आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर परिवार नाराज? ; भाजप श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर परिवार नाराज? ; भाजप श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा

नगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना भाजप कार्यालयात बोलावण्याच्या मागच्या आठवड्यात घडलेल्या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत.

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू l पहा LokNews24
Samgamner : तळेगाव दिघे मार्गावर पीकअपचा अपघात
अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी विभागाने विविध ऑनलाईन कार्यक्रमाने केला हिंदी पंधरवाडा उत्साहात साजरा

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना भाजप कार्यालयात बोलावण्याच्या मागच्या आठवड्यात घडलेल्या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. नगर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही अधिकार्‍यांनी आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे तसेच मुंबईतील भाजप पक्षश्रेष्ठींनीही त्यामुळे या भेटीची दखल घेऊन शहरातील पक्षाच्या व मनपातील पदाधिकार्‍यांना त्याचा जाब विचारल्याचे समजते. मात्र, पक्ष पदाधिकार्‍यांकडून याचा इन्कार केला जात आहे. 

    मागच्या आठवड्यात गांधी मैदानातील भाजपच्या कार्यालयात महापौर बाबासाहेब वाकळे व शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्यासह काही नगरसेवक व पक्ष पदाधिकारी असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आ. जगताप या कार्यालयात आले. अर्धातास थांबून नंतर ते निघून गेले. त्यावेळीच राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या कार्यालयात गेल्याच्या या वृत्ताची जोरदार चर्चा शहरात होती. मनपाच्या माध्यमातून शहरात कोणती विकास कामे करता येतील, याबाबतची चर्चा त्यावेळी जगतापांशी झाल्याचे भाजप पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले होते. तर खुद्द जगतापांनी मात्र या भेटीवर काहीच भाष्य केले नव्हते. पत्रकारांनी विचारल्यावर, तुम्हाला तर माहीतच आहे ना, की सध्या शहरात काय चालू आहे ते…असे संदिग्ध, पण आगामी महापौर निवडणुकीच्यादृष्टीने सूचक वक्तव्य करून संभ्रम वाढवला होता. या पार्श्‍वभूमीवर आता शहरातील संघ परिवारातून मात्र आ. जगतापांना भाजप कार्यालयात बोलावण्याच्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली गेली आहे व ती मुंबईतील पक्षश्रेष्ठींपर्यंतही गेल्याने त्यांनीही त्याचा जाब शहरातील व मनपातील आपल्या पदाधिकार्‍यांना विचारल्याचे समजते. राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार आहे व भाजप विरोधात असून, सत्ताधारी संधी मिळेल तेथे भाजपला व केंद्रातील मोदी सरकारला टार्गेट करीत आहेत. अशा स्थितीत स्थानिक राजकारणाचा विषय असला तरी भाजप-राष्ट्रवादीच्या सार्वजनिक भेटीचे व मैत्रीचे चुकीचे संदेश पक्ष समर्थकांमध्ये जात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे यापुढे अशा भेटी टाळण्याची तंबीही दिली गेल्याचे सांगितले जाते.

तेव्हा मैत्री कशी चालली?

अडीच वर्षांपूर्वी जेव्हा भाजपने राष्ट्रवादीची साथ घेऊन महापालिकेत पहिल्यांदा महापौरपद-उपमहापौरपद व अन्य पदे मिळवून सत्ता मिळवली, तेव्हा ती मैत्री कशी चालली, असा सवाल काही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. त्या मैत्रीचा परिणाम त्यांना (राष्ट्रवादी) भोगावा लागला. आपल्याला (भाजप) काहीही तोशीस लागली नाही. मनपा सत्तेतही ही मैत्री आतापर्यंत टिकली आहे. त्यामुळे स्थानिक मनपा राजकारणातील मैत्रीतून जगतापांची ती भाजप कार्यालय भेट होती, असेही समर्थन पदाधिकार्‍यांकडून होत आहे.

COMMENTS