मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि कामगार उप आयुक्त, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर
मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि कामगार उप आयुक्त, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर कम्युनिटी हॉल, वांद्रे (पुर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायाधीश श्री. ए. ए. सैय्यद हे होते. कार्यक्रमास न्यायाधीश श्री. आर. डी. धनुका, न्यायाधीश श्रीम. साधना जाधव, न्यायाधीश श्री. व्हि. जी. बिस्ट, उच्च न्यायालय, मुंबई, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, श्री. डी. पी. सुराणा, सदस्य सचिव, महराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी केंद्र शासनाने ऑगस्ट-2021 मध्ये राष्ट्रीय स्तरावर असंघटित कामगारांसाठी डाटा बेस तयार करण्यासाठी सुरु केलेल्या ई-श्रम पोर्टल द्वारे कामगारांची नोंदणी करुन, पाच कामगारांना UAN कार्ड मुख्य न्यायाधीश श्री. ए. ए. सैय्यद व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी कामगार विभागामार्फत असंघटित कामगारांची नोंदणी करण्याकरिता ई-श्रम पोर्टलचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी व कामगारांना विविध कल्याणकारी योजनांद्वारे देण्यात येणारे लाभ, घरकाम करणाऱ्या घरेलू कामगारांची नोंदणी व त्यांना मिळणारे लाभ याबाबतची जनजागृती व माहिती कामगारांना व्हावी याकरिता स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलमध्ये उपस्थित कामगारांना मुंबई उपनगरचे कामगार उप आयुक्त श्री. भ. मा. आंधळे व मुंबई शहर कामगार उप आयुक्त निलांबरी भोसले यांनी माहिती दिली.
मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त कामगारांनी घरेलू कामगार कल्याण मंडळ तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करावी असे कामगार आयुक्तालयामार्फत आवाहन करण्यात आले. असंघटित क्षेत्रातील कामगार रिक्षावाले, फेरीवाले, मच्छीमार, शेतमजूर, दुधवाले, पानवाले, धोबी, सफाई कामगार, केश कर्तनालय कामगार, घरेलू कामगार, बांधकाम कामगार इत्यादी प्रकारचे 300 उद्योगातील व व्यवसायातील कामगारांनी सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 अंतर्गत भविष्यामध्ये विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करावी असेही आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास सहायक कामगार आयुक्त राजश्री पाटील तसेच सरकारी कामगार अधिकारी स्वरा गुरव हे अधिकारी कामगार आयुक्त कार्यालयातील प्रविण कावळे, महेश पाटील, कैलास मुजमुले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये नागरी सुविधा केंद्राचे कर्मचारी तसेच कामगार सुविधा केंद्रातील कर्मचारी यांनीदेखील सहभाग नोंदविला.
COMMENTS