महाराष्ट्रात नेमके काय सुरू आहे ? असा सवाल आता सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतांना दिसून येत आहे. राज्यात बीड आणि परभणही प्रकरणाचे पडसाद मोठ्य
महाराष्ट्रात नेमके काय सुरू आहे ? असा सवाल आता सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतांना दिसून येत आहे. राज्यात बीड आणि परभणही प्रकरणाचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटतांना दिसून येत आहे. परभणी प्रकरण काहीसे शांत झाले असले तरी, बीड प्रकरण अजून काही दिवस शांत होण्याची चिन्हे नाहीत. विरोधकांनी याप्रकरणी वाल्मीक कराड आणि महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याची प्रमुख मागणी केली आहे. तर दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याचे पडसाद राज्यभर उमटतांना दिसून येत आहे. खरंतर अशा लढ्यात एखाद्या महिलेला ओढून तिची प्रतीमा मलीन करणे अयोग्य आहे. मात्र यासोबतच या कलाकारांनी देखील आपली सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे. खरंतर बीड असेल किंवा परभणी असेल या घटनेविरोधात एखाद्याही कलाकाराने साधे ट्विट, पोस्ट करत आपल्या मनातील वेदना, खंत मांडली नाही. जो समाज, जी लोकं यांना डोक्यावर घेतात, त्यांच्याविषयी या कलाकारांना काहीच संवेदना नाहीत का? असा सवाल देखील उपस्थित होतो. ज्या रसिकांच्या जोरावर तुम्ही तुमची उंची गाठता, त्याच रसिक जनतेतील एखाद्याचा जीव व्यवस्था घेत असेल, तर तुम्ही उद्विग्न होत नाही, हीच खरी मोठी खंत आहे. का बरं कलाकार अशी शपथ घेत नाही की, यापुढे आम्ही राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार नाही, अशा राजकारण्यांचे उदात्तीकरण करणार नाही. त्यामुळे एखाद्या स्त्रीविषयी ज्याप्रकारे अयोग्य, प्रतीमामलीन वक्तव्य करणे अशोभनीय आहे, त्याचप्रकारे कलाकारांनी देखील आपली सामाजिक बांधीलकी सोडणे अशोभणीय आहे.
बीड प्रकरणामुळे राज्यभरात तणाव निर्माण होतांना दिसून येत आहे. दोन समाजात तणाव निर्माण होतांना दिसून येत आहे. याला कुठेतरी आवर घालणे गरजेचे आहे. राज्यात अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच एक जानेवारीला भीमा कोरेगाव अर्थात विजयस्तंभ येथे कार्यक्रम आहे. त्यासोबतच 14 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरला नामांतर दिन आहे, अशावेळी या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही, याची पुरेशी काळजी घेण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर असणार आहे. खरंतर बीड प्रकरणात आरोपींच्या संपत्ती जप्त करण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे, तो कौतुकास्पद असला तरी, यातील मुख्य आरोपी सापडत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. वाल्मीक कराड यांना अटक करा, आणि धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून दूर करा अशी प्रमुख मागणी आहे. त्यातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर मुंडे, कराड यांच्याविरोधात रान उठवले आहे. वास्तविक पाहता धस भाजपचे आमदार, राज्यात सत्ता महायुतीची, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवण्यात प्रयत्न सुरू असतांनाच दुसरीकडे पोलिसांना संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मास्टरमाईंड सापडत नाही, किंबहूना तो सापडू नये, असेच प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. खरंतर दिवसाढवळ्या एका गावाच्या सरपंचांचे अपहरण करून त्याची निर्दयपणे हत्या केली जाते. त्याला मारतांना इतक्या प्रचंड वेदना होईल इतकी मारहाण केली जाते, ते कशाचे लक्षण आहे? वास्तविक ही जी गुंडगिरी पोसली जात आहे, ती मोडीत काढण्याचे सर्वात मोठी संधी पोलिसांना आणि नव्या महायुती सरकारला आहे. मात्र ती इच्छाशक्ती सरकार दाखवेल का? हा महत्वाचा प्रश्न आहे. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांची जी आकडेवारी येत आहे, ज्याप्रकारे अनेकांच्या हत्या झाल्याचे समोर येत आहे, ते अतिशय चिंताजनक आहेत. त्यामुळे बीडचे पोलिस नेमके काय करत आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अनेकजण कट्टे कंबरेला लावून फिरतांना दिसून येत आहे, त्यांच्याकडे अधिकृत परवाना आहे का? आमदारांना एक अंगरक्षक असतांना, वाल्मिक कराडवर अनेक गुन्हे असतांना त्याच्या संरक्षणासाठी दोन अंगरक्षक कुणी दिले? या सर्व बाबींची चौकशी होण्याची खरी गरज आहे.
COMMENTS