अखेर ’प्लाझ्मा थेरपी’ ला मूठमाती

Homeसंपादकीयदखल

अखेर ’प्लाझ्मा थेरपी’ ला मूठमाती

कोणत्याही गंभीर आजारावर प्रयोग उपयोगाचे नसतात. उपचार पद्धतीच्या बाबतीत तर फार काळजी घ्यावी लागते. वैज्ञानिक कसोट्यांवर, क्लिनिकल चाचण्यांच्या निष्कर्षावर एखादी उपचार पद्धती सुरू ठेवायची, की नाही, हे ठरवायचं

एक सदस्यीय वार्ड रचना स्वागतार्ह!
उमी तशी सुमी गत व्हायला नको!
निवडून आल्या महिला अन् शपथ घेताहेत पुरूष !

कोणत्याही गंभीर आजारावर प्रयोग उपयोगाचे नसतात. उपचार पद्धतीच्या बाबतीत तर फार काळजी घ्यावी लागते. वैज्ञानिक कसोट्यांवर, क्लिनिकल चाचण्यांच्या निष्कर्षावर एखादी उपचार पद्धती सुरू ठेवायची, की नाही, हे ठरवायचं असतं. महागड्या आजारांबाबत तर हे अतिशय गांभीर्यानं घेणं आवश्यक असतं. ऐकीव माहितीवर, कुणाच्या तरी सल्ल्यानं केलेले उपचार उपयुक्त ठरत नाही. प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या बाबतीतही हा निष्कर्ष पुढं आल्यानं आता तिला तिलांजली देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

    आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही अंदाजावर अवलंबून राहून चालत नाही. कोरोनासारख्या गंभीर आजारावर अजून उपचार आणि औषधं सापडलेली नाहीत. कोरोनाचा विषाणू आढळून दीड वर्ष झालं असलं, तरी अजूनही आपण अंधारात चाचपडत आहोत. प्रयोगामागून प्रयोग आणि अन्य विकारांवरचे उपाय कोरोनावर केले जातात. खरंतर अशा गंभीर विकारावर उपचार करताना त्यात क्लिनिकल ट्रायल किती झाल्या, त्याचे निष्कर्ष काय हे तपासून घ्यायला हवं. वैज्ञानिक कसोटीवर टिकणारे प्रयोग करायला हवेत. गेल्या वर्षभरापासून कोरोनावर प्लाझ्मा थेरपी केली जाते. या उपचार पद्धतीवर सुरुवातीपासून काही आक्षेप घेतले जात होते. असं असताना भारतात मात्र अन्य आजारावर ज्या ’प्लाझ्मा थेरपी’चा उपयोग करण्यात आला, तीच उपचार पद्धती वापरली जात होती. भारतात कोरोनावर प्लाझ्मा उपचारपद्धतीची वैज्ञानिक पातळीवर चिकित्सा झाली नसताना तिचा पुरस्कार केला गेला. भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषदे (आयसीएमआर )त त्यावर एकमत नव्हतं, तरीही कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातच ’प्लाझ्मा थेरपी’ वापरावी, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात नको, असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं; परंतु ’प्लाझ्मा थेरपी’मुळं कोरोना बरा होतो, असं डॉक्टर सांगायला लागले. काही डॉक्टरांनी त्यासाठी चळवळ उभारली. भारतात ही थेरपी आता रुळायला लागली. जगभरात या थेरपीचे अनुभव वेगवेगळे आहेत. ब्रिटनमध्ये 1100 जणांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. त्यातील एकाचाही कोरोना या थेरपीमुळं बरा झाला नाही. विशेष म्हणजे याच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर ’प्लाझ्मा थेरपी’ करण्यात आली होती. या थेरपीचा पुरस्कार करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेसह अन्य नामवंत संस्था वारंवार या थेरपीविषयी शंका घेत होत्या. आता भारतीय वैद्यक संशोधन परिषदेलाही उपरती झाली आहे. आता ’आयसीएमआर’ आणि ’एम्स’ नं कोरोनाच्या उपचारातून ’प्लाझ्मा थेरपी’ काढून टाकण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. ’आयसीएमआर’च्या राष्ट्रीय कृती दलाच्या सदस्यांनी सुचवल्यानंतर एका दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय कृती दलाच्या बैठकीत सर्व सदस्य ’प्लाझ्मा थेरपी’ प्रभावी नसल्याच्या बाजूनं होते आणि त्यांनी कोरोना उपचार पद्धतीतून प्लाझ्मा उपचार पद्धती काढून टाकावी, अशी शिफारस करण्यात आली होती. अलीकडंच अनेक वैद्य आणि वैज्ञानिकांनी पंतप्रधानांचे प्रधान वैज्ञानिक सचिव विजय राघवन यांना पत्र लिहून ’कोव्हॅलेंट प्लाझ्मा’चा असमंजसपूर्ण आणि अवैज्ञानिक उपयोगाविरुद्ध इशारा दिला. सार्वजनिक आरोग्य व्यावसायिकांनी असं सांगितलं, की कोविडवरील ’प्लाझ्मा थेरपी’चे सध्याचे पुरावे आणि ’आयसीएमआर’ मार्गदर्शक तत्त्वं विद्यमान पुराव्यांवर आधारित नाहीत. रक्तामध्ये प्लाझ्मा हा पिवळसर रंगाचा द्रव घटक असतो. निरोगी शरीरात 55 टक्क्यांहून अधिक प्लाझ्मा असतात आणि त्यात पाण्याव्यतिरिक्त हार्मोन्स, प्रथिनं, कार्बन डायॉक्साईड आणि ग्लुकोज खनिजं असतात. जेव्हा एखादा रुग्ण कोरोनामधून बरा होतो, तेव्हा कोरोना पीडिताला त्याच प्लाझ्माची ऑफर दिली जाते. याला ’प्लाझ्मा थेरपी’ म्हणतात. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिली गेली तर बरं झालेल्या रुग्णांत प्रतिपिंडं तयार होतात. त्यामुळं प्रतिकार शक्ती वाढून विषाणूविरूद्ध लढण्यास शरीराची क्षमता तयार होते, असा दावा केला जात होता. आता ’प्लाझ्मा थेरपी’चा जो अभ्यास समोर आला आहे, तो धक्कादायक आहे. ब्रिटनमध्ये 11 हजार लोकांवर एक चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ’प्लाझ्मा थेरपी’नं कोणताही चमत्कार दाखविला नाही. ’एम्स’ आणि ’आयसीएमआर’नं नवीन मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. आधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, ’आयसीएमआर’नं ’प्लाझ्मा थेरपी’विषयी दोन मोठ्या गोष्टी सांगितल्या होत्या. सर्वप्रथम, त्याच कोरोना रूग्णांवर ’प्लाझ्मा थेरपी’ वापरली जाऊ शकते, ज्यांना संसर्गाची थोडी किंवा मध्यम लक्षणं आहेत. दुसरं म्हणजे, या श्रेणीतील रूग्णांना प्लाझ्मा दिला जात असेल, तर त्याची मुदत 4 ते 7 दिवसांची असावी, असं म्हटलं होतं; परंतु असं असूनही अनेक रुग्णालयात गंभीर रूग्णांवर याचा उपयोग होत होता. आता मात्र ही पद्धती उपचारातून काढून टाकण्यात आली. बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ’प्लाझ्मा थेरपी’चा कोणताही फायदा नसल्याचं समोर आलं. ’प्लाझ्मा थेरपी’ महाग आहे आणि यामुळे भीती निर्माण होत आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेवर ओझं वाढलं असूनही रुग्णांना मदत होत नाही. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मामध्ये प्रतिपिंडं पुरेशा संख्येनं असणं आवश्यक आहे; परंतु हे निश्‍चित नसतं. ’प्लाझ्मा थेरपी’चा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात होता. त्याबाबत तज्ज्ञांनी के. विजय राघवन यांचं लक्ष वेधण्यात आलं होतं. त्याबाबत ’आयसीएमआर’चे प्रमुख बलराम भार्गव आणि ’एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आलं. प्लाझ्मा पद्धत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वं आणि पुरावा यावर आधारित नाही. सध्या सुरू असलेल्या संशोधनात हे स्पष्ट झालं आहे, की कोरोना रुग्णांना ’प्लाझ्मा थेरपी’चा काही उपयोग नाही. असं असूनही देशभरातील रुग्णालयात याचा उपयोग तर्कहीनपणे केला जात आहे. देशात 11 हजार 588 रुग्णांवर ’प्लाझ्मा थेरपी’ची चाचणी घेतल्यानंतर असं आढळून आलं, की यामुळं रुग्णांच्या मृत्यू आणि रुग्णालयातून बाहेर पडण्याच्या प्रमाणात काही फरक पडला नाही. कोरोना बाधित रुग्णांवर ’प्लाझ्मा थेरपी’च्या चाचण्या केल्यानंतर त्याचा विशेष फायदा होताना दिसत नाही, असं ’एम्स’नं म्हटलं आहे. ’प्लाझ्मा थेरपी’चा नेमका प्रभाव जाणून घेण्यासाठी 15-15 रुग्णांचे दोन गट बनवण्यात आले होते. यातल्या रुग्णांच्या एका गटाला कोरोनाचे सामान्य उपचार देण्यात आले होते, तर दुसर्‍या गटाला ’प्लाझ्मा थेरपी’चा उपचार करण्यात आला होता. डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही गटातील रुग्णांचा मृत्यू दर हा समान होता आणि दोन्ही गटांना काही विशेष फायदा मिळाला नाही. ’प्लाझ्मा थेरपी’ अजूनही चाचण्यांच्या पातळीवर असून त्याचा अंतिम निष्कर्ष अद्यापही आलेला नाही. असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानंही ’प्लाझ्मा थेरपी’कडं एक प्रायोगिक उपचारपद्धती म्हणूनच पाहिल्याचं ’आयसीएमआर’कडून सांगण्यात आलं होतं. अजून बरंच संशोधन यात होणं बाकी आहे, त्यामुळं तिचा वापर करण्याबाबत अमेरिकेतही संदिग्धता होती. ’प्लाझ्मा थेरपी’चा अयोग्य वापर केल्यानं कोरोना विषाणूच्या धोकादायक ताणण्याची शक्यताही वाढत आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ’प्लाझ्मा थेरपी’च्या यशस्वीततेचे कोणतेही पुरावे नाहीत, तरीही देशभरातील रुग्णालयात ती सर्रास वापरली जात होती. केरळ आणि महाराष्ट्रात ही उपचार पद्धती अधिक वापरली गेली. पहिल्या महायुद्धात 1918 मध्ये पसरलेल्या ’स्पॅनिश फ्लू’पासून लोकांची सुटका करण्यासाठी ’प्लाझ्मा थेरपी’चा वापर करण्यात आला होता. इबोला या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांकरता ’प्लाझ्मा थेरपी’चा वापर करण्यात आला होता. इबोलानं थैमान घातल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं ’प्लाझ्मा थेरपी’बाबत मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली. आताही तसंच अंधारात चाचपडत उपचार करण्यात आले; परंतु खर्चिक उपचार करूनही त्यांचा फारसा फायदा होत नसल्यानं त्यावर आता बंदी घातली; परंतु त्यासाठी एक वर्ष लागलं.  

ःःःःःःःःःःःःःः.

COMMENTS