काँग्रेसचा महापौर करण्याचे थोरातांसमोर आव्हान ; शिवसेना-राष्ट्रवादीच्या मनोमीलनाने काँग्रेस बॅकफूटवर, चमत्काराची आशा मात्र धुसर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचा महापौर करण्याचे थोरातांसमोर आव्हान ; शिवसेना-राष्ट्रवादीच्या मनोमीलनाने काँग्रेस बॅकफूटवर, चमत्काराची आशा मात्र धुसर

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर महापालिकेचा नववा महापौर कोण होणार, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

राज्यातील सहकारी पतसंस्थांना दिलासा
जामखेड पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात
कलावंत प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी संजय शिंदे

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर महापालिकेचा नववा महापौर कोण होणार, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीचे मनोमीलन झाल्यावर काँग्रेस बँकफूटवर गेल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसचा महापौर करण्याची जबाबदारी आल्याचे मानले जात आहे. त्यांनीच मध्यंतरी नगरमध्ये बोलताना काँग्रेस महापौर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता शिवसेना व राष्ट्रवादीच्या सहमतीच्या गाडीला थोरात ब्रेक लावून काँग्रेसला हे मानाचे पद मिळवून देतात की नाही, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्येच उमेदवारीची चुरस असल्याने व विरोधी भाजपकडे उमेदवारच नसल्याने यंदाच्या महापौर निवडणुकीत नगरसेवक फोडाफोडी, पाठिंबा खेळी व घोडेबाजारासारखे चमत्कार घडण्याची आशा धुसर मानली जात आहे. 

अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या यंदाच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून गटनेत्या रोहिणी शेंडगे व काँग्रेसच्या शीला चव्हाण या दोन महिला उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. सेनेकडे आणखी दोन व राष्ट्रवादीकडे एक नगरसेविका या प्रवर्गाच्या आहेत. पण त्या उमेदवारीच्या शर्यतीत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवार शेंडगेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची एकत्रित भेट घेतली आहे. यात शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र येऊन महापौर निवडणूक करण्याचे जाहीरही केले गेले आहे. पण महाविकास आघाडीतील या दोन प्रमुख घटक पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस या तिसर्‍या घटक पक्षाला मात्र या मनोमीलनापासून बाजूला ठेवल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे.

थोरातांची इच्छा व जगतापांचा शब्द

दोन-तीन महिन्यांपूर्वी नगरला झालेल्या पक्षीय आढावा बैठकीत बोलताना मंत्री थोरात यांनी काँग्रेसचा महापौर करण्याचे जाहीर केले होते व त्यानुसार त्यांनी मुंबईत आ. जगताप यांच्याशी चर्चाही केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही आ. जगताप यांची भेट घेऊन पाठिंब्याबाबत चर्चा केली होती. या दोन्ही चर्चांच्यावेळी जगतापांनी थोरात व तांबेंना सहकार्याचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत सेना नगरसेवकांसमवेत राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांची जगतापांनी घेतलेली भेट व या भेटीपासून काँग्रेसला दूर ठेवण्याची घडलेली घटना चर्चेची झाली आहे. त्यामुळे आता थोरात व तांबे यांनीच नगरला काँग्रेसचा महापौर करण्याचे जाहीर केले असल्याने ते भाष्य प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आली आहे. दुसरीकडे आ. जगतापांनी त्यांना शब्द दिल्याचे सांगितले जात असले तरी सेना व राष्ट्रवादीचे गुळपीठ आता जवळपास जमल्याचे दिसू लागल्याने काँग्रेसला महापौरपद मिळवून देण्याचे आव्हान थोरात व तांबेंसमोर असणार आहे.

आज चर्चेची शक्यता

शनिवार-रविवार असल्याने मंत्री थोरात संगमनेरला येण्याची शक्यता असल्याने त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी नगरमधून काही काँग्रेस नेते जाणार आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना मनोमीलनाचे प्रसिद्ध झालेले वृत्त व त्यावरून सुरू झालेल्या चर्चांची माहिती त्यांना दिली जाणार असल्याचे समजते. दरम्यान,सेना व राष्ट्रवादी मनोमीलनाची चर्चा असली तरी अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार निश्‍चित झालेला नाही. महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुंबईत तिन्ही पक्षांच्या जिल्ह्याशी संबंधित वरिष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक होऊन त्यात उमेदवार निश्‍चिती होणार असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच प्रत्यक्ष निवडणुकीत कोण उमेदवारी दाखल करतो व कोण माघार घेतो, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

ऑनलाईन होणार निवड

महापौर-उपमहापौर निवडणुकीची सभा येत्या 30 जून रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे पीठासीन अधिकारी म्हणून मनपाच्या सभागृहात होणार्‍या सभेत असतील व नगरसेवक मंडळी ऑनलाईन या सभेत सहभागी होतील. या निवडणुकीसाठी 28 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी दीड व 29जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान कोरे निवडणूक अर्ज वितरित होणार आहेत. तर 29 जूनला दुपारी दीड वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत आहे. 30 रोजी प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यावर दाखल अर्जांची छाननी होणार आहे व माघारीसाठी 15 मिनिटांची मुदत दिली जाणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर मतदान होणार आहे.

उपमहापौरपदाची रस्सीखेच

शिवसेना व राष्ट्रवादीच्या मनोमीलनानंतर सेनेला महापौरपद व राष्ट्रवादीला उपमहापौरपद असे वाटप झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उपमहापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांचे नाव या पदासाठी आघाडीवर आहे. याशिवाय विनित पाऊलबुद्धे तसेच मीना चोपडा ही अन्य दोन नावेही चर्चेत आहेत. त्यामुळे आ. जगताप यापैकी कोणत्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करतात, याचे कुतूहल व्यक्त होत आहे.

COMMENTS