जिल्हा रुग्णालय जळीतकांड ; जबाबदारी टाळणे, हा सुद्धा गुन्हाच ; पोलिसांचा युक्तिवाद, चौघींना पोलिस कोठडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा रुग्णालय जळीतकांड ; जबाबदारी टाळणे, हा सुद्धा गुन्हाच ; पोलिसांचा युक्तिवाद, चौघींना पोलिस कोठडी

अहमदनगर/प्रतिनिधी : सिव्हील हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडल्यानंतर जे कोणी उपस्थित होते, त्यांची जबाबदारी त्यांनी टाळली आहे. जबाबदारी टाळणे हा सुद्धा एक

शिक्षिकेच्या नवऱ्याची मुख्याध्यापकाला मारहाण l LokNews24
प्रवीण घुलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस करणार नगरपंचायतीच्या १७ उमेदवारांची तयारी
कांदा पीक नोंद नसल्यास अहवाल सादर करा ः नामदेव ठोंबळ

अहमदनगर/प्रतिनिधी : सिव्हील हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडल्यानंतर जे कोणी उपस्थित होते, त्यांची जबाबदारी त्यांनी टाळली आहे. जबाबदारी टाळणे हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे. अशा घटनेच्या काळामध्ये पळून जाणे कितपत योग्य आहे, त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे म्हणून त्यांच्यावर 304 कलमांतर्गत कारवाई करावी म्हणून ते कलम आता वाढविले असल्याचे पोलिसांनी बुधवारी न्यायालयासमोर केलेल्या युक्तिवादात स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरणी अटकेतील चारही महिलांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
नगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी चार महिलांना अटक केल्यानंतर त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अ. के. मांडवगडे यांनी त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर आतापर्यंत दहा ते बारा जणांचे जबाब घेण्यात आले आहेत तसेच आज गुरुवारी (दि.11) राज्य शासनाने नेमलेल्या चौकशी कमिटीचे सदस्य नगरमध्ये येणार आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात मंगळवारी सायंकाळी चार महिलांना अटक करण्यात आली. या आरोपींमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांचा समावेश आहे. बुधवारी त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता, पोलिसांच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. अमित यादव यांनी युक्तिवाद केला. संबंधित घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेमध्ये अकरा जणांचा जीव गेलेला आहे, अन्य सहा जण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहे, असे सांगून ते म्हणाले, पोलिस विभागाने परिस्थितीची पाहणी केल्यानंतर तपासामध्ये अनेक बाबी उघड झालेल्या आहे. या चार महिलांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते आहे. वास्तविक पाहता ते या घटनेच्या ठिकाणी होते व त्यांनी थोडीफार का होईना मदत केली असती तर यामध्ये काहीजणांचे प्राण सुद्धा वाचण्यास मदत झाली असती. मात्र तसे न होता हे उलट बाहेर पळून गेले असे दिसून येत आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी ज्या रुग्णांचे नातेवाईक आहे, त्यांनी त्या ठिकाणी आपले रुग्ण बाहेर काढण्यासाठी किंवा इतरांना मदत करण्यासाठी ते पुढे सरसावले होते, हे सुद्धा त्यामध्ये दिसून येत आहे. हे कर्मचारी तिथे ड्युटीवर कार्यरत असताना त्यांची जबाबदारी अगोदर रुग्ण वाचवण्याची होती. मग ते त्या ठिकाणाहून पळून का गेले, हा खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये यावेळी केला.

परस्पर बदलली ड्युटी युक्तिवादात ते पुढे म्हणाले, आरोपींमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे यांची ड्युटी असताना त्या याठिकाणी गैरहजर राहिल्या आहेत, ही बाब सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच अन्य जे तीन कर्मचारी आहेत, त्यांनी आम्ही ड्युटीवर नव्हतो, आमच्या ड्युट्या वेगवेगळ्या वेळेच्या होत्या, असे नमूद केले पण, ही बाब सुद्धा योग्य नाही. वास्तव परस्पर यांना आपल्या वेळा बदलता येत नाही. त्यांनी मस्टरमध्येही फेरफार केला. आयसीयूमध्ये ते उपस्थित नव्हते. त्यामुळे एकंदरीत सर्व बाबी लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब समोर आलेली आहे. रुग्णालयामध्ये जावेळी आग लागली, त्या वेळेला डॉक्टर त्याठिकाणी नव्हते, हे सुद्धा

