काँग्रेस खेळ मोडणार की माघार घेणार…? ;  नगरच्या महापौरपदाची उत्सुकता शिगेला, आज होणार चित्र स्पष्ट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस खेळ मोडणार की माघार घेणार…? ; नगरच्या महापौरपदाची उत्सुकता शिगेला, आज होणार चित्र स्पष्ट

खेळ मांडला..देवा..म्हणत शिवसेनेने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत महापौरपद मिळवण्याचे मनसुबे रचले असले तरी काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीचा हा खेळ मोडणार की माघार घेत या शिवसेना-राष्ट्रवादीला बाय देत सत्तेचे फायदे व पदे पदरात पाडून घेणार, हे मंगळवारी (29 जून) स्पष्ट होणार आहे.

विहिंप व समरसता मंच पदाधिकारी पोहोचले अशोक गायकवाडांच्या घरी
चांगला अभ्यास करत कुटूंबाचे नाव लौकिक करावे
‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ कार्यक्रमात कोपरगावकर झाले लोटपोट

अहमदनगर/प्रतिनिधी-खेळ मांडला..देवा..म्हणत शिवसेनेने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत महापौरपद मिळवण्याचे मनसुबे रचले असले तरी काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीचा हा खेळ मोडणार की माघार घेत या शिवसेना-राष्ट्रवादीला बाय देत सत्तेचे फायदे व पदे पदरात पाडून घेणार, हे मंगळवारी (29 जून) स्पष्ट होणार आहे. यानिमित्ताने नगरच्या नव्या महापौरपदाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

 30 जूनला नगर मनपाच्या महापौर-उपमहापौरपदांची ऑनलाईन निवडणूक होणार आहे. सध्याचे सत्ताधारी भाजपचे उमेदवार नसल्याने या खेळातून ते बाद झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादी एकमेकांना मैत्रीचा धर्म सांगत एकत्र झाले आहेत. सेनेला महापौरपद व राष्ट्रवादीला उपमहापौरपद असे वाटपही त्यांच्यात झाले आहे. अनुसूचि जातीच्या महिला प्रवर्गासाठी असलेल्या यावेळच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी सोमवारी अर्जही दाखल केला आहे तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचा अर्ज मंगळवारी दाखल होणार आहे. या पदाच्या शर्यतीत त्यांच्याकडून ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले व मीना चोपडा यांच्यात रस्सीखेच आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसकडेही शीला चव्हाण या उमेदवार असून, त्यांनाही महापौर व्हायचे आहे व त्यांनीही सोमवारी महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांचे कोरे अर्ज नेले आहेत. त्यामुळे त्या मंगळवारी अखेरच्या दिवशी यापैकी कोणत्या पदाचे अर्ज भरतात की कोणताही अर्ज भरीत नाहीत, यावर सेनेच्या महापौरपदाचे स्वप्न प्रत्यक्षात येते की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

मंत्री थोरातांवर भिस्त

नगर मनपात काँग्रेसचा महापौर करण्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे आता शीला चव्हाण यांनी दोन अर्ज नेले असले तरी थोरात काय आदेश देतात, यावर त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. शिवाय त्यांच्या अर्जावर सूचक-अनुमोदक कोण होणार, हाही प्रश्‍न आहे. कारण काँग्रेसकडे फक्त 5 नगरसेवक आहेत व त्यापैकी बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात आहेत. तसेच चव्हाण यांना बहुमतासाठी आणखी 29 नगरसेवक हवे आहेत. भाजपकडे 15 नगरसेवक असले तरी त्यांचा पाठिंबा ते घेऊ शकत नाहीत. तर दुसरीकडे शिवसेनेकडे 23 व राष्ट्रवादीकडे 19 नगरसेवक असल्याने व त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतल्याने काँग्रेसची स्थिती ना घर का ना घाट का अशी होण्याची दिसू लागली आहे. पण नगर मनपाच्या महापौर निवडीचा आजवरचा इतिहास पाहता अखेरच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते, या मानसिकतेत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसह भाजपही सावध भूमिकेत दिसू लागले आहे.

सूचक-अनुमोदकाचे गूढ

नगर मनपाच्या राजकारणात कोणतेही दोन पक्ष एकत्र आल्यावर एका पक्षाच्या उमेदवाराला दुसर्‍या पक्षाचे नगरसेवक सूचक वा अनुमोदक होत असतात. पण शिवसेनेच्या शेंडगे यांनी दाखल केलेल्या चारही अर्जांवर शिवसेनेचेच नगरसेवक सूचक-अनुमोदक आहेत. राष्ट्रवादीच्या एकाही नगरसेवकाने यावर सही केलेली नाही. ती का केली नाही, याचे गूढ वाढले आहे. तसेच आता मंगळवारी राष्ट्रवादीचा उपमहापौरपदाचा अर्ज दाखल होताना त्यावरही सूचक-अनुमोदक म्हणून शिवसेनेचे कोणतेही नाव दिसणार नाही व फक्त राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांची नावे दिसतील, असेही दिसू लागले आहे. त्यामुळे एकमेकांचे सूचक-अनुमोदक न होणे काही नवा राजकीय खेळ तर घड़वून जाणार नाही ना,याचीही जोरदार चर्चा नगरमध्ये आहे.

COMMENTS