कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात दळणवळण वाढून या परिसराचा विकास होण्यासाठी प्रस्तावित असल
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात दळणवळण वाढून या परिसराचा विकास होण्यासाठी प्रस्तावित असलेल्या कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनच्या मंत्रालय स्तरावर असलेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी याबाबत आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, मुंबई-पुणे-नाशिक हा पंचतारांकित औद्योगिक त्रिकोण आहे. कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईन झाल्यास कोपरगाव-मनमाड-रोटेगाव हे ९४ किलोमीटरचे अंतर कमी होऊन औरंगाबाद व जालना ड्रायपोर्टला मुंबई व कोकणाशी जोडणाऱ्या मार्गाचे अंतर कमी होणार आहे. मुंबई-पुणे-नाशिक या पंचतारांकित औद्योगिक त्रिकोणाला औरंगाबाद जोडले जाऊन पंचतारांकित औद्योगिक चौकोन तयार होईल. मराठवाडा व दक्षिणेतील राज्यांमधून शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या वेळेची व खर्चाची बचत होईल. त्याचा फायदा कोपरगाव-रोटेगाव या दुष्काळी भागातील दळणवळण वाढून या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच मनमाड रेल्वे स्टेशनवर असलेला अधिकचा भार काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.
कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी याबाबत राज्यशासनाच्या अखत्यारीतील प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही त्याबाबत आपण तातडीने मान्यता द्यावी अशी विनंती आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना केली आहे. सदरच्या कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनवर कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहे. या रेल्वे स्टेशनमुळे या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागाचा विकास साधला जाणार आहे. त्याबाबत आपण जातीने लक्ष घालून राज्य सरकारच्या वतीने सदर प्रस्तावास मंजुरी द्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS