Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निसर्गसंवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : अभिनेते सयाजी शिंदे

अकोले : निसर्गसंवर्धन आणि साहस शिक्षणाच्या माध्यमातून तरुणाईला योग्य दिशा मिळते. त्यामुळे विद्यार्थीदशेत अशा धाडसी उपक्रमांत सहभागी होऊन निसर्ग रक

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमलीपदार्थप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल
हंगाम, पेरणी आणि भुजबळ !

अकोले : निसर्गसंवर्धन आणि साहस शिक्षणाच्या माध्यमातून तरुणाईला योग्य दिशा मिळते. त्यामुळे विद्यार्थीदशेत अशा धाडसी उपक्रमांत सहभागी होऊन निसर्ग रक्षणासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठ, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत  रतनवाडी (कळसुबाई–हरिश्चंद्रगड अभयारण्य) येथे आयोजित २९ व्या राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात राज्यभरातील २७० विद्यार्थी व १६ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.

समारोप समारंभास ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सिनेअभिनेते सयाजी शिंदे, सौ. अलका शिंदे, शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे तसेच एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा. रंगनाथ पठारे यांनी गिर्यारोहणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संस्कार रुजविणाऱ्या डॉ. मोहन वामन यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी बोलताना सयाजी शिंदे यांनी निसर्गसंवर्धनासाठी सह्याद्री देवराई संस्थेमार्फत सुरू असलेल्या कार्याची माहिती देत, योग्य दिशा व सकारात्मक उपक्रमांच्या माध्यमातून तरुण लवकर यशस्वी होऊ शकतात, असे सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत करताना ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन वामन यांनी माहिती दिली की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सन १९९७ पासून या अभयारण्यात राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिराचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत सुमारे १५ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी गिर्यारोहण व रॅप्लिंगचे प्रशिक्षण घेतले असून, या शिबिरामुळे स्थानिक आदिवासींना रोजगाराची संधी मिळते.

प्रस्ताविकात डॉ. मीनल भोसले यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. या उपक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती डॉ. सोमनाथ पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. रोहिणीताई पाटील, कुलगुरू डॉ. मोहन वामन व कुलसचिव डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख यांनी केले, तर आभार प्र-प्राचार्य डॉ. मुकेश तिवारी यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी विकास अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.

COMMENTS