काँग्रेस-भाजपमध्ये रंगला ऑक्सिजन श्रेयवाद ; शहरात झाला चर्चेचा विषय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस-भाजपमध्ये रंगला ऑक्सिजन श्रेयवाद ; शहरात झाला चर्चेचा विषय

राज्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा व त्याच्या वितरकाच्या चौकशीवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगला असताना त्याची छोेटी आवृत्ती नगरमध्येही घडली आहे.

आयुष्याचा अंतिम हेतू समाधान हाच आहे – डॉ. संजय कळमकर
नगरला सेक्स रॅकेटचे ग्रहण?… त्या महिलेचा पर्दाफाश करा
धर्मरक्षणासाठी तरूणांना एकत्र आणण्याचे काम देवस्थानांनी केले पाहिजे

अहमदनगर/प्रतिनिधी-राज्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा व त्याच्या वितरकाच्या चौकशीवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगला असताना त्याची छोेटी आवृत्ती नगरमध्येही घडली आहे. येथे ऑक्सिजन विषयावरून श्रेयवाद सुरू आहे व त्यात काँग्रेस आणि भाजप असे दोन पक्ष आहेत. अर्थात, येथे यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अजून तरी झडल्या नाहीत. शिवाय, नगरकरांना ऑक्सिजन पुरवण्याचा दावा काँग्रेस व भाजपने केला असला तरी अजून प्रत्यक्षात तो सुरू झालेला नाही. बहुदा त्यामुळेच अजूनतरी जाहीरपणे या विषयावर आरोप-प्रत्याराोप होऊन राजकारण रंगले नाही. पण शहरात चर्चेचा विषय मात्र आहे. 

 याबाबतची माहिती अशी की, नगरच्या एमआयडीसीमध्ये विलास लोढा या उद्योजकाची अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस ही कंपनी असून, विविध व्यावसायिक कंपन्यांना औद्योगिक उत्पादनासाठी ते ऑक्सिजन निर्मिती करतात.परंतु मागील 1 एप्रिलपासून औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा बंद केला गेला असून, निर्माण होणारा ऑक्सिजन फक्त वैद्यकीय उपयोगासाठी म्हणजे प्राधान्याने कोविड रुग्णांसाठी पुरवण्याचे बंधन घातले गेले आहे. अहमदनगर इंडस्ट्रीयल कंपनीद्वारे औद्योगिक कंपन्यांना पुरवला जाणारा ऑक्सिजन या कंपन्या बंद असल्याने यांचीही निर्मिती बंद होती. पण नगरमध्ये कोविड रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने औद्योगिक उत्पादनासाठीच्या ऑक्सिजन निर्मिती कारखान्यांतून वैद्यकीय क्षेत्रासाठी ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते का, याचा विचार सुरू झाला आणि अहमदनगर इंड्स्ट्रीयल गॅसेस कंपनीकडेही विचारणा झाली व त्यांना शासनाच्या आदेशानुसार कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मितीची परवानगी मिळाली. येथपर्यंत सारेकाही ठीक असताना राजकीय श्रेयवादाचा प्रकार सुरू झाल्यावर मग ही कंपनीही चर्चेत आली आहे.

काँग्रेसचा पुढाकार

जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोसिम शेख व ऑक्सिजन उत्पादक उद्योजक लोढा यांची मैत्री आहे. औद्योगिक कारखाने बंद असल्याने लोढा यांच्याकडे केवळ वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते, असा विचार करून मोसिम शेख यांनी लोढा यांच्याशी संपर्क साधला व चर्चा केली. त्यानंतर या जोडीेने जाहीरपणे रोज 500 ते 600 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणार असल्याचेही स्पष्ट केले. वृत्तपत्रे व माध्यमजगतातून त्याला प्रसिद्धीही मिळाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केवळ रुग्णालयांसाठी ऑक्सिजन निर्मिती केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

भाजपवालेही धडकले

काँग्रेसच्या पुढाकारानंतर दोन दिवसांनी भाजपवालेही लोढांकडे जाऊन धडकले. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या परिवारातील सदस्यांचे एमआयडीसीमध्ये कारखाने असल्याने त्यांचे व ऑक्सिजन उत्पादक लोढा यांचेही मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे महापौर वाकळेंनीही लोढांकडे जाऊन कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन निर्मिती करण्याची विनंती केली. या विनंतीला लोढांनीही संमती दिली व ऑक्सिजन निर्मिती करून रुग्णालयांसाठी तो पुरवण्याची ग्वाहीही दिली. त्यानंतर भाजपच्या महापौरांच्या सांगण्यावरून लोढांकडून ऑक्सिजन निर्मिती होऊन ती कोविड रुग्णालयांना पोहोचवली जाणार असल्याचे वृत्तही प्रसिद्धी माध्यमांतून झळकले. मात्र, यामुळे काँग्रेस व भाजपमधील श्रेयवादाचे चित्र स्पष्ट झाले. ऑक्सिजन निर्मितीच्या एकाच प्लान्टला काँग्रेस व भाजपने भेट देऊन तेथील कोविड रुग्णांसाठीची ऑक्सिजन निर्मिती आपल्यामुळेच सुरू होत असल्याचा दावा केल्याने हा नगरमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. अर्थात, यावरून अजून शाब्दीक युद्ध वा आरोप-प्रत्यारोपांची पत्रकबाजी रंगलेली नाही. कारण, दोन्ही पक्षांना आश्‍वासने देऊनही अजून येथील ऑक्सिजन निर्मिती प्रतीक्षेत आहे.

चौकट

आजपासून निर्मितीची चिन्हे

यासंदर्भात ऑक्सिजन निर्मिती करणारे उद्योजक लोढा यांच्याशी संपर्क साधला असता ऑक्सिजन निर्मितीसाठी आम्हाला लिक्वीड ऑक्सिजन मिळालेला नाही. त्यामुळे आम्हीच आमच्या कंपनीत आता लिक्वीड ऑक्सिजन तयार करणार असून, त्यानंतर त्यापासून गॅसच्या (हवेच्या) रुपातील ऑक्सिजन करणार आहोत व बुधवारपासून (21 एप्रिल) कोविड रुग्णालयांसाठीची आमची ऑक्सिजन निर्मिती सुरू होईल, असे सांगितले. काँग्रेसचे मोसिम शेख व भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे आपले मित्र आहेत, एवढेच भाष्य त्यांनी करून यानिमित्ताने सुरू असलेल्या श्रेयवादावर बोलणे टाळले.

COMMENTS