देशातील वेगवेगळी राज्ये एकीकडे पुरेशी लस मिळत नसल्याचा आरोप करीत असताना आणि वस्तुस्थितीही तशीच असताना देशात कोरोनाच्या लसीचे 44 लाखांहून अधिक डोस वाया गेले.
नवी दिल्ली : देशातील वेगवेगळी राज्ये एकीकडे पुरेशी लस मिळत नसल्याचा आरोप करीत असताना आणि वस्तुस्थितीही तशीच असताना देशात कोरोनाच्या लसीचे 44 लाखांहून अधिक डोस वाया गेले. त्यामुळे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. सरकारने दहा टक्के डोस वाया जातील, असे गृहीत धरले होते; परंतु त्यापेक्षा दुपटीहून अधिक डोस वाया गेले.
भारतात कोरोना लसीची कमतरता जाणवत असताना 11 एप्रिलपर्यंत देशात वापरासाठी उपलब्ध झालेल्या एकूण लसीपैंकी 23 टक्के लसीचा अपव्यय झाल्याची माहिती मिळाली आहे. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती उघड झाली. देशातील वेगवेगळ्या राज्यांत 11 एप्रिलपर्यंत जवळपास 10.4 कोटी डोसपैंकी एकूण 44 लाख 78 हजारांहून अधिक लसीचे डोस वाया गेले. राजस्थानात सर्वाधिक म्हणजेच सहा लाख दहा हजार 551 डोस वाया गेले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मागे महाराष्ट्रात कोरोनाच्या लसीचे साडेतपाच लाख डोस वाया गेल्याचा आरोप केला होता; परंतु माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून महाराष्ट्रात कोरोना लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण कमी आहे. शून्य अपव्ययासह गोवा, पश्चिम बंगाल, लक्षद्वीप, केरळ, अंदमान आणि निकोबार बेटे तसेच मिझोरम ही राज्ये या निर्देशांकात उत्तम कामगिरी करणारी राज्ये ठरली आहेत. लसीचा अपव्यय हा कोणत्याही मोठ्या लसीकरण मोहिमेतील नेहमीचा भाग आहे. किती लस वाया जाऊ शकते याचा अंदाज घेऊनच लस निर्मिती केली जाते. प्रत्येक लसीचा अपव्यय शिफारसीच्या मर्यादेत असणे गरजेचे आहे. लसीच्या एका कुपीत (बाटलीत) दहा डोस असतात. कुपी उघडल्यानंतर पुढच्या चार तासांत ही लस वापरात येणे गरजेचे असते. त्यामुळे दिवसात किती कुपी उघडायच्या आहेत, हे वापरकर्त्यांना माहीत असायला हवे. दिवसाच्या शेवटी कुपी उघडली गेली, तर केवळ एक किंवा दोन लाभार्थी असतील आणि त्यांना लस दिली गेली तर उर्वरित आठ डोस वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उघडलेल्या कुपींची संख्या आणि लसीकरणासाठी आलेल्या व्यक्ती यांचे संतुलन ठेवणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी एक व्यक्तीही लसीकरण केंद्रात दाखल झाली आली, तरी जोखीम घेऊन कुपी उघडावी लागते. त्यामुळे, उरलेल्या लसीच्या डोसांचा अपव्ययात समावेश होतो. लसीचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य नियोजनावर भर देणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दिवसाअखेरच्या शेवटच्या तासात जेवढे नागरिक लसीकरणासाठी येणार असतील, तेवढ्यांचा अंदाज घेऊन मगच कुपी उघडणे योग्य ठरेल. उरलेल्या लोकांना सकाळी येऊन लस घ्यावी, अन्यथा इतर डोस वाया जातील, याची कल्पना देण्याची गरज आहे. समजावून सांगितल्यानंतर नागरिकही यासाठी सहकार्य करतात आणि लसीचा अपव्यय टाळणे शक्य होते, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
वहनात दहा टक्के नुकसान
सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून केंद्र सरकार ज्या लसी विकत घेणार आहे, त्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पापासून ते आरोग्य केंद्रापर्यंतच्या वाहतुकीदरम्यान लसीच्या शंभर पैकी दहा डोस खराब होतील आणि ते फेकावे लागतील. लसीच्या डोसचा साठा मर्यादित असेल आणि दहा टक्के डोस हे फेकण्यात जातील. त्यामुळे सरकारवर खर्चाचा अतिरिक्त भार पडेल.
COMMENTS