नवी दिल्ली ः महागाईचा दर गेल्या 16 महिन्यांपासून सातत्याने वाढतांनाच दिसून येत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतांना अजूनही या महागा
नवी दिल्ली ः महागाईचा दर गेल्या 16 महिन्यांपासून सातत्याने वाढतांनाच दिसून येत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतांना अजूनही या महागाईच्या चटक्यातून सर्वसामान्यांची सुटका होण्याची शक्यता नाही. कारण सोमवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जून महिन्यातील घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली असून, घाऊक महागाईचा दर आता 3.36 टक्के इतका झाला आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या 16 महिन्यांतील हा उच्चांक दर आहे.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात महागड्या भाज्यांमुळे घाऊक महागाईचा दर वाढला आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे घाऊक महागाईचा दर वाढल्याचे बोलले जात आहे. उत्पादित अन्नपदार्थ, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू तसेच खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम महागाईच्या दरावर झाला आहे. विशेष बाब म्हणजे, यापूर्वी मे महिन्यांत घाऊक महागाईचा दर 2.61 टक्के इतका होता. मात्र, जून महिन्यात हाच दर 3.36 टक्क्यांवर पोहचला. तसेच अन्नधान्याचा महागाई दरही जूनमध्ये 8.68 टक्क्यावर गेला आहे. हाच दर मे महिन्यात 7.40 टक्के इतका होता. यामुळे आधीच महागाईचा मार सोसणार्या जनतेला आणखीच त्रास सहन करावा लागणार आहे. मे महिन्यात प्राथमिक वस्तूंच्या महागाईचा दर 7.20 टक्के इतका होता. जो आता जूनमध्ये 8.80 टक्के झाला आहे. इंधन आणि उर्जा विभागाच्या घाऊक महागाई दरात किंचित घट झाली आहे. हा दर मे महिन्यात 1.03 इतका होता. जो आता जूनमध्ये 1.35 टक्के झाला आहे. उत्पादन उत्पादनांच्या महागाई दरातही वाढला असून 1.34 टक्के इतका झाला आहे. मे महिन्यात हा आकडा 0.78 टक्के इतका होता. त्यामुळे महागाईमुळे सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
COMMENTS