कर्जत प्रतिनिधी किरण जगताप लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून विखे आणि पवार कुटुंबातील सदस्यांची लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच
कर्जत प्रतिनिधी किरण जगताप
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून विखे आणि पवार कुटुंबातील सदस्यांची लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच कर्जतमध्ये एन्ट्री झाली. विविध यंत्रणांचा प्रभावी वापर करून राजकीय प्राबल्य विस्तारित करण्याचे कौशल्य या कुटुंबात रुजलेले आहे. देश आणि राज्याच्या राजकारणात प्रभावशाली असलेल्या या कुटुंबांच्या राजकीय कार्यपद्धतीचा अनुभव कर्जतची जनता घेत आहे.
सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून सध्या त्यांचे राजकारण सुरु आहे. लोकप्रतिनिधी हे स्वतः जनतेपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे आमिषे, प्रलोभने आणि भूलथापा देऊन राजकीय स्वार्थ साधणाऱ्या कर्जत तालुक्यातील अनेक नेत्यांचे फंडे आता जनतेला समजू लागले आहेत. आपल्याला मानणाऱ्या लोकांच्या मतांचा बाजार करून अनेक नेते आपले हात ओले करून घेण्याचे प्रकार करीत. त्या नेत्यांचे पितळ आता उघडे पडताना दिसत आहे.
स्व. आबासाहेब निंबाळकर आणि स्व. विठ्ठलराव भैलुमे यांच्यानंतर कर्जत तालुक्यातील कोणताही नेता आमदार होवू शकला नाही. त्याची अनेक कारणे आहेत. बाहेरच्या नेत्याचा एजंट म्हणून काम करण्यात अनेकांनी धन्यता मानली. काहींनी फितूर होत आपल्या पक्षाची निष्ठा बाजूला ठेवत विरोधकांना मदत केली. निवडणुकीच्या काळात माया जमवली. या बाबी कार्यकर्ते आणि जनतेच्या नजरेतून चुकल्या नाहीत. मात्र अडचणीच्या काळात आपल्याला नेत्याचा आधार असावा, ही लोकभावना रुढ असल्याने त्याची वाच्यता कधीच झाली नाही.
आपला नेता जो म्हणेल त्याचे काम करायचे, या विचारांशी प्रामाणिक राहून लोक गावपुढाऱ्यांच्या विचारांनी राजकीय निर्णय घेत. मात्र गेल्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील आणि रोहित पवार यांनी या भागात एन्ट्री करून थेट जनतेमध्ये जाऊन आपले विचार पोहोचवले. त्यामुळे गावपुढार्यांच्या जोखडातून जनता मुक्त झाली. बड्या नेत्यांशी थेट संवाद झाल्याने गाव, गण आणि गटापुरते मर्यादित राहिलेल्या नेत्यांची राजकीय दुकाने बंद पडू लागली. त्यामुळे कोमात गेलेली नेतेमंडळी सध्या सैरभैर होताना दिसत आहे. मात्र हे राजकीय परिवर्तन सामान्य जनतेच्या पथ्यावर पडणार आहे..

COMMENTS