मुंबई : भारताने टी-20 विश्वचषक 2026 जिंकत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयानंतर भारतीय संघाच्या सन्

मुंबई : भारताने टी-20 विश्वचषक 2026 जिंकत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयानंतर भारतीय संघाच्या सन्मानार्थ मुंबईत भव्य विजय मिरवणूक आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नसला, तरी सूत्रांच्या माहितीनुसार या सोहळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयी भारतीय संघ प्रथम नवी दिल्ली येथे दाखल होऊ शकतो. तेथे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण संघ दिल्लीहून मुंबईत येईल. मुंबईत 11 किंवा 12 मार्च रोजी विजयी मिरवणूक काढण्याचा विचार सुरू असून या कार्यक्रमाचा समारोप वानखेडे क्रीडांगणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथे विशेष सत्कार समारंभ आयोजित करून खेळाडूंना पारितोषिके देण्यात येतील, अशी माहिती आहे. मुंबईतील हा विजय सोहळा यापूर्वीच्या ऐतिहासिक क्षणांची आठवण करून देणारा ठरू शकतो. मिरवणूक नरिमन पॉइंट ते वानखेडे क्रीडांगण या मार्गावर उघड्या बसमधून काढली जाऊ शकते. मोठ्या प्रमाणात चाहत्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि प्रशासन विशेष नियोजन करत आहे. गर्दी नियंत्रण आणि सुरळीत व्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS