मुंबई/प्रतिनिधी - तब्बल आठ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीला संमती दिली नाही. त्यामुळे
मुंबई/प्रतिनिधी – तब्बल आठ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीला संमती दिली नाही. त्यामुळे 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच कायम आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत आमदारांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
मात्र यावेळी झालेल्या चर्चेत राज्यपालांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्या नावावर आक्षेप घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नवीन यादीमध्ये ही दोन्ही नावे वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यावर अजून अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव 12 जणांच्या यादीत आहे. ’निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे. यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील,’ असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीपासून सुरू असलेला राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटलेला नसताना आता एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांचे नाव यादीतून कट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राजू शेट्टी यांचे नाव राष्ट्रवादीने आपल्या यादीतून का काढून टाकले, अशी विचारणा होत असतानाच आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. त्यांनी वारंवार ठाकरे – पवार सरकार विरोधात केलेल्या आंदोलनामुळेच राजू शेट्टी यांचे नाव यादीतून काढून टाकल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. राजू शेट्टी यांनी नुकताच पूरग्रस्त शेतकर्यांचा आक्रोश मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता. या मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसते. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नक्कीच राजकीय दबाव आहे. त्यांनी तसे स्पष्ट सांगावे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मंत्रिमंडळानं निर्णय घेतला, नावांची शिफारस केली की त्यावर स्वाक्षरी करण्याचं काम राज्यपालांचं आहे. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. ती सकारात्मक झाली आहे. त्यामुळे राज्यपाल 12 जणांचा समावेश असलेल्या यादीवर लवकरच स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राजू शेट्टींना ठाकरे सरकारवरील टीका भोवणार
एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणातली ईडीची चौकशी आणि तपास भोवल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासने देऊन गेले. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली. मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता. आता राष्ट्रवादीने राजू शेट्टींचे नाव वगळून सरकारवरील टीकेचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे.
COMMENTS