उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी करणाऱ्या सीबीआयने शनिवारी त्यांच्या विरोधात भादंविचे कलम 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल केलाय.
मुंबई : उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी करणाऱ्या सीबीआयने शनिवारी त्यांच्या विरोधात भादंविचे कलम 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल केलाय. तसेच देशमुखांच्या मुंबई, नागपूर आणि काटोल येथील निवासस्थानी सकाळपासून सीबीआयचे पथक झाडाझडती घेत आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नाव आहे. त्याचयोबत इतर अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीबीआय दिल्लीची टीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईत चौकशी करत होती. परंतु, शनिवारी सकाळपासून याप्रकरणी चौकशीसाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. नागपूर आणि मुंबईमध्ये सीबीआयने या धाडी टाकल्यात. अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोलच्या घरी तसेच मुंबईतल्या सुखदा सोसायटीमधल्या घरी सीबीआयने छापे टाकले आहेत. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्ट वर्तणुकीची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी’ अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आणि त्यानंतर गेल्या 5 एप्रिलला अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देशमुख यांना सीबीआय कार्यालयात बोलावून प्रदीर्घ चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे देशमुख यांच्या दोन स्वीय साहयकांची देखील सीबीआयने कसून चौकशी केली होती.
COMMENTS