवाइकांचा संतप्त सवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीव गेल्यावर खाटा उपलब्ध होणार का? ; रुग्णांच्या नातेवाइकांचा संतप्त सवाल

महापालिकेच्या हेल्पलाइनचे फोन लागत नाहीत. खासगी रुग्णालये केवळ नाव नोंदवून घेतात. रुग्णाचा जीव गेल्यावर खाटा उपलब्ध होणार का,’ असा उद्वेगजनक सवाल कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे.

पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची पंचक्रोशीत चर्चा
एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा जणांचा मृत्यू
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 एप्रिल मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणून साजरा

पुणे/प्रतिनिधीः ’महापालिकेच्या हेल्पलाइनचे फोन लागत नाहीत. खासगी रुग्णालये केवळ नाव नोंदवून घेतात. रुग्णाचा जीव गेल्यावर खाटा उपलब्ध होणार का,’ असा उद्वेगजनक सवाल कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे. शहरात गंभीर स्वरूपाच्या कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरयुक्त व विना व्हेंटिलेटर खाटांची मोठी चणचण जाणवत आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डवर शहरातील एकाही रुग्णालयात व्हेंटिलेटरयुक्त खाट उपलब्ध नसल्याचे दिसत होते. त्यामुळे उपचारांसाठी खाटा देता का खाटा, असे म्हणत रुग्णांच्या नातेवाइकांना विविध रुग्णालयांत फिरावे लागत आहे. खाटा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या हेल्पलाइनचे फोन ’बिझी’ लागत आहेत. फोन लागलाच, तर महापालिकेकडून खासगी रुग्णालयांची यादी देऊन ’तुम्हीच खाटा शोधा,’ असे सांगितले जाते. या रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डवर रिक्त खाटा दाखवत असलेल्या रुग्णालयात गेल्यावर तेथे खाटा उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. खासगी रुग्णालये फोनच उचलत नाहीत. प्रत्यक्ष रुग्णाला घेऊन गेल्यावर केवळ नाव नोंदवून घेण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत, अशा अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केल्या जात आहेत.

’माझ्या भावाला मंगळवारी दत्तवाडीतील एका छोट्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. रेमडेसिव्हिरचे सहा डोस आणि प्लाझ्माही देण्यात आला. आता रुग्णालयाने ऑक्सिजन नसल्याचे कारण देऊन दुसरीकडे खाटा शोधण्यास सांगितले आहे; मात्र कुठेच खाटा उपलब्ध नाहीत,’ असे अमित कुलकर्णी यांनी सांगितले. प्रशांत देशपांडे यांनाही वडिलांवरील उपचारांसाठी खाटा मिळवताना प्रचंड गैरसोय सहन करावी लागली. ’महापालिकेच्या सर्व रुग्णालयांतील खाटा भरल्या आहेत. खासगी रुग्णालयांतही खाटा मिळत नाहीत. विशेषतः ऑक्सिजनयुक्त आणि व्हेंटिलेटरयुक्त खाटा उपलब्ध होत नाहीत. वडिलांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. शेवटी ओळखीतून नर्‍हे येथील रुग्णालयात एक खाट मिळाली. त्यामुळे हडपसरवरून आम्ही येथे आलो,’ असे देशपांडे यांनी सांगितले. असंख्य प्रयत्नांनंतर रुग्णालयात खाटा उपलब्ध झाल्यावरही रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ थांबत नाही. अत्यवस्थ रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन, प्लाझ्मा आणण्याच्या सूचना डॉक्टरांकडून केल्या जात आहेत; मात्र आता त्याचाही तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे विविध औषदांची दुकाने आणि रक्तपेढ्यांमध्ये फिरावे लागत असल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले.

’जम्बो’मध्ये 35 खाटा

शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात 600 खाटांची व्यवस्था केली आहे. त्यात 500 ऑक्सिजनसज्ज, प्रत्येकी 30 ’आयसीयू’ व्हेंटिलेटरसह आणि व्हेंटिलेटरविना आणि 40 ’एचडीयू’ अशा खाटांची व्यवस्था आहे. येत्या दोन दिवसांत हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने म्हणजे 800 खाटांसह सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली. सध्या या रुग्णालयातील सर्व व्हेंटिलेटरवरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या या ठिकाणी 35 खाटा शिल्लक आहेत. त्यात 20 ऑक्सिजनसज्ज, ’एचडीयू’ 15 खाटांचा समावेश आहे.

COMMENTS