दिसून आलेले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी यासंदर्भात स्वतःहून फिर्याद दिलेली आहे व या फिर्यादीमध्ये त्यांनी जी काही घटना समोर दिसते, त्याचा सर्व उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांनी सीसीटीव्ही

डीव्हीआर सुद्धा ताब्यात घेतलेले आहे. त्यानुसार तपास सुरू केलेला आहे. काही जणांचे जबाब सुद्धा आम्ही घेत आहोत. या प्रकरणांमध्ये गांभीर्य असल्यामुळे 304 अ हे कलम लावले होते व आता हे कलम ठेवून 304

कलम लावण्यात आलेले आहे. तसेच जे 17 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते, त्यातील 11 जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी कार्यरत असलेला जो काही स्टाफ आहे, त्यांनी या रुग्णांना वाचवण्याचे कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले नाही, हे दिसून येते. यातील कोणालाही यामध्ये इजा झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी नेमके कुठे व कसे होते, याचा आता शोध घ्यायचा आहे, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये केला. ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये अन्य काही तपास पोलिसांना करायचा आहे. तसेच यासंदर्भात बिल्डिंग बांधल्यानंतर त्यामध्ये सर्व सुविधा होत्या की नव्हत्या, तसेच या ठिकाणी जे काही लाईटचे कनेक्शन देण्यात आले होते, ते योग्य पद्धतीने देण्यात आले होते की नाही, यासह 20 ते 22 कारणे न्यायालयासमोर यावेळी मांडण्यात आली. अन्य काही जणांचा आम्हाला शोध घ्यायचा आहे, तसेच परस्पररित्या जर यांनी ड्युटी बदललेली आहे, असे सांगतात, तर नेमकी जबाबदारी कोणाची आहे, त्याचा सुद्धा आम्हाला शोध घ्यायचा आहे. त्यामुळे या आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये केला. आरोपींचे मुद्दे खोडले दुसरीकडे आरोपींचे वकील अ‍ॅड. महेश चौगुले यांनी घडलेली घटना पाहता, जी काही आरोपींची नावे पोलिसांनी घेतलेली आहे, ती चुकीची आहे. वास्तविक पाहता यांचा काहीही संबंध नव्हता. जी फिर्याद दिली आहे, त्याप्रमाणे 304 अ कलम लागू शकत नाही, यासह विविध मुद्दे त्यांनी युक्तीवादात मांडले. त्यांनी मांडलेले मुद्दे सरकारी वकील अ‍ॅड. यादव यांनी खोडून काढत कलम 304 कलम का लावले जाते, हे सांगत घटना घडल्यानंतर जे कोणी उपस्थित होते, त्यांची जबाबदारी त्यांनी टाळली आहे. जबाबदारी टाळणे हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे, अशा घटनेच्या काळामध्ये पळून जाणे कितपत योग्य आहे, त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे, म्हणून आता त्यांच्यावर 304 कलमांतर्गत कारवाई करावी, म्हणून आम्ही ते कलम आता वाढविले असल्याचे त्यांनी युक्तिवादात म्हटले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर चारही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर शेख आणि आनंत यांच्या सेवा समाप्त करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे व यामधील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. विविध संघटनांचा धरणे इशारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेत 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेस जिल्हा शल्यचिकित्सक यांचे निष्काळजीपणाचे धोरण कारणीभूत असल्याचे सामाजिक संघटनांचे

म्हणणे आहे. या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने दि. 16पासून जिल्हा रुग्णालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन कऱण्यात येणार आहे. भारतीय जनसंसदचे अध्यक्ष अशोक सब्बन, लाल निशाण पक्षाचे अनंत लोखंडे, आनंद वायकर, पीस फाउंडेशनचे अर्षद शेख यांनी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना पाठविले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांना फायर ऑडिट करणे तसेच महापालिका, सार्वजनिक बांधकाम यांनी त्रुटीची पूर्तता करण्याबाबत लेखी स्वरूपात कळवूनही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांनी निष्काळजीपणाचे धोरण घेत उपाययोजना न करता आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करावे, त्यांच्यावर भादंवि कलम 306 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा, वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यावर निलंबन तसेच बडतर्फीची केलेली कारवाई व फौजदारीकारवाई रद्दबातल करण्यात यावी, डॉ. पोखरणा यांना चौकशी समितीतून वगळण्यात यावे, मृत्यू झालेल्या 11 रुग्णांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

COMMENTS