Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही ! : मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा

मुंबई ः सुमारे 50 वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिला संरक्षण देणे क्रमप्राप्

बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल.
भाजपच्या अध्यक्षपदासाठी फडणवीस शर्यतीत !
पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ः सुमारे 50 वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिला संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे, मात्र या राज्यात मोगल बादशहा औरंगजेबाच्या कबरीचे केव्हाही उदात्तीकरण खपवून घेणार नसल्याचा सज्जड इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला आहे. येथे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे उदात्तीकरण होईल असे देखील त्यांनी सांगितले. भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना यूनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. संगमेश्‍वर येथे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली, तो संगमेश्‍वरचा वाडाही सरकार विकासासाठी घेणार आहे. सरकार तिथे स्मारक बांधेल. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात ज्या ठिकाणी औरंगजेबाने कैद केले होते, ती जागाही स्मारक विकसित करण्यासाठी देण्यात यावी यासाठी सरकारने उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे. यासंबंधी अर्थसंकल्पातही योग्य ती तरतूद केली आहे. पानीपतच्या युद्धात मराठ्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्यानंतर 10 वर्षांनी महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर आपला झेंडा रोवला होता. त्यामुळे सरकार पानीपत येथेही स्मारक बांधणार आहे. तूर्त सरकार शिवाजी महाराजांच्या या मंदिराला तत्काळ तीर्थस्थळाचा दर्जा देईल. फडणवीस यांनी यावेळी शिवरायांचे मंदिर व औरंगजेबाच्या कबरीवरील आपली भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात केवळ शिवरायांचेच महिमामंडन होईल. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही. औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व विभागाने 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. पण या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे केव्हाच महिमामंडन होणार नसल्याचा इशाराच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

शिवरायांचे मंदिर खर्‍या अर्थाने राष्ट्रमंदिर
राज्यात छत्रपतींचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराला सुंदर तटबंदी आहे. बुरूजं आहेत. दर्शनीय असा प्रवेशमार्ग आहे. सुंदर बगिचा आहे. मात्र शिवाजी महाराजांचे मंदिर कशासाठी? ते यासाठी की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन साधना करू शकतो याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देव, देश, धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. जसे हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचे दर्शन पूर्ण होत नाही. तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन आपल्याला फळणार नाही. त्यामुळे शिवरायांचे मंदिर खर्‍या अर्थाने राष्ट्रमंदिर असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

शिवरायांचे देशातील पहिल्या मंदिराचे लोकार्पण
भिवंडीवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साकारलेल्या मंदिरात शिवाजी महाराजांची कृष्णशिळेची 6 फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लांची मूर्ती तयार करणार्‍या अरुण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केली आहे मंदिर परिसरात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित इतिहास समाजाला कळावा यासाठी 36 शिल्पचित्रे साकारण्यात आली आहेत. त्यात प्रत्येक प्रसंगाची माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी या 3 भाषेत देण्यात आली आहे.

अशी आहे मंदिराची रचना ?
एकूण अडीच हजार चौरस फुटांच्या परिसरात हे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरासाठी एकूण तटबंदी ही पाच हजार चौरस फूट इतक्या आकाराची आहे. मंदिराच्या उभारणीसाठी 7 ते 8 कोटी रुपये खर्च झाले आहे. ह. भ. प. डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी या मंदिराची रुपरेखा निश्‍चित केली आहे. मंदिराच्या भोवती तटबंदी, बुरूज आणि महाद्वार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची 42 फूट इतकी असून मंदिरासाठी एकूण 5 कळस आहेत. मंदिराच्या गाभार्‍यावर 42 फुटांचे सभामंडप, त्याभोवती गोलाकार बुरूज, टेहळणी मार्ग अशा किल्ल्याशी साधर्म साधणार्‍या गोष्टी मंदिरात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हे सर्व बांधकाम दगडाच्या सहाय्याने करण्यात आले आहे. मंदिराच्या तटबंदीच्या आतील भागात 36 विभाग आहेत. त्यात छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडणारी भव्य शिल्पे घडवण्यात आली आहेत.

COMMENTS