आता आपल्या श्‍वासाची तरी कुणी द्यावी हमी…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता आपल्या श्‍वासाची तरी कुणी द्यावी हमी…

अहमदनगर/प्रतिनिधी - ‘बरे केलीस तू बंद पंढरीची पेठ, ये रानातच न्याहारीला थेट…असे पांडुरंगालाच कोरोनामुळे घातले गेलेले साकडे आणि.. पंचवीस वर्षापूर्वी श

*मराठा आरक्षणाच्या अहवालातील 4 हजार पाने गायब? पहा सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*
कोपरगावमध्ये शुक्र तीर्थ ऑडिओ बुकचे अनावरण  
महात्मा फुलेंनी वंचित घटकाला न्याय देण्याचे काम केले: प्रतापराव ढाकणे

अहमदनगर/प्रतिनिधी – ‘बरे केलीस तू बंद पंढरीची पेठ, ये रानातच न्याहारीला थेट…असे पांडुरंगालाच कोरोनामुळे घातले गेलेले साकडे आणि.. पंचवीस वर्षापूर्वी श्‍वासाची भीती वाटत असल्याने लिहिलेली व आजही ताजी वाटणारी.. ‘आता आपल्या श्‍वासाची तरी कुणी द्यावी हमी, सार्‍या विषारी वायूने आता सारवली भुई’ ही कविता ज्येष्ठ कवी नारायण सुमंत यांनी सादर केली आणि उपस्थितांनी टाळ्यांची जोरदार दाद त्यांना दिली. निमित्त होते- नगरजवळील जांभूळबन येथे रंगलेल्या कोजागिरी काव्यसंमेलनाचे.
येथील काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे प्रमुख डॉ.सुभाष म्हस्के यांच्या कोकण सृष्टीतील जांभूळबनात कोजागिरी पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात निसर्गाच्या सानिध्यात
सुंदर तळ्याकाठी काव्यसंमेलन नुकतेच रंगले. प्रा.सुरेश शिंदे (सोलापूर), प्रा.संजीवनी तळेगावकर (जालना), नारायण सुमंत (पिंपळखुंटा), प्रकाश घोडके (मिरजगाव), नारायण पुरी (औरंगाबाद), भरत दौंडकर (शिरूर), अबीद शेख (यवतमाळ), शर्मिला गोसावी (नगर), युसुफ नदाफ हे कवी यात सहभागी झाले होते. प्रा. तळेगावकर यांनी, ‘गुपित माझ्या मनात लपले..सांगते मी तुला’ ही रचना सुरुवातीला सादर केली. तर नव्या कवितेचा ठसा उमटवणारे कवी पुरी यांनी ‘पायामंदी सलतो गं सखे बोराटीचा काटा,तुह्या पायातली सल त्यात माहा निम्मा वाटा’ ही ग्रामीण बोली भाषेतील कविता सादर करून वाहवा मिळवली. शेतकर्‍यांवर भाष्य करणारी ‘समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे’ ही गझल सादर केली. दौंडकर यांनी शहरीकरण होत असताना जमीन विक्रीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना, ‘गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात, एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात…’ कविता सादर केली. त्यानंतर गोसावी यांनी ‘माय‘ कविता सादर करून दोन धर्मातील सामाजिक अंतर दाखवून दिले. जयंत चौसळकर यांच्या गझल गायनाने संमेलनाचा समारोप झाला. प्रास्ताविक डॉ. म्हस्के यांनी केले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे,अहमदनगर जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असे ते म्हणाले. जांभूळबनातील कोजागिरी कवींना प्रेरणा देत राहील, असे गौरवोदगार कवी सुमंत यांनी व्यक्त केले. काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. शिंदे यांनी केले. पुणे मसापचे विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर यांनी स्वागत करून आभार मानले. या कार्यक्रमास डॉ.सुमती म्हस्के,डॉ. दिप्ती ठाकरे, अभियंता समीर ठाकरे,सुनीताताई ठाकरे, डॉ.कोतवाल, डॉ.अजित फुंदे, सुधाकर कोतवाल (नाशिक),प्रकाश पाटील (पनवेल),बापूसाहेब भोसले,कृषीभूषण बाळासाहेब पिसोरे, रवि कडलग, चित्रकार श्रीधर अंभोरे, सुरेश चव्हाण, दत्ता निक्रड, प्रमोद भारुळे, पद्माकर पवार, शब्दगंधचे सरचिटणीस सुनील गोसावी,अशोक काजळे, सारंग पाटील (अमेरिका) आदी उपस्थित होते.

COMMENTS