अहमदनगर/प्रतिनिधी : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरी 50 टक्के पाऊस झाला असला व पुरेशा पावसाअभावी धरणांतूनही नवे पाणी येण्याची प्रतीक्षा असली तरी
अहमदनगर/प्रतिनिधी : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरी 50 टक्के पाऊस झाला असला व पुरेशा पावसाअभावी धरणांतूनही नवे पाणी येण्याची प्रतीक्षा असली तरी पावसाळा अजून संपला नसल्याने व परतीचा पाऊसही बाकी असल्याने जिल्ह्यातील 223 गावांतून पूर येण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पूर आल्यानंतर या गावांतील आरोग्य राखण्यासाठी आपत्ती जोखीम आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आपत्ती जोखीम व्यवस्थापनांतर्गत नदीकाठवरील गावांमध्ये संभाव्य पूर परिस्थितीत साथरोगाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार या गावांमध्ये पावसाळ्यात पूर परिस्थिती झाल्यास आरोग्याच्या तातडीच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत नदीकाठच्या गावांना नेहमीच पुराचा धोका असतो. गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळित होते, तसेच साथरोगांचा प्रादुर्भावही वाढतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होणार्या गावांमध्ये 223 गावांचा समावेश केला आहे. सध्या कोरोना संसर्गासोबतच पावसाळ्यात या गावांमध्ये पूर येण्याची शक्यता असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे. आरोग्य विभागाने आपत्ती जोखीम व्यवस्थापनांतर्गत नदीकाठच्या गावांची पाहणी केली आहे. या गावांमध्ये जास्त पाऊस झाल्यास नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यास या गावांमध्ये मदत व आरोग्य उपाययोजना करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. गावात पूर आल्यास साथरोग उद्भवण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे यादृष्टीनेही नियोजन केले आहे. तसेच पुराची परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन केले आहे. गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतील आरोग्य अधिकार्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या गावांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे, अशा गावांना जोखीमग्रस्त गावांच्या यादीत टाकण्यात आले असून पावसाळ्याच्या काळात या गावांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
जबाबदारी दिली वाटून
पावसाळ्यात साथरोगांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रण तसेच नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात अधिकार्यांना जबाबदारी निश्चित करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यात सातत्याने साथरोगांचा उद्रेक होणार्या गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या गावात साथरोग उद्भवू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. वैद्यकीय अधिकार्यांची पथके तयार केली आहेत. तसेच आरोग्य केंद्रात पुरेसा औषधांचा साठा ठेवण्यात यावा व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या यात्रा ठिकाणांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राहुरीत सर्वाधिक गावे
जिल्ह्यातील ज्या 223 गावांसाठी आरोग्य आराखडा राबवला जाणार आहे, त्या गावांमध्ये राहुरी तालुक्यातील सर्वाधिक 39 गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात नदी काठावर असलेली अन्य तालुक्यांतील गावे अशी- श्रीरामपूर तालुक्यात 27, नेवासा तालुक्यात 26, अकोले तालुक्यात 24, कर्जत तालुक्यात 22, कोपरगाव तालुक्यात 21 व संगमनेर तालुक्यात 17 गावे.
COMMENTS