जागरूक करणार कर न भरण्याचे आंदोलन ;  मनपाला 10 कलमी मागण्या निवेदन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागरूक करणार कर न भरण्याचे आंदोलन ; मनपाला 10 कलमी मागण्या निवेदन

येथील जागरूक नागरिक मंचाने मनपाच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पासाठी नगरकरांकडुन दहा कलमी मागण्यांचे निवेदन मनपाला दिले आहे.

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं मोडली स्वत:ची एफडी | | LokNews24
पारनेर तालुक्यातील अवैध व्यवसायांसह वाळू तस्करांवर कारवाई l पहा LokNews24
अशाप्रकारे दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या ; पाहा व्हिडीओ I LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील जागरूक नागरिक मंचाने मनपाच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पासाठी नगरकरांकडुन दहा कलमी मागण्यांचे निवेदन मनपाला दिले आहे. या दहा कलमांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास शहरभर कोणीही कर न भरण्याचे आवाहन केले जाणार असून, सविनय कायदेभंग व मनपाला असहकार आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आगावूनोटीस सर्व संबंधितांना ई-मेल द्वारे जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी पाठवली आहे. अशी नोटीस ज्यांना पाठवली, त्यांच्यात नगर विकास खात्याचे मुख्य सचिव, मनपा आयुक्त, मनपा महापौर यांचा समावेश असून, या नोटिसीची प्रत पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व नगरचे आमदार संग्राम जगताप यांना पाठवण्यात आली आहे.

मनपातील सध्याच्या लोकप्रतिनिधींकडून आमच्या मोठ्या अपेक्षा असल्यामुळे अहमदनगर महापालिकेच्या मंगळवारी (30 मार्च 2021) होणार्‍या अर्थसंकल्प सभेमध्ये नगरवासीयांकडून दहा कलमी मागण्यांचे निवेदन व त्याविषयी समाधान न झाल्यास पुढे नाईलाजास्तव सविनय कायदेभंग व सहकार आंदोलन करण्यात येणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे दीनदुबळे त्रस्त, अनेक व्याधिग्रस्त, नगरकर फक्त कोटीच्या कोटी उड्डाणे हतबलपणे ऐकतात आणि गप्प बसतात. हे कोट्यावधी रुपये नेमके जातात कुठे? कुठल्याही योजना या पूर्ण होण्यासाठी नसतातच का? आणि वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या हे नगर जैसे थे कसे राहते? उलट दिवसेंदिवस बकालच का होत जात आहे? ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यासाठी अतिशय गरजेच्या काही छोट्या आणि काही मोठ्या अशा उपाययोजना आणि त्याची आर्थिक तरतूद जर वर्तमान लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या मोठ्या अनुभवाअंती अशा आर्थिक महासभेमध्ये जर लक्षात घेतल्या गेल्या नाहीत, तर असे कोटीच्या कोटी उड्डाणे आणि असे अर्थसंकल्प फक्त ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या त्रिकुटांमध्येच वाटलेले मेतकूट ठरून सगळी वाट लागली जाते आणि मग मागे उरतो तो बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असा उद्वेगही यात व्यक्त करण्यात आला आहे. दहा मुद्यांची उत्तरे अर्थसंकल्प सभेत मिळाली नाही तर यासाठी वेळ प्रसंगी जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये देखील दाखल करण्यात येईल, असाही इशारा मुळे यांनी दिला आहे.

जागरूकने मांडले दहा मुद्दे

1)भुयारी गटार योजना आणि अमृत योजना या वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या चाललेल्या योजनांविषयी  एक श्‍वेतपत्रिका मनपाने जाहीर करावी..

2) ट्रॅफिक सिग्नल बाबत मनपाने आता कुठलीही टोलवाटोलवी न करता स्वतःकडे पुर्ण जबाबदारी घेऊन सर्व ट्रॅफिक सिग्नल साठी देखभालीची तरतूद करणे आवश्यक आहे.

3)नगर शहरामधील आगरकर मळा, नेप्ती रोड, बुरुडगाव याठिकाणी कायम विक्रमी काविळीचे रुग्ण, डेंग्यूचे रुग्ण सातत्याने दरवर्षी सापडतात. यासाठी येथे सतत होणारा दूषित पाणीपुरवठा आणि अस्वच्छता जबाबदार आहे. त्यामुळे यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून त्याची अंमलबजावणी केली जावी.

4) चितळे रोड वरील पाडलेले नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनीतील मार्केट, बारा वर्षापूर्वी जळून खाक झालेला म्युप्न्सिपल कौन्सिल हॉल, कचराकुंडीमध्ये रूपांतर झालेले आगरकर मळ्यातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे उद्यान, तसेच संपूर्ण शहरभर पत्र्याची उभी राहिलेली आणि नगरसेवकांचे आशीर्वाद असलेली हजारो अतिक्रमण केलेली दुकाने याविषयी श्‍वेतपत्रिका काढावी.

5) प्रत्येक ठिकाणच्या पार्किंगच्या जागा, उद्यानाच्या जागा, भाजी बाजाराच्या जागा, व्यायामशाळेच्या व इतर रिझर्वेशन असलेल्या जागा महापालिकेने प्रत्येक वॉर्ड नुसार वृत्तपत्रातून जाहीर कराव्यात.

6) सीना नदी सुशोभीकरणाच्या कामाचा अहवाल नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा.

7)पथ दिव्यांच्या प्रत्येक डीपीवर सेंसर कंट्रोल ऑन-ऑफ स्वीच बसवणे गरजेचे आहे. याची माहिती जाहीर करावी.

8) प्रत्येक पावसाळ्यामध्ये संपूर्ण गावठाण तुडुंब पाण्याने भरते, हे टाळण्यासाठी साठी या अर्थसंकल्पात किती रकमेची तरतूद केली आहे?

9) अहमदनगर शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर का होईना पाण्याचे मीटर लावून चांगला पायंडा पाडला जाऊ शकतो. त्यामुळे मनपाचे ही उत्पन्न वाढेल व पाण्याचीही बचत होईल. त्याचप्रमाणे नगरमधील 64 वॉशिंग सेंटरच्या पाण्याचा स्त्रोत हुडकून काढून त्याला आळा घातला जाऊ शकतो आणि सार्वजनिक ठिकाणी नळांना तोट्या बसवण्याचा उपक्रम करून रोज पहाटे रस्त्यावरून वाया जाणारे पाणी वाचवले जाऊ शकते.

10) महापालिकेने अखत्यारीतील आरोग्यविषयक सेवेमध्ये काय भरीव तरतूद केली आहे? आणि सध्या चालू असलेल्या व वाईट स्थितीमधे असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये व इतर ठिकाणीही करोनाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यकाळात निर्माण होणार्‍या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी कुठल्या प्रकारची आधुनिकता केलेली आहे?

COMMENTS