आघाडीतील संघर्ष आणि नवीन राजकीय समीकरण

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आघाडीतील संघर्ष आणि नवीन राजकीय समीकरण

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांत उठलेला राजकीय धुरळा अजूनच वेग घेतांना दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मला माजी मंत्री म

ईडीच्या पथकावर हल्ला करणार्‍या नेत्याला अटक
मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार
मोठी कारवाई ; पशुखाद्याआड सुरु होती हि तस्करी | LokNews24


राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांत उठलेला राजकीय धुरळा अजूनच वेग घेतांना दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत समजेल असे वक्तव्य करून राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजचे माजी सहकारी सोबत आले तर उद्या भावी सहकारी होऊ असे वक्तव्य करून, याला खतपाणी घालण्याचे काम केले. त्यानंतर शिवसेना नेते यांनी थेट राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका करून, या वादाला संवग फोडणी दिली.
गेल्या तीन-चार दिवसांतील वक्तव्याकडे चिकित्सक नजरेने बघितल्यास महाविकास आघाडीला शिवसेना तर कंटाळली नव्हे ना?. राज्य चालवण्याचा तसा अनुभव उद्धव ठाकरे यांना नाही. शिवाय भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांवर उठवलेली आरोपांची राळ यामुळे राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना सत्तेत येऊ शकते, किंवा तसे राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यातच सगळे आले. भाजप-शिवसेना युतीचे वातावरण नेमके कोण तयार करत आहेत. तर भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून तसे पद्धतशीर वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळेच अनंत गीते यांच्या वक्तव्यांना महत्व प्राप्त होते. गीते अनेक दिवसांपासून शांत होते. त्यांचा राजकीय प्रवास संपल्यागत ते राजकीय विजनवासात असल्यासारखे असतांना, एकदम त्यांना शरद पवारांवर टीका करण्याचे कुणी सांगितले. राष्ट्रवादी पाठीत खंजीर खुपसण्यासारखे वक्तव्य करतांना आपण सत्तेत त्यांच्यासोबत आहोत याचे देखील त्यांना भान राहत नाही, यावरून ही वक्तव्ये पद्धतशीरपणे पेरण्यात येत असल्याचे तरी दिसून येते.
राज्यात फेबु्रवारी 2022 मध्ये 18 महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामध्ये विशेष म्हणजे मुंबई महापालिकेची निवडूक देखील आहे. अशा परिस्थितीत शिवसेना मुंबई महापालिकेवरचा आपला दावा सोडण्याला तयार नाही. असे असतांना, शिवसेना महाविकास आघाडीमध्ये वितुष्ट येईल, अशी कोणतीही भूमिका घेणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या मनात जर वेगळयाच राजकीय समीकरणांचे विचार घोळत असतील, तर त्याची परिणती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदरच नवीन सत्ता समीकरणांत होऊ शकते. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन पावणे दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी, भाजप नेत्याकडून आघाडीच्या मंत्र्याविरोधात पद्धतशीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप करून, पुढे त्याचे रुपांतर ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या छाप्यामध्ये होतांना दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, शिवसेना, भाजप युती करा असा आग्रह केला होता. विशेष म्हणजे हे पत्र गोपनीय असतांना ते माध्यमांसमोर कसे आले की, ते जाणूनबुजून देण्यात आले, हा मोठा प्रश्‍न आहे. या पत्रापासूनच महाविकास आघाडीमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष झालेले नाना पटोले यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक स्वभावाची परिचिती देत, स्वबळाचा नारा दिला होता. विशेष म्हणजे पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेनेने देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रत्येक पक्षांतील नेत्यांना स्थान देत समन्वय समिती स्थापन करण्यात आली. मात्र त्यापूर्वी पटोले यांचे वक्तव्य हे पक्षांतील कार्यकर्त्यांना बळ देणारे, आणि नवचैतन्य निर्माण करणारे होते. कारण काँगे्रससमोर कोणताही कार्यक्रम नसल्यामुळे काँगे्रसची राज्यात वाईट परिस्थिती आहे. अशावेळी पटोले यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र शिवसेना नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यानंतर ना शरद पवारांनी कोणती प्रतिक्रिया दिली ना, उद्धव ठाकरे यांनी. किंवा ठाकरे यांनी गीते यांना त्यांचे वक्तव्य मागे घेण्यासंदर्भात कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुद्दामहून वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला जात आहे का.
राज्यात जर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहायचे असेल, तर शिवसेना आणि भाजपमध्ये जास्तीत जास्त कसे ताणता येईल, आणि त्यांच्यात वितुष्ट निर्माण होईल, यासाठी राजकीय खेळी खेळण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडीमध्येच आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असतांना, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले. त्यानंतर सोमय्या यांना कोल्हापूरात फिरकू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा मुश्रीफ यांनी घेतला. त्यानंतर सोमय्या यांना कराडमध्ये स्थानबद्द केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. सोमय्या यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची, आणि भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावण्याची तसदी राष्ट्रवादीचे नेते घेतांना दिसून येत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेतेच सोमय्या यांना मोठे करतांना दिसत आहे.
सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र अजित पवारांनी कोणतेही उत्तर न देता अनुल्लेखाने सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर दिले. सोमय्या यांनी आतापर्यंत अनेकांवर आरोप केले, त्याचे पुढे काय झाले, हे सोमय्या यांनी देखील कदाचित माहित नसावे, म्हणून ते नव्याने आरोप करत आहे.
या संपूर्ण प्रकाराने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असले, आणि आगामी काही दिवस असाच राजकीय धुरळा उडत राहिला, तर त्याचे राजकीय परिणाम दिसू शकतात. अर्थात राज्यात सत्ता-बदल होईल आणि शरद पवार ते उघडया डोळयांनी बघतील असेही नाही. कारण राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार असून, त्यांची प्रशासनावर उत्तम पकड आहे. त्यामुळे वार्‍याचा अंदाज आणि राजकीय हवामानाचा अंदाज तेे सहज लावू शकतील. मात्र शिवसेना-राष्ट्रवादीमधील वितुष्ट वाढत गेल्यास महाविकास आघाडीसमोर अडचणी वाढू शकतात.

COMMENTS