जिल्ह्यात घडणार्या सर्व जन्म आणि मृत्यू घटनांची शंभर टक्के नोंदणी व्हावी तसेच याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, असे निर्देश जिल्हाधिक

जिल्ह्यात घडणार्या सर्व जन्म आणि मृत्यू घटनांची शंभर टक्के नोंदणी व्हावी तसेच याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
जन्म-मृत्यू नोंदणीची अंमलबजावणी आणि नियंत्रणाबाबत आढावा घेण्यासाठी गुरुवार, दि. 5 मार्च रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील नोंदणी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आयएमएचे अध्यक्ष तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, प्रत्येक निबंधकाने आपल्या कार्यक्षेत्रात घडणार्या जन्म व मृत्यू घटनांची नोंद कायद्यातील तरतुदीनुसार 21 दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करून नोंदणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. तसेच गावपातळीपासून तालुका स्तरापर्यंत विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जनजागृती करावी. जन्म-मृत्यू नोंदणीचे महत्त्व, प्रमाणपत्रांचा उपयोग आणि त्याचे फायदे ग्रामसभांमधून नागरिकांना समजावून सांगावेत, जेणेकरून नागरिक वेळेत नोंदणी करतील आणि उशिरा नोंदणी करण्याची वेळ येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात जन्म-मृत्यू नोंदणीची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या.

COMMENTS