आखाड्यांच्या शिखर संस्थेकडून प्रस्ताव आल्यास उत्तराखंड सरकार कुंभमेळा उद्याच्या शाही स्नानानंतर संपवू शकते.
डेहराडूनः आखाड्यांच्या शिखर संस्थेकडून प्रस्ताव आल्यास उत्तराखंड सरकार कुंभमेळा उद्याच्या शाही स्नानानंतर संपवू शकते. उत्तराखंड सरकारमधील वरिष्ठ अधिकार्याने तसे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुरुवारी रात्रीपासूनच रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
कुंभमेळा अतिसंक्रमित क्षेत्र ठरत असल्याने आणि कोरोनामुळे अनेकांचा बळी जात असल्याने निरंजन आखाड्याने कुंभमेळा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या आखाड्याच्या प्रमुखांनी अन्य आखाड्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. आनंद आखाड्यानेही कुंभमेळा समाप्त करायला परवानगी दिली; परंतु सर्व आखाड्यांची एक शिखर संस्था असून तिने प्रस्ताव दिला, तरच राज्य सरकार यावर ठोस निर्णय घेणार आहे. आखाड्यांतील वाद लक्षात घेता हा प्रस्ताव पाठविला जातो, की नाही, हा कळीचा मुद्दा असून आता दोनच शाही स्नाने शिल्ल्रक असल्याने आखाडा परिषद काय निर्णय घेते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. हरिद्वारमध्ये गुुरूवारी दोन हजारांहून अधिक कोरोनो बाधित आढळल्यानंतर कुंभमेळ्यात भाग घेणार्या प्रमुख आखाड्यापैकी (तपस्वीगटांपैकी एक) निरंजनी आखाडयाने शनिवारपासून कुंभमेळा सोडण्याची तयारी दाखविली. बरेच संत कोरोना बाधित झाल्याने कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा निरंजनी आखाड्याचे सचिव आणि माता मनसा देवी ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र पुरी महाराज यांनी केली. मुख्य शाही स्नान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आखाड्यात मोठ्या संख्येने संत आणि भक्त दर्शन घेत आहेत. हा आखाडा परिषदेचा निर्णय नाही, आमच्या आखाड्याचा वैयक्तिक निर्णय आहे, असे त्यांनी सांगितले. शेवटचे शाही स्नान प्रतिकात्मक करण्याचे त्यांनी जाहीर केले. बहुतेक आखाड्यांचीही तशी तयारी आहे. आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांनाही कोरोना झाला आहे. त्यांना एम्समध्ये दाखल केले आहे. आखाडा परिषदेत 13 आखाडे आहेत.
मध्य प्रदेशातील महा निर्वाणी आखाडाचे प्रमुख स्वामी कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन झाले. कुंभमेळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढविण्यावरून आखाडे परस्परांच्या विरोधात उतरले आहेत. एकमेकांवर कोरोना पसरविण्याचा आरोप करीत आहे. संन्यासी आखाड्यातून कुंभमेळ्यात कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप बैरागी आखाड्याने केला आहे. निंभोही आखाडाचे अध्यक्ष महंत राजेंद्र दास यांनी कुंभातील वाढत्या संसर्गाच्या प्रकरणांसाठी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांना दोषी ठरवले आहे. निरंजनी आखाड्यातील 17 संत-महंताचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी यांना स्वत: संसर्ग झाल्याचे आढळले आहे. इतर अनेक आखाड्यांच्या 200 हून अधिक भिक्षू आणि संतांचा चाचणी अहवाल अद्याप येणे बाकी आहे. आतापर्यंत 50 हून अधिक संत संत संक्रमित झाले आहेत.
परिस्थिती भयावह होण्याची शक्यता
उत्तराखंडमध्ये एका महिन्यात कोरोना रुग्णांच्या प्रमाणात 8814 टक्के वाढ झाली आहे. 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळात उत्तराखंडमध्ये केवळ 172 लोक संसर्गित झाले. आता 1 ते 15 एप्रिल दरम्यानच्या 15 दिवसात 15 हजार 333 लोकांना कोरोनाचा विळखा बसला. फेब्रुवारीपर्यंत येथे दररोज केवळ 30 ते 60 लोकांना कोरोनाची लागण झाली. आता ही संख्या दोन हजाराहून 2 2,00 पर्यंत वाढली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी भयावह होऊ शकते.
COMMENTS