xr:d:DAF1XU2IAWM:54,j:8318560495602170102,t:23121118 4 जण पोलिसांच्या ताब्यात, परिसरात तणावअर्धापूर ः शहरातील प्रज्ञा बौद्ध विहाराजवळ राहणारा व्यंक

4 जण पोलिसांच्या ताब्यात, परिसरात तणाव
अर्धापूर ः शहरातील प्रज्ञा बौद्ध विहाराजवळ राहणारा व्यंकटी चांदू वाघमारे (वय 25) याचा किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अर्धापूर येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटी वाघमारे व काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडणादरम्यान व्यंकटी वाघमारे यांच्या गुप्तांगावर जोरदार मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. उपस्थितांनी तातडीने त्यांना उचलून अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. या प्रकरणी पोलिसांनी वेळीच समयसूचकता दाखवत चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृत्यूचे नेमके कारण व घटनेमागील पार्श्वभूमी याबाबत अधिक तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कलमे लावण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली. या कारवाईत सपोनि विष्णुपंत कराळे, ठाणे अंमलदार जमदाडे तसेच पोलीस कर्मचारी गौतम कांबळे आणि इंदू गवळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. अकाली मृत्यूमुळे वाघमारे कुटुंबावर शोककळा पसरली असून नातेवाईक व मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू आहे.
भांडण सोडवण्याचा प्रयत्नात गमावला जीव
क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादातून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. व्यंकटी वाघमारे हे रात्री आपल्या घरी जेवण करत असताना घराबाहेर रस्त्यावर काही तरुणांमध्ये भांडण सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोंधळाचा आवाज वाढत असल्याने व्यंकटी वाघमारे यांनी जेवण अर्धवट सोडून बाहेर धाव घेतली. संबंधित तरुणांमधील भांडण सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र या दरम्यान झालेल्या गोंधळात आणि झटापटीत व्यंकटी वाघमारे गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. नातेवाईकांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

COMMENTS