गटनोंदणी फुटली …मुंबईचा हस्तक्षेप झाला सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गटनोंदणी फुटली …मुंबईचा हस्तक्षेप झाला सुरू

बहुमतासाठीची विभागीय आयुक्तांसमोर केलेली पक्की गटनोंदणी चक्क नंतर फुटली व सत्ता हातून गमवावी लागली.

राष्ट्रवादीतर्फे रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन- ढाकणे
विरोधक खोटे आरोप करत असून आम्ही कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार;- भाजपाचे विरोधकांना आवाहन …
पंतप्रधान मोदींना पाठवल्या नगरमधून शेणाच्या गोवर्‍या

श्रीराम जोशी/अहमदनगर : बहुमतासाठीची विभागीय आयुक्तांसमोर केलेली पक्की गटनोंदणी चक्क नंतर फुटली व सत्ता हातून गमवावी लागली. त्यापासून मग धडा घेत थेट मुंबईतील पक्षश्रेष्ठींची मदत घेत मग सत्ता काबीज करण्याची वेळ शहर शिवसेनेवर आली होती.2008 ते 2013 या पंचवार्षिकमधील ही राजकीय कथा. 2003मध्ये शिवसेनेचा पहिला महापौर भगवान फुलसौंदर यांच्या माध्यमातून झाल्यानंतर 2006मध्ये काँग्रेसचा दुसरा महापौर संदीप कोतकर यांच्या रुपाने झाला. पण नंतर 2008च्या दुसर्‍या निवडणुकीनंतर नगरच्या राजकीय घडामोडींचे गांभीर्य वाढल्यावर मुंबईतून हस्तक्षेप जो सुरू झाला, तो आजतागायत कायम आहे. 

मनपाच्या दुसर्‍या निवडणुकीत म्हणजे 2008मध्येही शिवसेना व भाजप युतीने बाजी मारली होती. त्यावेळीही याच दोन्ही पक्षांचे जास्त नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी 65 नगरसेवकांच्या सभागृहात बहुमतासाठी 33 नगरसेवकांची गरज होती. शिवसेना-भाजप युतीकडे 30जणांचे संख्याबळ होते व त्यामुळे तीन अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. अशा 33जणांची एकत्रित गटनोंदणी विभागीय आयुक्तांकडे झाली व त्याचवेळी मनपावर पुन्हा शिवसेना-भाजप युतीचा झेंडा झळकणार असे दिसू लागले होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यावेळी मनपा निवडणूक होऊनही महापौर-उपमहापौर निवडणुकीचा अजेंडा तब्बल महिनाभर प्रतीक्षेत राहिला. नगरसेवकांपैकी बहुतांशजण सहलीवर गेले होते. तेथे त्यांची सरबराई सुरू होती. पण सेनेअंतर्गत महापौर कोणाला करायचे, याचा वाद सुरू झाला. सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अंबादास पंधाडे यांचे नाव त्यावेळी चर्चेत होते. पण त्या नावाला काहींचा विरोध होता. या दरम्यान इकडे दोन्ही काँग्रेसनेही महापौरपदाची तयारी सुरू केली होती. नगरसेवक पळवापळवीचे राजकारणही या काळात रंगले. बाहेरगावी सहलीला असलेल्या नगरसेवकांना गाडीत घालून पळवून नेण्याचेही प्रकार घडले. नगरसेवक बेपत्ता झाल्याच्या तक्रारीही पोलिसात झाल्या. या सगळ्या घडामोडीत शिवसेना-भाजप युतीने केलेली गटनोंदणी मात्र फुटली व त्यांच्याकडे गेलेले तीनही अपक्ष दोन्ही काँग्रेसच्या गोटात आले. परिणामी, सध्याचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे पहिले महापौर झाले. त्यांच्या या काळात मनपा सभागृहात विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप तसेच केडगावचे काँग्रेस नेते भानुदास कोतकरही नगरसेवक होते. याच काळात फेज-2 ही नगर शहरासाठीची महत्वाकांक्षी पाणी योजना मंजूर होऊन तिचे काम सुरू झाले. पण दुर्दैवाने तिचे काम आजही सुरू आहे. या 11 वर्षांच्या दरम्यान संग्राम जगताप नंतर पुन्हा एकदा महापौर झाले व दोनवेळा आमदारही झाले. पण ही योजना आजतागायत सुरू झालेली नाही व आता केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजनेच्या कामानंतर फेज-2 योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

