ग्रामीण भागातील शेतकर्यांची हक्काची बँक समजल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेने 31 मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 12 कोटी 65 लाख रूपये इतका ढोबळ नफा झाला आहे. बँकेने या आर्थिक वर्षात 650 कोटी रूपयांचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असून, बँकेने पुढील वर्षाअखेर 1000 कोटी रूपयांचे व्यवसाय उद्दिष्ट निश्चित केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉ.
कराड / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील शेतकर्यांची हक्काची बँक समजल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेने 31 मार्च 2021 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 12 कोटी 65 लाख रूपये इतका ढोबळ नफा झाला आहे. बँकेने या आर्थिक वर्षात 650 कोटी रूपयांचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असून, बँकेने पुढील वर्षाअखेर 1000 कोटी रूपयांचे व्यवसाय उद्दिष्ट निश्चित केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे. यासाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेच्या 31 मार्च 2021 अखेरच्या एकूण ठेवी 435 कोटी 76 लाख रूपयांच्या असून, 214 कोटी 98 लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 650 कोटींच्या वर झाला असून, निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात बँक यशस्वी झाली आहे. सर्व तरतुदी व कर वजा जाता बँकेने 5 कोटी 4 लाख एवढा निव्वळ नफा कमविला आहे.
गेल्या वर्षभरापासून देशात वेगाने फैलावत असलेल्या कोराना साथीच्या काळातही बँकेने सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेदार व कर्मचार्यांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करत, व्यवसाय वृध्दीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम सुविधा, एसएमएस बँकींग, ई-कॉमर्स, आरटीजीएस/एनईएफटी, एनएसीएच, लॉकर्स यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या 4 जिल्ह्यात 19 शाखांच्या माध्यमातून सेवा देणार्या या बँकेने सुरू केलेल्या एटीएम सेवेचा लाभही ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा तसेच अन्य सुविधांचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे.
COMMENTS