अग्निशमन दलाची वीज खंडीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अग्निशमन दलाची वीज खंडीत

दोन महिन्यांचे वीजबिल न भरल्यामुळे ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राची वीजजोडणी महावितरणकडून मंगळवारी सकाळी तोडण्यात आली.

महिला T-20 लिग मालामाल
संगमनेरात  थोरात सहकारी साखर कारखानाच्या गळीत हंगामांची सांगता
केंद्र सरकार करणार 138 बेटिंग अ‍ॅप्सना ब्लॉक

मुंबई / प्रतिनिधी: दोन महिन्यांचे वीजबिल न भरल्यामुळे ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राची वीजजोडणी महावितरणकडून मंगळवारी सकाळी तोडण्यात आली. त्यामुळे सकाळपासून अग्निशमन केंद्रात वीज नव्हती, परिणामी अग्निशमन केंद्रातील सर्व फोनही बंद झाले होते. फोन बंद झाल्याने कोणती आपत्कालीन घटना घडल्यास अग्निशमन दलाशी कसा संपर्क साधणार, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. वीजबिलाची फाइल अग्निशमन अधिकार्‍यांकडून वेळेत पाठविली न गेल्याने दोन महिन्यांचे वीजबिल भरले नसल्याचे समजते.

महापालिकेच्या वतीने वीजबिलांचा भरणा हा ऑनलाइन पद्धतीने केला जातो. त्यासाठी त्या त्या विभागातील मुख्य अधिकार्‍यांकडून फाइल वेळेत तयार करून द्यावी लागते. महापालिकेच्या पाचही अग्निशमन केंद्रांच्या वीजबिलाचा भरणा वाशीतील मुख्य अग्निशमन केंद्रातूनच केला जातो. त्याची बिलेही ऑनलाइनच पाठवली जातात; मात्र अग्निशमन अधिकार्‍यांकडून त्याकडे वेळेत लक्ष न दिले गेल्याने ऐरोलीतील अग्निशमन केंद्राचे वीजबिल दोन महिन्यांपासून भरण्यात आले नव्हते. या बिलाची रक्कम 66 हजारांच्या घरात होती. त्यामुळे मंगळवारी ऐरोली येथील महावितरणच्या कर्मचार्‍यांनी अग्निशमन दलाची वीज खंडित केली. ऐरोलीतील अग्निशमन दलाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ऐरोली डेपोलगत असलेले अग्निशमन दलाचे कार्यालय सध्या पटणी रोडनजीकच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे फोन फायबर ऑप्टिक्सवर सुरू ठेवण्यात आले असल्याने वीज असते, तेव्हाच फोन चालू असतात आणि फोन सुरू असले तरच नागरिक अग्निशमन दलाशी संपर्क साधू शकतात; मात्र वीजपुरवठा खंडित झाल्याने अग्निशमन दलाचा संपर्कही तुटला. या वेळी शहरात कोणती आपत्कालीन घटना घडली नाही; मात्र असे झाले असते तर संपर्क साधणार कसा, असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

 या संदर्भात अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, वीजबिल वेळेवर न मिळाल्याने हे बिल भरण्यास उशीर झाला, असे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात वीजबिले ऑनलाइन येत असताना याची काळजी घेणे आणि या संदर्भातील फाईल तयार करणे, हे काम वाशी येथील मुख्य अग्निशमन केंद्रातूनच होत असते; मात्र या ठिकाणी अधिकार्‍यांकडून एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचे प्रकार होत असल्याने हे असे प्रकार होत असल्याचे वाशी कार्यालयातील काही कर्मचार्‍यांनी सांगितले. महापालिकेच्या अग्निशमन दलाला अजूनही मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद भरले गेलेले नाही. त्यामुळे विभागीय अधिकार्‍यांच्या खांद्यावरच सर्व कारभार सुरू आहे. त्यातूनच अनेक कामे रेंगाळत असल्याचे दिसत आहे.

COMMENTS