कोरोनाच्या पहिल्या लाटेतच भारताच्या आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले होते. दुसर्या लाटेने आरोग्ये सेवेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतच भारताच्या आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले होते. दुसर्या लाटेने आरोग्ये सेवेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. अगोदरच भारतात डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचार्यांची कमतरता असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावही कोरोनाचा प्रसार व्हायला कारणीभूत आहे. कुंभमेळा, कलश यात्रांसारख्या उपक्रमांना परवानगी देऊन कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला. गुजरातसारखे प्रगत राज्य असो, की मध्य प्रदेशसारखे मागासलेले राज्य; दोन्हींची मानसिकता सारखीच आहे.
कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार, त्यामुळे होणारे मृत्यू पाहता त्यावर वैज्ञानिक जे सांगतात, तेच उपचार केले पाहिजेत. ही प्रयोगाची वेळ नाही. त्यामुळे जे सिद्धांतातून सिद्ध झाले आहे, त्याचाच आधार उपचारासाठी घेतला पाहिजे. कधी कधी डॉक्टरही वेगवेगळे प्रयोग करतात. त्याचे कारण कोरोनावर अजून कोणतेही औषध निघालेले नाही. प्रतिकारशक्ती वाढविणारी इतर आजारांवरची औषधे दिली जात आहेत. आपल्या पुराणात कितीही चांगले उल्लेख असले, तरी आता कोरोनावर उपचार करण्यासाठी पारंपरिक उपचार करून रुग्णांच्या जीविताशी खेळ करणे योग्य नाही. डॉक्टरांनी खरेतर विवेकी भूमिका घेणे आवश्यक आहे; परंतु काही डॉक्टरही अजून वैज्ञानिक मानसिकतेपासून कोसो दूर आहेत. शहरांसोबतच आता कोरोना विषाणू गावागावांत दाखल झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी कोरोनाचा जणू काय धसकाच घेतला. कोरोनाला पळवण्यासाठी कुणी यज्ञ करते, कुणी पूजा-अर्चना करते तर कुणी आणखी काही… त्यातही त्रिपुराचे मुख्यमंत्री त्रिवेंदसिंह रावत यांच्यासह भाजपच्या काही आमदारांनीही अकलेचे दिवे पाजळले आहेत. कोरोना हा ही एक जीव आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. आपण त्यावर वेगवेगळे उपाय करीत असल्याने तोही आपल्या रुपात बदल करतो आहे. आता कोरोनाही काही फक्त मानवापुरता मर्यादित राहिला नाही. सिंहांसह अमन्य काही प्राण्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मानवी संपर्कात आलेल्या प्राण्यांची खरेतर काळजी घ्यायला हवी; परंतु आता वेगळेच घडायला लागले आहे. अहमदाबादच्या काही गोशाळांत मात्र नागरिक गोबर आणि गोमूत्राने स्नान करताना आढळून येत आहेत. असे प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉक्टरांनी मात्र अशा अवैज्ञानिक प्रकारांपासून लांबच राहण्याचा सल्ला दिला आहे. गर्दी टाळणे हा कोरोनापासून बचाव करण्याचा मार्ग असताना गुजरातच्या काही गोशाळांमध्ये लोक एकत्र जमा होत गोमूत्राने आंघोळ करतानाच शेणाचा वापर शरीरावर चोळण्यासाठी करत आहेत. हे करताना सामाजिक अंतर भान, मुखपट्टीसह कोरोनाविषयक अन्य नियमांचे उल्लंघन तर केले जातेच; शिवाय त्यामुळे कोरोनाचा प्रसार व्हायला मदत होत आहे. गोबर थेरपी आणि गोमूत्राच्या वापराने शरीरात रोगप्रतिकार शक्ती तयार होऊ शकते आणि आपण कोरोनापासून वाचू शकतो, असा दावा काहीजण करतात. या गोशाळांमध्ये अनेक डॉक्टर्सही दाखल होत आहेत. गायीच्या मलमूत्रामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते आणि कोणत्याही उपचाराविना रुग्ण कोरोनातून बरे होऊ शकतात, असे वैज्ञानिक दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे एका फार्मा कंपनीचे सह व्यवस्थापक असलेल्या गौतम मणिलाल बोरिया यांनी आपण श्री स्वामीनारायण गुरुकूल विद्यापीठात जाऊन या ’गोबर थेरेपी’चा प्रयोग करत असल्याचे म्हटले. गेल्या वर्षी अनेक लोक कोरोना संक्रमित आढळले होते; मात्र याच पद्धतीचे वापर करत ते अत्यंत धोकादायक अशा कोरोनावर विजय मिळवण्यात यशस्वी झाल्याचा दावाही मणिलाल यांनी केला आहे. गोशाळेतील असलेल्या गायींना कुरवाळत आपल्या शरीरावर हे लोक शेण चोळताना दिसत आहेत. त्यानंतर ते योग आणि ध्यानधारणाही करत आहेत. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि मानसिक सुदृढतेसाठी योग ध्यानधारणा ठीक आहे; परंतु गोबर थेरपी गोमूत्राचा वापर अवैज्ञानिक आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. नगरमधील एका कथित डॉक्टराने मद्य पिल्याने कोरोनातून लवकर बरे होता येते, असा जावईशोध लावला होता. माध्यमेही खुशाल अशा अवैज्ञानिक दाव्यांना प्रसिद्धी देतात. त्यांच्यावर खरेतर कारवाई व्हायला हवी. या कथित डॉक्टरांना जेव्हा नोटीस मिळाली, तेव्हा ते माफीनामा घेऊन आले; परंतु त्यांनी मद्यपान करायला लावून ज्यांच्यावर अशा पद्धतीने उपचार केले, त्याबद्दल अशा माफीनाम्याऐवजी थेट गुन्हाच दाखल करायला हवा. भारतातील अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञांनी कोरोनावर असे अवैज्ञानिक उपाय आजमावून पाहण्यापासून दूरच राहण्याचा सल्ला दिला आहे. गोबर थेरपीमुळे बाधितांच्या त्रासात आणखी भर पडू शकते, असा धोक्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला. या संदर्भात ’इंडियन मेडिकल असोसिएशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जे. ए. जयलाल यांनी, ’गोबर किंवा गोमूत्राने कोेरोनाविरुद्ध लढाईत रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते, अशा दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही,’ असे मत व्यक्त केले. अशा प्रकारचे उपाय हे केवळ आणि केवळ आस्थेवर आधारीत आहेत; परंतु यामुळे परिस्थिती आणखीच बिघडू शकते, असा इशारा त्यांनी दिला. गोबरमुळे जनावरांच्या माध्यमांतून मनुष्यात फैलावणार्या आजारांचा धोका यामुळे वाढ शकतो. याशिवाय अशा उपायांमुळे कोरोनाच्या धोक्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. ’मल-मूत्राची थेरपी’ घेण्यासाठी एकाच वेळी अनेक लोक गोशाळेत दाखल होतत. या वेळी ते मुखपट्टी आणि सामाजिक अंतर भानाचे नियम धाब्यावर बसवतानाही आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याचा धोका आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बलियास्थित बैरिया विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह कॅमेर्यासमोर गोमूत्र पिताना दिसले होते. गोमूत्राने कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे त्यांनी म्हटले होते.
COMMENTS