लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र स्थिर होईल अशी अपेक्षा होती, मात्र राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची श
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र स्थिर होईल अशी अपेक्षा होती, मात्र राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा झडतांना दिसून येत आहे. त्याला कारण आहे, भाजपकडे लोकसभेत नसलेले संख्याबळ. खरंतर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 31 खासदार निवडून आणले तर, विधानसभा निवडणुकीत महायुतीने 232 पेक्षा अधिक आमदार निवडून आणले. त्यामुळे महाविकास आघाडीकडे खासदार आहेत, तर महायुतीकडे आमदार आहेत, अशी राज्यातील परिस्थिती आहे. त्यात केंद्रात भाजप नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्यावर सत्तेत टिकून आहेत. त्यातच नितीशकुमार कधी पलटी मारू शकतात, याचा नेम नाही, याची केंद्रातील भाजपला जाणीव आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँगे्रसचे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही खासदार फोडून सेफ होण्याचे भाजपचे धोरण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाल्याची चर्चा सुरू आहे. या बैठकीत खासदार शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या 8 खासदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा विचार स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. सत्तेत असलो तर, मतदारसंघातील विकासकामे लवकर मार्गी लागतील त्यामुळे आपण सत्तेत सहभागी झालो पाहिले असा त्यांचा मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गटात दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. एक मतप्रवाह म्हणजे या स्वतंत्र गटाने भाजपला पाठिंबा द्यावा, तर दुसर्या गटाचा असा मतप्रवाह आहे की, थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होवून भाजपला पाठिंबा द्यावा, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरंतर यामध्ये शरद पवार नेमका काय विचार करतात? त्यावर पुढील राजकीय गणिते स्पष्ट होणार आहे. खरंतर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. शिवाय खासदार शरद पवारांची संपूर्ण हयात भाजपविरोधात गेली आहे. आयुष्यभर काँगे्रसचा विचार जपणार्या नेत्याला भाजपसोबत जाणे म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात उजव्या विचारसरणीसोबत जाण्याचा डाग लागू शकतो, त्यामुळे शरद पवारांना प्रतिमा देखील जपायची आहे, तर दुसरीकडे भाजपसोबत जाण्यासाठी आपल्या खासदारांना जाण्यासाठी संदेश देखील द्यायचा आहे. त्यामुळे राज्यात आगामी काही दिवसांत वेगळी समीकरणे बघायला मिळू शकतात. कारण आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पाच वर्षांचा कालावधी आहे. अशावेळी कोणतीतरी भूमिका शरद पवारांना घ्यावीच लागणार आहे. आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येवू घातल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील काँगे्रसपासून फारकत घेण्याच्या विचारात आहे. कारण शिवसेना म्हटलं की कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष. मात्र सत्तेसाठी काँगे्रससोबत गेल्यामुळे जनतेला ते रूचले नाही, असेच निकालातून दिसून येते. कारण उद्धव ठाकरेंविषयी प्रचंड सहानुभूती आहे आणि त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा होईल असा एक मतप्रवाह होता, मात्र तो या निवडणुकीतून फोल ठरला. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ता वाचवण्यासाठी पुन्हा सत्ता मिळवणे ठाकरे यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ठाकरे मुंबईत स्वबळावर लढतील अशीच अपेक्षा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल अशी शक्यता आहे. आणि त्याची सुरूवात शरदचंद्र पवारांच्या पक्षापासून सुरू होईल अशी शक्यता दिसून येत आहे. मात्र यावेळेस भाजपने शिवसेनेमध्ये जशी उभी फूट पाडली तसे आता काही होण्याची शक्यता नाही. कारण आता शरद पवारांच्या सहमतीनेच सर्व काही राजकारण होईल असेच दिसून येत आहे. त्यामुळे शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार होवून, सुप्रिया सुळेकडे अध्यक्षपद सोपवून शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँगे्रस पुन्हा सत्तेत सहभागी होवू शकतो. त्याचवेळी खा. शरद पवार आपण राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा देखील करू शकतात. त्यामुळे शरद पवार भाजपसोबत गेले असा संदेश देखील जाणार नाही, शिवाय सुप्रिया सुळेंना अध्यक्ष केल्यामुळे शरद पवार भाजपसोबत गेले किंवा त्यांनी तसा निर्णय घेतला असा संदेश देखील जाणार नाही, असेच काहीसे होण्याची शक्यता आहे.
COMMENTS