मुंबईचा सुरू हस्तक्षेप

33 जणांची गटनोंदणी केली असतानाही ती फुटल्याने व तीन अपक्ष बाहेर पडल्याने सत्ता मिळवता आली नसल्याचे दुःख शिवसेनेने नंतर बाजूला सारून 2011मधील दुसर्‍या महापौर निवडणुकीत कंबर कसली. मुंबईतील पक्ष श्रेष्ठी व ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी नगरमध्ये लक्ष घातले व युतीच्या सर्व नगरसेवकांसह पाठिंबा देणारांना आपल्यासमवेत घेऊन युतीची ताकद पुन्हा नगरमध्ये दाखवून दिली. नगरच्या या ताकदीला मुंबईतून ताकद मिळाल्याने मग 2011मध्ये शीला शिंदे या शिवसेनेच्या पहिल्या महिला महापौर म्हणून विराजमान झाल्या. याच निवडणुकीपासून मात्र पुढे प्रत्येक महापौर-उपमहापौर निवडणुकीत मुंबईतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठांनी नगरमध्ये येऊन लक्ष घालण्यास सुरुवात केली. या पंचवार्षिकमध्ये आधी राष्ट्रवादीने व नंतर शिवसेनेने सत्ता उपभोगली. शहर विकासाची फेज-2 ची योजना कार्यान्वित झाली असल्याने तिचे काम मार्गी लावण्याचे कार्य या पाच वर्षांत होत असताना केडगाव देवी रोड, बालिकाश्रम रोड व कोठी ते सक्कर चौक सिमेंट काँक्रिटचे करण्याचा महत्त्वाचा प्रकल्प याच काळात सुरू झाला. (क्रमशः)

चौकट

गाडी भरल्याचा संदेश महागात

महापालिकेच्या 2013मध्ये झालेल्या तिसर्‍या निवडणुकीतही शिवसेना व भाजप युतीचे सर्वाधिक नगरसेवक होते. पण कोणत्याही एका पक्षाला बहुमत नव्हते. त्यामुळे घोडेबाजार व पक्षीय जुगाडाचा खेळ दरवर्षीप्रमाणे रंगला होता. महापौर निवडणुकीतील कोट्यवधीचा खर्च हा वेगळाच विषय सगळीकडे चर्चेत होता. या निवडणुकीनंतरही राजकारण बरेच रंगले होते. पण शिवसेना व भाजपमधील तणावही वाढला होता. महापौरपदावरून रस्सीखेच सुरू होती. पण या वादाचा फायदा मात्र राष्ट्रवादीने घेतला. युतीतील दोन्ही पक्षांतील बेबनाव पथ्यावर पाडून काँग्रेस, अपक्ष, मनसे व अन्य नगरसेवकांना समवेत घेऊन राष्ट्रवादीने पुन्हा बाजी मारली व आ. संग्राम जगताप यावेळी दुसर्‍यांदा महापौर झाले. ते महापौर झाल्यानंतर लगेच वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. राज्यभरात दोन्ही काँग्रेस व युती यांच्यात जोरदार वादंग सुरू होते. त्यामुळे 2014च्या विधानसभा निवडणुका सर्वच पक्षांनी स्वबळावर लढवल्या. परिणामी, नगरमध्येही शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस अशा चार उमेदवारांमध्ये लढत झाली. यात राष्ट्रवादीकडून उभे असलेले संग्राम जगताप 3 हजार मतांनी विजयी होऊन पहिल्यांदा आमदार झाले. शिवसेना व भाजपमधील मतांची विभागणी जगतापांच्या पथ्यावर पडली. शिवसेनेचे (स्व.) अनिल राठोड, भाजपचे अ‍ॅड. अभय आगरकर व काँग्रेसचे सत्यजित तांबे यांचा पराभव त्यांनी केला. महापौरपद व आमदारकी अशी दोन पदे जगताप यांच्याकडे त्या काळात सुमारे सहा महिने होती. त्यांना दुसर्‍यांदा महापौर करण्यात मोलाची भूमिका बजावली असल्याने राष्ट्रवादीचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक दादा कळमकर यांचे पुतणे अभिषेक कळमकर यांना महापौर केले जावे, अशी मागणी पुढे आली. त्यामुळे आ. जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला व अभिषेक कळमकर यांना महापौर केले. या अडीच वर्षात जगताप दीड वर्षे व कळमकर एक वर्ष महापौर होते. पण मग पुढच्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये शिवसेनेने पुन्हा उचल खाल्ली व महापौरपदावर दावा केला. या काळात भाजपही त्यांच्यासमवेत होती. सारेकाही सुखनैव सुरू होते. पण एकमेकांना गृहित धरण्यातून बिनसले. तसेच या काळात शिवसेनेने नगरसेवकांना सहलीवर नेण्याचे नियोजन केल्यावर आमची गाडी भरली अशा आशयाचा संदेश सोशल मिडियातून व्हायरल झाला तसेच काही नगरसेवकांना सहलीवर पाठवल्याचे सेनेच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना सांगितले नसल्याने आम्हाला अंधारात ठेवल्याची भावना वाढून काहींचा इगो दुखावला गेला. परिणामी, भाजपने महापौरपदासाठी स्वतःचा स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू केली. शिवसेना व भाजपच्या या संभाव्य लढतीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांना अचानक चांगलेच महत्त्व आले. घनघोर राजकारण या काळात रंगले.आरोप-प्रत्यारोप झाले. एकदम साधेपणाने व सरळपणाने होणारी ही निवडणूक नंतर शिवसेनेला चांगलीच महागात पडली. पार मुंबईतून ज्येष्ठ नेते नगरला तोळ ठोकून राहिले. तत्कालीन भाजप खासदार (स्व.) दिलीप गांधी व शिवसेनेचे माजी आमदार (स्व.) अनिल राठोड यांच्यात दिलजमाई केली गेली व शिवसेनेच्या सुरेखा कदम अखेर शिवसेनेच्या दुसर्‍या महिला महापौर झाल्या. पण यानिमित्ताने रंगलेले राजकारण आजही नगरमध्ये चर्चेत असते.

COMMENTS