नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेची टांगती तलवार कायम असून, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत देखील देशमुख यांची याचिक
नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेची टांगती तलवार कायम असून, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत देखील देशमुख यांची याचिका फेटाळल्यामुळे देशमुखांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग तसेच 100 कोटींच्या वसुली प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अनेकदा नोटीस बजावली आहे. मात्र, नोटीस बजावूनही अनिल देशमुख यांनी काही कारणे देत प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर ईडीने कारवाई करू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. काही याचिकांच्या माध्यमातून काही मागण्या केल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सर्व मागण्या फेटाळून लावल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्या. ए. एम. खानविलकर, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. व्ही रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. ज्येष्ठ विधीज्ञ विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत प्रामुख्याने तपासाला स्थगिती द्यावी, ईडीकडून पाठवण्यात आलेले समन्स रद्द करावे, अटकेसारखी गंभीर कारवाई करण्यास मज्जाव करावी, अशा मागण्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या मागण्या करणार्या याचिका फेटाळून लावल्या.
COMMENTS